हरित क्रांतीचे प्रणेते व प्रदिर्घ काळ राज्यांचे समर्थपणे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणारे महानायक Vasantrao Naik वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आला नसल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी नाईकांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा. अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी अशी अपेक्षा परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रवर्तक मनोहर राठोड यांनी व्यक्ती केली आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पुरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करुन जो सन्मान केला त्याच धर्तीवर महानायक वसंतराव नाईक भारतरत्न पुरस्कार क्रम प्राप्त आहे. अशी जनभावना नाईक अनुयायांकडून व्यक्त केली जात आहे. Vasantrao Naik वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मागील 24 वर्षापासून सातत्याने मागणी केली जात आहे.
सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य शासनाच्या वतीने प्रस्ताव व ठराव मंजूर करून भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी बंजारा क्रांती महाराष्ट्र प्रदेशचे तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी लावून धरली होती. 2000 मध्ये विलास देशमुख मुख्यमंत्री असताना बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने बंजारा कर्मचारी सेवा संघ, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, आदिवासी भटके विमुक्त संघ, भटक्या जाती जमाती महासंघ, बंजारा पँथरचे अध्यक्ष रोहिदास पवार व त्यांचे सहकारी यासाठी सातत्याने संघर्ष करीत आहे.
15 फेब्रुवारी 2016 ला तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पोहरादेवी येथे बंजारा क्रांती दलाच्या आरक्षण मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहून वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मागणी केली होती. 2020 मध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा केंद्र सरकारकडे भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारसी बाबत मागणी करण्याचे अभिवचन दिले होते.
महानायक वसंतराव नाईक यांचे योगदान महाराष्ट्र व देशासाठी मोठे आहे. 1972 चा दुष्काळ असो वा पंचायत राज सुधारणा तसेच आश्रम शाळा अथवा रोजगार हमी योजना हे त्यांचे कार्य आहे. इतके मोठे भरीव कार्य असताना सातत्याने उपेक्षा केली जात असल्याने मनोहर राठोड यांनी नाराजी दर्शविली आहे.