रिद्धपूरचे मराठी विद्यापीठ जूनपासून सुरू होणार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याची माहिती
रिद्धपूरच्या थीम पार्कची पाहणी

    दिनांक :04-Jan-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Riddhapur Marathi University : रिद्धपूर येथे येत्या जूनपासून मराठी विद्यापीठ सुरू होणार आहे. मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी रिद्धपूर येथे दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रमशाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
Riddhapu Marathi University
 
मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा असलेल्या Riddhapur Marathi University थीम पार्कची पाहणी करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्यादृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्‍या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना पालकमंत्र्यांनी दिले. येथील म्हाइंभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणीही पाटील यांनी यावेळी केली.
 
 
मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. Riddhapur Marathi University महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर ठरली आहे. यामुळे रिद्धपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. ‘लीळाचरित्रा’सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला, त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.
 
 
पालकमंत्री पाटील यांनी गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी गद्य ग्रंथ लीळाचरित्राचे निर्मिती स्थान, वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. Riddhapur Marathi University त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंदप्रभू यांचे दर्शन घेतले. तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली. येथील हस्तलिखित पोथ्या सातशे वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील सहाशे वर्षापूर्वींच्या संत महात्म्यांच्या वापरातील कापडी भांडी, गाठी यांचीही पाहणी करून येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.