राष्ट्रच सर्वोपरी...!

    दिनांक :08-Jan-2024
Total Views |
वेध
- अनिरुद्ध पांडे
गेल्या काही वर्षांत या देशातला हिंदू चांगलाच जागा झाला आहे. Rashtra Sarvopari या भारत राष्ट्रात हिंदुत्व आणि सनातन धर्माचे महत्त्व वाढून शंभर कोटी हिंदूंमध्ये त्याबद्दल आपुलकी आणि उत्सुकता जाणवू लागली आहे. या सर्वांसोबतच ‘राष्ट्रच सर्वोपरी’ हेही आपण विसरायला नको आहे. राष्ट्राचे, देशाचे, मातृभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे डोक्यात असायलाच हवे आहे. भूमी असेल, राहायला, जगायला जागा असेल तरच हिंदुत्व, धर्म यांना अर्थ आहे. म्हणूनच तर राष्ट्राला मातृभूमी म्हटले आहे. तेच नसेल तर आपल्या कोणत्याही अस्तित्वाला कोणताही अर्थ नाही, हे उघड आहे. आजकाल हिंदुत्व विषयात जनजागृती करणार्‍या, काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. या संस्था, संघटना, समित्या, न्यास, संघ, मंडळे हिंदुजागृती करताना अतिशय तळमळीने काम करताना दिसतात. उत्साहवर्धक वातावरण संपूर्ण देशातच असल्यामुळे या संस्थांच्या कामांना सर्वसामान्य लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. स्वाभाविकच त्यामुळे या संस्थांचाही उत्साह वाढत असतो. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पृष्ठभूमीवर तर हिंदू, हिंदुत्व, सनातन धर्म या विषयांत काम करणार्‍या संस्था-संघटनांना नवीन धुमारे फुटत असून त्यांच्या आतापर्यंतच्या योगदानाला, तपश्चर्येला, चिकाटीला सार्थकतेचे कोंदण लागल्याची भावना निर्माण झाली आहे.
 
 
Rashtra sarvopari
 
Rashtra Sarvopari  : आता या सर्वच दिशांनी अनुकूल असलेल्या वातावरणात देश, स्वदेश, स्वदेशी, विदेशी, परदेशी, आपले, त्यांचे या विविध अंगांनी नव्याने आणि गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या आपण भारतीय कोट्यवधींच्या संख्येत ऑनलाईन व्यवहार करू लागलो आहोत. इतके की, आता पैसे पाठवण्याबद्दल पैशांचा उल्लेखही करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. ‘गुगल-पे’ करून टाक, ‘फोन-पे’ वर पाठवून देतो अशा प्रकारची भाषाच आता पुरेशी ठरत आहे. पण याचवेळी गुगल-पे किंवा फोन-पे या भारतीय कंपन्या मुळीच नाहीत, याचा विचार करणे निश्चितच गरजेचे आहे. पेटीएम, स्टेट बँकेचे योनो, भारत सरकारचे अनेक बँकांमध्ये उपलब्ध असलेले भीम असे अनेक पैसे पाठविणारे ‘अ‍ॅप’ आम्हाला सेवा देऊ शकतात. कदाचित ‘विदेशी’ गुगल-पे किंवा फोन-पे इतके ते कार्यक्षम नसतील आज, पण उलाढाल वाढली, मागणी वाढली की होतीलही. तेही आपल्याच हातात आहे. एकदम बदल शक्य होत नाही कधीकधी, पण गुगल-पे, फोन-पे हे आपले नाहीतच; आपल्याला सेवा देण्याचे पैसे ते कुठेतरी यूएस, यूकेमध्ये आपल्याकडून घेऊन जात आहेत, हे डोक्यात ठेवणे गरजेचे आहे. ‘राष्ट्रच सर्वोपरी’ हे कुठेतरी मनात असणे आणि विदेशी असणे, स्वदेशी नसणे हे आपल्याला खटकायलाच हवे आहे. भारत सरकारने ‘व्हॉटस् अ‍ॅप’ला रोखण्यासाठी ‘संदेस’ अ‍ॅप आणले आहे. आता ‘व्हॉटस् अ‍ॅप’ आणि ‘संदेस’ची तुलनाही होऊ शकत नाही हेे कोणालाही कळेल, इच्छा असतानाही ते बदलणे शक्य होणार नाही. हेही समजून घेण्यासारखेच आहे. पण जिथे कुठे या विदेशींना ठोकणे शक्य आहे तिथे ठोकायलाच हवे, याची जाणीव पुरेशी आहे.
 
 
Rashtra Sarvopari  : आपल्याला आर्थिक दणके देणारी गुगल-पे किंवा फोन-पे सारखी आणखी एक विदेशी कंपनी सध्या फारच फोफावली आहे, ती म्हणजे ‘अ‍ॅमेझॉन.’ त्यावेळच्या ईस्ट इंडिया कंपनीसारखे नव्या रूपात हे आक्रमणच आहे. आपण भारतीय आज अ‍ॅमेझॉनच्या इतके आहारी गेलो आहोत की ते हळूहळू, थोडेथोडे का होईना लुटू लागले आहेत, हे आपल्याला दुर्दैवाने कळतही नाही आहे. दुसरीकडे लाखोंनी लूट सुरू असते ती चारचाकी वाहनांमध्ये. एकीकडे आपण हिंदुत्व, सनातनकडे झुकत असतानाच स्वदेशी हा मुद्दा नकळतपणे का होईना बाजूला ठेवून देतो आहोत. या क्षेत्रात प्रबोधन करणार्‍या संघटना, संस्थांचे प्रमुख, अध्यक्ष, महंत, गुरुजी, गुरुदेव, आचार्य, स्वामी, महाराज, परमहंस, बाबा हे अनेकदा महागड्या विदेशी वाहनांमधून फिरताना दिसतात. यात त्या प्रमुखांपेक्षा त्यांच्या भोवतालच्यांचीच भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी त्यांच्यासाठी वाहनाची ‘व्यवस्था’ करताना हा महत्त्वाचा ‘स्वदेशी’चा विचारच केलेला नसतो. त्यामुळे हे स्वामीजी विदेशी वाहनातून उतरून स्वदेशीवर सुरेख आणि मुद्देसूद भाषण ठोकतात आणि पुन्हा विदेशी वाहनातच बसून निघून जातात. ‘मिरवण्याला’च त्यावेळी महत्त्व दिले जाते आणि असा स्वदेशीचा खेळ केला जातो. पूर्णपणे भारतीय कार उत्पादक ‘टाटा’ आणि ‘महिंद्र’ हे आज 99 टक्के भारतीय चारचाकी ग्राहकांच्या गरजा भागविण्यास सक्षम आहेतच. या वस्तुस्थितीकडे साफ दुर्लक्ष करून ‘विदेशी’च्या वे÷ड्या आकर्षणातून टोयोटा, होंडा, सुझुकी, हुंडाई, किया, एमजी अशांना खूप सारे पैसे देऊन मोकळे होतो. हे सारे घडत असते, उत्तम आणि अधिक चांगला पर्याय उपलब्ध असताना हीच चिंतेची बाब आहे. ‘विदेशातून पैसा आणणे’ आणि ‘विदेशात पैसा जाणे’ यातील फरक लक्षात घेतला तर खरंच काहीही कठीण नाही. हे आपले आहे की इंग्रजांचे आहे एवढे पाहिले तरी पुरे आहे. त्यातूनच ‘राष्ट्रच सर्वोपरी’ हे साध्य होणार आहे, हे निश्चित.
 
- 9881717829