नवरात्रोत्सवासाठी भाविक सज्ज!

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |
गोंदिया, 
Navratri 2024 : गणेशोत्सवानंतर आता गोंदिया शहरासह जिल्हावासीयांना आदिशक्ती दुर्गा मातेच्या आगमनाचे वेध लागले आहे. 3 ऑक्टोबर रोजी मातेचे आगमनाची भाविक सज्ज झाले असून मंडप उभारणीसाठी आयोजक मंडळांची धावपळ वाढली असून मूर्तीकार दुर्गा मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत.
 
 
 
GONDIA
 
 
 
नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील नवरात्री उत्सव पंचक्रोषीत प्रसिद्ध आहे. त्यातही शहरातील नवरात्रोत्सव धूम काही औरच असते. शहरातील काही मंडळाच्या दुर्गा उत्सवाची विशेष ख्याती असल्याने जिल्ह्यासह शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील भाविकांचीही शहरात नऊ दिवस मांदियाळी राहते. आयोजक मंडळाकडून आकर्षक दुर्गा मूर्तीसह आकर्षक व कल्पक मंडप उभारणी, रोषणाई यासह नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होते. सोबतच भाविकांना निःशुल्क महाप्रसादाचे वितरण होते. त्यामुळे नऊ दिवस शहरात चैतन्याचे वातावरण राहते. या दिवसात शहराला जत्रेचे रुप राहत असल्याने फुटकर व्यावसयाीकांनाही चांगला रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे सर्वांनाच दरवर्षी दुर्गा आमनाची प्रतिक्षा राहते. यंदाही मातेच्या आगमनासाठी भाविक सज्ज झाले आहेत. दोन दिवसाने दुर्गा मूर्तीची स्थापना होणार असल्याने आयोजक मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची मंडप उभारणीसाठी धावपळ वाढली आहे. तर मूर्तीकारही दुर्गा मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत. दरम्यान, दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
 
 
गरबा व दांडियाचे आकर्षण...
 
 
नवरात्रोत्सवादरम्यान शहरातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासह अनेक मंडळांकडून आयोजित गरबा व दांडियाचे विशेष आकर्षण राहते. साधारणतः दुर्गा उत्सनेपासून तीन दिवसानंतर गरबा व दांडिया कार्यक्रमाला सुरुवात होते. यात लहानांपासून ते वृद्ध सहभागी होत असून काही ठिकाणी स्पर्धांचेही आयोजन केले जाते. गरबा व दांडिया आयोजकांनीही कार्यक्रमस्थळ उभारणीला वेग दिला आहे.