तभा वृत्तसेवा
वर्धा,
Work Band Movement : लिपीक संवर्गावर शासनाने केलेल्या अन्याया विरोधात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व लिपीक संवर्गीय कर्मचार्यांनी आज मंगळवार 1 रोजी कामबंद आंदोलन केले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.
कृषी आयुक्त पुणे, कार्यालयातील कृषी सहसंचालक (आस्थापना) हे पद लिपीक संवर्गातील असून या पदावर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदावरील अधिकारी जेष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असताना सदर पद हे तांत्रिक संवर्गातून शासनाने भरले. त्यामुळे अन्याय होत असल्याने कृषी विभागीय लिपीक संवर्गातील अधिकारी, कर्मचार्यांनी 27 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु, अद्याप शासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. कृषी विभागीय लिपीक संवर्गातील कर्मचा-यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे कृषी विभागाचे कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत असून अनेक कामे खोळंबलेली आहेत.
यावेळी कृषी विभाग लिपीक संवर्गीय संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष रवी ठाकूर, उपाध्यक्ष अविनाश भागवत, सचिव अतुल शिंदे, अमोल पोले, गजानन राठोड यांच्यासह पदाधिकारी व सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. लिपीक संवर्गावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन योग्य तो न्याय करावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृषी विभाग लिपीक संवर्ग संघटनेकडून देण्यात आला.