युवकाचा खून करणारे निघाले नातेवाईकच

-संपत्तीच्या लोभातून केले दुष्कृत्य -अपघाताचा केला बनाव

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Amravati murder case : वडिलोपार्जित जमीन व १० लाखाच्या विम्याच्या लोभापायी आरोपींनी युवकाचा खून करून त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून अपघात झाल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी तपासात हे बिंग फोडले असून दोन महिलांसह एकूण पाच जणांना अटक केली आहे.
 
 
 
JDFJKSDJF
 
 
खोलापूर पोलिस ठाणे हद्दीतील अमरावती ते दर्यापूर रस्त्यावरील धामोरी बस स्टँडवर १८ सप्टेंबर रोजी धामोरीचा २३ वर्षीय अजय रविकिरण मुंगाने याचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, तसेच खोलापूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अजयचा मृतदेह ज्या ठिकाणी होता, त्याच ठिकाणी त्याचे हॉटेलही होते. तो रात्री त्याच ठिकाणी झोपत होता. हॉटेलमध्ये रक्ताचे डाग आढळले. मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करून २४ वर्षीय आशिष शैलेशसिंग मुंगाने, ४३ वर्षीय जयश्री शैलेशसिंग मुंगाने, २३ वर्षीय पायल आशिष मुंगाने व ४३ वर्षीय बाळकृष्ण महादेव खरबडे सर्व रा . धामोरी तसेच ४२ वर्षीय जोत्स्ना नारायणसिंग शेंगर, रा . नरखेड , जि . नागपूर यांना अटक करण्यात आली.
 
 
त्यांनी चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीवरून मृतक अजय हा आरोपी आशिष याचा सावत्र काका असून अजयचे आई - वडील दोन्ही जिवंत नसल्याने तो आशिषच्या घरीच धामोरी येथे मागील १४ वर्षापासून राहत होता. अजय मुंगाने याच्या नावे वडिलोपार्जित जमीन तसेच १० लाखाचा विमा होता. या लोभापायी नातेवाईकांनी अन्य दोघांना प्रत्येकी दोन लाखाचे आमिष देऊन अजयचा खून केला. त्यानुसार अजय झोपेत असतांना त्याचे हातपाय पकडून त्याच्या डोक्यावर फरशीच्या तुकड्याने जबर प्रहार करून त्याला ठार मारले व नंतर अपघाताचा बनाव करून त्याचा मृतदेह रोडवर टाकून दिला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पेालिस निरीक्षक किरण वानखडे, एपीआय किशोर वानखडे, पीएसआय सचिन पवार, पीएसआय सागर हटवार, कर्मचारी मुलचंद भांबुरकर, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, युवराज मानमोठे, रवींद्र वर्‍हाडे, शांताराम सोनोने, स्वप्निल तंवर, सागर नाठे, अमोल देशमुख, सचिन मसांगे, मंगेश लकडे यांच्या पथकाने केली.