अन्न हे पूर्णब्रह्म

    दिनांक :19-Oct-2024
Total Views |
वेध
- विजय कुळकर्णी
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म ।।
World Food Day : या श्लोकानुसार भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले आहे. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर यज्ञकर्म म्हणून ते सेवन केले पाहिजे. यज्ञकर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते, असे म्हणतात. त्याप्रमाणे आपले शरीरदेखील यज्ञकुंड असून त्याचे योग्य पोषण होण्यासाठी भोजन करणे म्हणजे एक प्रकारचे यज्ञकर्मच आहे.
 
 
food day
 
हे सर्व येथे मांडण्याचा उद्देश असा की, १६ ऑक्टोबर हा World Food Day जागतिक अन्न दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. तसे पाहिले तर, ‘डे' साजरे करणे ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. मदरर्स डे, फादरर्स डे, त्याप्रमाणे पाश्चिमात्य देश ‘फूड डे' म्हणजे ‘अन्न दिन' साजरा करतात. आपण भारतीय अन्नाला देव मानतो. आपण अन्नाचा कधीच अपमान करीत नाही. आपल्या थोर ऋषी-मुनींनी अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला ‘अन्नदाता' म्हटले आहे. त्याला शेती कामात मदत करणाऱ्या ‘वृषभ' म्हणजे बैलालादेखील ‘नंदी' म्हणून देवत्व बहाल केले आहे. त्यांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. अनेक श्लोक, ऋचा, मंत्रातून आपल्याला अन्नाची महती कळते. मात्र, आज काळ वेगाने बदलत आहे. पूर्वी लग्न समारंभ अथवा इतर कार्यक्रमात पंक्तीत भोजन देण्याची पद्धत होती. आजही ती कायम असली, तरी फारच कमी ठिकाणी तिचा अवलंब केला जातो. आता लग्न समारंभात बुफेची पद्धत रूढ झाली आहे. पूर्वी घराघरांत माजघरात पाटावर बसून भोजन करण्याची पद्धत होती. आता अनेक ठिकाणी डायनिंग टेबलवर जेवणाची पद्धत आली आहे. त्यासाठी डायनिंग हॉल तयार केला जातो. टेबलवर बसून पायात जोडे, चप्पल घालून भोजन ग्रहण केले जाते. आजही काही लोक भोजनाचे नियम पाळतात. जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखविला जातो. भाताची काही शितं ‘चित्रावती' म्हणून ताटाच्या बाजूला टाकली जातात. देवाचे नामस्मरण, श्लोक म्हटला जातो. मात्र, आता हे करताना फारसे कुणी दिसत नाही. ताट वाढले की, सरळ जेवण सुरू केले जाते. याला घरातील ज्येष्ठ मंडळीदेखील जबाबदार आहेत. त्यांनी ताटाभोवती पाणी न फिरविता भोजन सुरू करणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याला हटकले पाहिजे. तसे केल्यास अन्नाचा सन्मान राखला जाईल. आपल्याला हवे तेवढेच घ्यायला मुलांना शिकविले पाहिजे. पानात काहीही शिल्लक राहायला नको, असे मुलांना सांगितले पाहिजे.
 
 
 
World Food Day : पूर्वी पानात वाढलेले चांगले तूप अगदी निपटून खायला लावत. तूप मोरीत जायला नको, असे बजावले जाई. आमच्या लहानपणी आमचे वडील जो पानात काहीही शिल्लक ठेवणार नाही त्याला बक्षीस मिळेल, असे सांगत. त्यामुळे आम्हाला पानात काहीही न टाकण्याची सवय लागली. आज हे सर्व लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या अन्नधान्याचे नियोजन केले जात असे. काटकसरीने त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नव्हती. आज बुफे ज्याला मराठीत ‘स्वरुची भोज' म्हणतात. वास्तविक, स्वरूची या नावातच त्या भोजन पद्धतीचा अर्थ आहे. आपल्याला आवडेल ते म्हणजे स्वरूची. पण, आपण काय करतो. पुन्हा त्या रांगेत उभे राहायला नको म्हणून आपल्या प्लेटमध्ये सर्व पदार्थ एकदाच गच्च भरून घेतो. मग, त्यातील मोठ्या प्रमाणात अन्न टाकून दिले जाते आणि अन्नाची नासाडी होते. आपल्या ताटात तेवढे घ्या की जेणेकरून ते नालीत टाकले जाणार नाही. ‘अन्नदाता सुखी भव' ‘पाककर्ता सुखी भव' असे जेवण झाल्यावर आपण म्हणतो. कारण तो अन्न पिकविणारा आणि अन्न तयार करणाऱ्याचा सन्मान आहे. आज अन्नाची होत असलेली नासाडी पाहून खंत वाटते. आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही. संतुलित आहार मिळत नसल्याने आदिवासी भागातील मुलं मोठ्या संख्येत कुपोषित आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील बालकांचे मृत्यू होतात. याची गंभीर दखल घेऊन जागतिक अन्न व कृषी संघटनेने १९८१ पासून जागतिक अन्न दिनाचे आयोजन करणे सुरू केले आहे. श्री गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरील अन्नाचे कण वेचून आपली भूक भागविल्याचे श्री गजानन विजय ग्रंथात नमूद आहे. या कृतीतून त्यांनी अन्नाचे महत्त्व पटवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कॉफी, समोसे, चिप्स इत्यादी खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. त्यामुळे भारतात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. तेव्हा अन्न दिनानिमित्त आपण सर्वांनी यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी ‘तरुण भारत'ने ‘अन्न वाचवा' ही मोहीम संपूर्ण विदर्भात राबविली होती. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. तेव्हा आजपासूनच आपण ‘इतनाही लो थाली मे, व्यर्थ न जाए नाली मे' अशी काळजी घेण्याचा संकल्प करू या! 
 
- ८८०६००६१४९