हेमंत झाले शिबू सोरेन यांचे राजकीय उत्तराधिकारी

21 Oct 2024 18:29:47
- श्यामकांत जहागीरदार
 
नवी दिल्ली, 
Hemant Soren : कोणत्याही घराणेशाहीच्या पक्षाचे जे होते, तेच झारखंड मुक्ती मोर्चाचे झाले आहे. शिबू सोरेन यांनी स्थापन केलेल्या या पक्षात सत्तेच्या वाटणीवरून फूट पडली. झारखंडचे मुख्यमंत्रिपद तीन वेळेला अल्पकाळासाठी भूषवलेल्या शिबू सोरेन यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा दुर्गा सोरेन यांचे निधन झाल्यामुळे सध्या दोन मुले आणि एक मुलगी आहे आणि सर्व जण राजकारणात आहेत. एवढेच नाही तर, दोन भावांच्या पत्नीही राजकारणात आहे.
 
 
Hemant Soren
 
दुर्गा सोरेन हा शिबू सोरेन यांचा मोठा मुलगा, तर वसंत लहान मुलगा. याशिवाय त्यांना अंजली नावाची मुलगी आहे. स्वत:ला शिबू सोरेन यांचे राजकीय वारसदार मानणारे Hemant Soren हेमंत सोरेन हे शिबू सोरेन यांचे दुसऱ्या क्रमाकांचे पुत्र. हेमंत सोरेन यांनीही झारखंडचे मुख्यमंत्रिपद आपल्या वडिलांप्रमाणे तीनदा सांभाळले. सुरुवातीला दुर्गा सोरेनच शिबू सोरेन यांच्यासोबत काम करीत होते. अविभाजित बिहारच्या जामा मतदारसंघातून दुर्गा सोरेन १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. २००० मध्ये ते दुसऱ्यांदा बिहारमधूनच आमदार म्हणून निवडून आले. २००५ च्या झारखंड विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत जामा मतदारसंघात भाजपाचे सुनील सोरेन यांनी त्यांचा पराभव केला. गोड्डा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दुर्गा सोरेन झामुमोतर्फे लढले, पण त्यात भाजपाचे निशिकांत दुबे यांनी त्यांचा पराभव केला.
 
 
Hemant Soren : २००९ मध्ये बोकोरो येथील निवासस्थानी रात्री झोपेत असताना दुर्गा सोरेन यांचे निधन झाले. ब्रेन हॅमरेजने त्यांचे निधन झाले, असे सांगितले जात असले तरी, त्यांचा मृत्यू संशयास्पद मानला जातो. त्यामुळे आपल्या पतीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची मागणी दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता सोरेन यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर केली होती. दुर्गा सोरेन हयात असेपर्यंत शिबू सोरेन यांचे राजकीय वारस मानले जात होते. पण, दुर्गा सोरेन यांच्या निधनानंतर हेमंत सोरेन यांचा झामुमोच्या राजकारणातील प्रभाव वाढला. शिबू सोरेन यांचे राजकीय वारस ते मानले जाऊ लागले. हेमंत सोरेन यांचे लहान बंधू वसंत देखील दुमका मतादरसंघातील झामुमोचे आमदार होते. बहीण अंजली सोरेनही काही काळ राजकारणात होती. वसंत सोरेन तर चम्पई सोरेन यांच्या मंत्रिमंडळातही होते.
Powered By Sangraha 9.0