साक्री,
Boycott of voting : निवडणूक आली की गावे मतदानावर बहिष्कार टाकतात, हे आजवर ऐकिवात होते. परंतु, आता एका मोठ्या शहराने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे शस्त्र उपसले आहे. साक्री तालुक्यातील पळनेर शहर व परिसरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याचा प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात आला असून, झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर पिंपळनेरकर ठाम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पिंपळनेर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ७५५ चे मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित आहे. मोठमोठे खड्डे व रस्त्याच्या कडेला मोठ्या गटारी खोदून ठेवलेल्या आहेत. पिंपळनेरकरांनी अनेक आंदोलने केली, रास्तारोको केले, आमरण उपोषणाला बसले. या रस्त्यावर शेकडो अपघातही झाले. तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात याचिकाकत्र्यांनी अतिक्रमण व हद्दी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्व पिंपळनेरकरांना मंजूर आहे. परंतु गेल्या पाच वर्षांपासून जेटी पॉइंट ते सामोडे चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
Boycott of voting : या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, धूळ व खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने पिंपळनेर व आसपासच्या शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन एकमताने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.