गडचिरोली,
Dr. Devrao Holi गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज, 25 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करुन शक्तीप्रदर्शन केले. रॅलीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते बैलबंडीसह सहभागी झाले होते. याशिवाय प्रचंड नारेबाजी करीत आदिवासींनी रेला नृत्य सादर केले. येथील अभिनव लॉन येथे आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना (शिंदे गट) या महायुतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला तिनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dr. Devrao Holi आमदार डॉ. देवराव होळी यांना निवडून देण्यासाठी या तिनही पक्षाच्या पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी बोलताना डॉ. होळी म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत 52 हजार मताधिक्याने आपल्याला निवडून दिले होते. यावेळी अनेकांच्या जमानती जप्त झाल्या होत्या. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण 10 वर्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. गडचिरोली जिल्ह्यात स्टेडियम नव्हते. आपण आमदार झाल्यानंतर जिल्हा स्टेडियम साकारल्या जात असून यासाठी 47 कोटी रुपयांच्या बांधकामाला सुरूवात झाली. पुढील पिढ्यांसाठी वैद्यकीय सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी काम केले. या वैद्यकीय महाविद्यालयामुळे अनेकांच्या आरोग्याची समस्या सुटेल. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन डॉ. होळी यांनी केले.
Dr. Devrao Holi मेळाव्याला भाजपच्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रमुख प्रमोद पिपरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, हेमंत जंबेवार, डॉ. तामदेव दुधबळे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुक्तेश्वर काटवे, विलास दशमुखे आदींसह मोठ्या संख्येने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यानंतर डॉ. होळी यांनी शहरातून मिरवणूक काढत आपला नामांकन अर्ज दाखल केला आणि ही निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावा केला.