पाचोऱ्यात बहीण-भावात लढत

    दिनांक :25-Oct-2024
Total Views |
जळगाव, 
Kishore Patil-Vaishali Suryavanshi : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या बहिणीने आव्हान दिले आहे. यामुळे भाऊ-बहिणीची ही लढत लक्षणीय ठरणार आहे. विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी रिंगणात आहेत. पाचोरा मतदासंघासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून आमदार किशोर पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली. वैशाली या पाचोऱ्याचे माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या कन्या असून, किशोर पाटील हे त्यांचे चुलत बंधू आहेत.
 
 
Kishore Patil-Vaishali Suryavanshi
 
Kishore Patil-Vaishali Suryavanshi : मागील दोन निवडणुकांमध्ये आमदार किशोर पाटील यांना पाचोऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आव्हान मिळत होते. या निवडणुकीत खुद्द त्यांचीच बहीण त्यांना लढत देण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. ओ. पाटील हयात असेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक राहिले होते. त्यांनीच पुतणे किशोर पाटील यांना २०१४ मध्ये आमदारकीसाठी पहिल्यांदा पुढे केले होते. त्यामुळे किशोर पाटील यांना पाचोऱ्यातून आमदार होण्याचा बहुमान मिळाला. मात्र, काकांच्या पश्चात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दुसरीकडे आर. ओ. पाटील यांचा वारसा चालविणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिले.