- प्रतीक्षा लोणकर
प्रसिद्ध अभिनेत्री
Diwali festival : दिवाळीचे स्वागत करत सर्वांना शुभेच्छा देताना होणारा आनंद खूप वेगळा असतो. त्यातच सध्या दिवाळीवर येऊ घातलेल्या महत्त्वपूर्ण निवडणुकांची पडछाया आहे. विधानसभा निवडणूक आणि मतमोजणीची तारीख जाहीर झाल्यापासून फटाक्यांची वेगळी आतषबाजी सुरूही झाली आहे. आता उरलेल्या उण्यापुèया काळात फटाके अधिक आवाज करत फुटतील आणि दिवाळीच्या निमित्ताने रंगणारी मनोरंजन तसेच वैचारिक फराळाची मैफलही गाजवतील. तेव्हा असे सगळे वातावरण तर तयार झाले आहे. त्यामुळे दिवाळी दणक्यात साजरी होणार, यात शंका नाही.
Diwali festival : दिवाळीचा सण आवडण्यामागे माझी एक-दोन कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे या तीन-चार दिवसांच्या साजरीकरणात फारसे धार्मिक कार्यक्रम नसतात. पूजा-अर्चना करण्याचे, नियम पाळण्याचे फारसे बंधन नसल्याने हा सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याजोगा सण होतो. या निमित्ताने एकत्र येऊन दिवे, आकाशकंदील लावणे, रोषणाई करणे या सगळ्याच बाबी उत्साह निर्माण करून जातात. अशा प्रसन्न वातावरणात एखाद्याच्या मनातील निराशा, भीती बघता बघता दूर होते आणि नकळत मन उजळून निघते. या अर्थाने मला हा सण महत्त्वाचा वाटतो. खेरीज एक दिवसच नाही तर दोन-चार दिवस साजरा होत असल्याने मित्रमंडळींच्या गाठीभेटी, घरातल्या लोकांना वेळ देणे यासाठीही पुरेसा काळ हाती राहतो. हेदेखील या सणाचे वेगळे महत्त्व असण्याचे एक कारण आहे, असे मला वाटते. एरवीदेखील जवळच्या लोकांसवे भेटीगाठी, मौजमजा होत असली, तरी दिवाळीचे काही नियोजन असते. मग त्यात कुठे प्रवासाचे बेत असतात तर कोणासाठी त्याचा आवडत्या पदार्थ रांधण्याचे ठरलेले असते. मला दिवाळीचा \राळ करायला आवडतो. त्यामुळेही मी वर्षभर दिवाळीची वाट बघत असते.
दिवाळी अंक ही दिवाळीच्या दिवसातील आवडत्या गोष्टींमधील एक बाब म्हणावी लागेल. आजही मला लहानपणीचे ते दृश्य आठवते जेव्हा एका हातात \राळाची डिश तर दुसऱ्या हाती दिवाळी अंक असायचा. वाचत वाचत फराळाचा फडशा पाडणारे ते क्षण तेव्हाही आवडायचे आणि आजही तो आनंद घेणे मला आवडते. आजही सगळे नाही पण बरेच लोक तरी आवर्जून दिवाळी अंक विकत घेतात आणि वाचतात. हे करताना एखादी छानशी कथा हाताशी लागते आणि ती दुपार मस्त जाते. या निमित्ताने लिहिणाऱ्या नवनवीन हातांना छान व्यासपीठ मिळते. ते दोन-महिने आधीपासूनच कथा, कविता, ललित लेखनात व्यस्त असतात. लिखाणाच्या माध्यमातून समोर येणारे त्यांचे विचार आपल्यालाही वेगळा विचार देऊन जातात. म्हणूनच दिवाळी खाण्याच्या आनंदाबरोबर बौद्धिक आनंदही देते. दिवाळीचे हे महत्त्वही नजरेआड करून चालणार नाही.
Diwali festival : हे सगळे असले तरी यंदाच्या दिवाळीवर अलिकडच्या काळात अनुभवास येणाèया सामाजिक वातावरणाचा, घडलेल्या घटनांंचा प्रभावही जाणवत आहे. बदलापूरची घटना असो वा कोलकात्याची, या घटनांच्या स्मृती, त्याविषयीची चीड ताजी आहे आणि म्हणूनच मनात एक प्रकारची अस्वस्थताही आहे. शेवटी बाहेर सगळे चांगले असले तरच अंतरंग शांत असते. उलटपक्षी, बाहेरचे वातावरण तणावपूर्ण, कलुषित असेल तर आनंदाला गालबोट लागल्याखेरीज राहत नाही. त्यातच अलिकडेच आमच्या क्षेत्रातील अतुल परचुरेसारख्या मोठ्या अभिनेत्याचे अकाली निधन झाले. त्याआधी आनंद म्हसवेकरसारखे लेखक गेले. रतन टाटांच्या निधनाची बातमी आपण ऐकली. सण साजरा करताना या सगळ्या गोष्टींचा परिणाम जाणवत असतो; कारण आपणही याच समाजाचा एक भाग असतो. त्यामुळेच बाहेर काहीही होऊ दे; मी माझी मजा करणार, असे कोणीही म्हणू शकत नाही. कळत-नकळत तुमच्या दिवाळीवर अशा घटनांची सावली असतेच. म्हणूनच यंदाच्या दिवाळीला विषण्णतेचा हा धागाही आहे. आपल्यातून निघून गेलेले असे चेहरे दिवाळीच्या पृष्ठभूमीवर डोळ्यांसमोर येत आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने विचारमंथन होते. तो धागा धरून बोलायचे तर आता आपण लोकांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे मला वाटते. कारण यामुळे समोर येणाऱ्या परिस्थितीची छायाही दिवाळीवर जाणवते. दिवाळीच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, गप्पागोष्टी होतात. तेव्हा आनंद साजरा करण्याबरोबरच जवळच्या व्यक्तींच्या मनावरील ताण, त्यांना त्रास देणाऱ्या गोष्टीही जाणून घ्यायला हव्यात. त्यांना बोलते करायला हवे. आपण त्यांच्याबरोबर असल्याची ग्वाही मिळायला हवी. असे झाले तर तेदेखील मोकळ्या मनाने सणाच्या आनंदात सहभागी होऊ शकतील. अशा प्रकारे आपली, आजूबाजूच्या लोकांची मानसिक स्थिती सुधारली तर जगणे अधिक सुकर होऊ शकेल. शेवटी आपल्या आनंदात इतरांना सामावून घेणे आणि तो अनुभवणे, व्यक्त करणे मला महत्त्वाचे वाटते. तसेही अलिकडे आपल्या वाट्याला आनंदाचे क्षण सर्रास येत नाहीत. म्हणूनच येणारा असा प्रत्येक क्षण आपण सेलिब्रेट करायला हवा. यातूनच आपल्याला नवी ऊर्जा मिळते, आनंद द्विगुणीत होतो.
त्यातही दिवाळी हा तर ऊर्जा प्रदान करणारा सण आहे. बाकीच्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करण्याचा विचार त्यामध्ये आहे. या दृष्टीनेच मी दिवाळीकडे बघते. या निमित्ताने एके ठिकाणी वाचलेले वाक्य आठवते. लेखकाने म्हटले होते की, आनंदाचे क्षण पांगळे असतात. त्यांना ओढून जवळ आणावे लागते. पण दु:खाचे क्षण मात्र सतत बाजूला उभे असतात. त्यांना बलपूर्वक दूर सारावे लागते. हा विचार मनाला भिडणारा आहे. प्रत्येक जण ही स्थिती अनुभवतच असतो. म्हणूनच आनंदाचा एखादा धागा दिसला तरी तो हाती घट्ट धरला पाहिजे. दु:ख नको असे मी म्हणणार नाही. पण दु:खातून बाहेर येण्यासाठी आनंदाचा धागा हाती असणे गरजेचे असते, हे मात्र नक्की.
Diwali festival : पूर्वीही माणसाला अनेक प्रकारचे दु:ख होते आणि आताही दु:खाची वाढती भाजणीच आहे. अशी परिस्थिती नेहमीच असणार आहे. सुख आणि दु:ख हे जगण्याचे अनिवार्य भाग आहेत. आपण ते नाकारु शकत नाही. खेरीज दु:ख असल्याखेरीज सुखाची किंमतही कळत नाही. शेवटी दु:ख नसणे म्हणजे आयुष्य एखाद्या सरळ रेषेसारखे असण्यासारखे आहे आणि ईसीजीच्या भाषेत सरळ रेघ माणूस जिवंत नसल्याचे सूचत करते. तेव्हा आयुष्यातले चढ-उतार स्वीकारत तुम्ही त्याकडे कसे बघता, त्यातून चांगले कसे काढू शकता हे महत्त्वाचे ठरते आणि त्यानुसार परिस्थिती आकार घेते. दु:खातून बाहेर पडत सकारात्मकतेने आयुष्याला सामोरे जाणेही एक कौशल्य आहे आणि दिवाळीसारखा सण ते शिकवून जातो. म्हणूनच कोणताही धार्मिक रंग नसणारा, रूढी-परंपरांचे अवडंबर नसणारा सण मला विशेष प्रिय आहे.
वर्षभर साजरे होणारे हे सगळे सण लोकांना एकत्र आणतात. त्यांच्यातील एकोपा वाढवतात. पण असे असताना त्यात येणारा कर्कश्शपणा मात्र आता असह्य होतोय. महत्त्वाचे म्हणजे या गोंगाटात आपण उत्सवांना काय सांगायचे आहे, साजरीकरणातून काय साधायचे आहे हेच विसरत चाललो आहोत. कोणत्याही सणाच्या निमित्ताने एकत्र येणे आणि आनंद व्यक्त करणे यामागे दुसऱ्यांना त्रास देण्याचा हेतू नाही. मात्र दुर्दैवाने सध्या हे होत आहे. म्हणूनच यंदाची दिवाळी अंतरात्मा उजळून टाकणारी असावी, अशी इच्छा मी व्यक्त करते. आपल्यापैकी प्रत्येकाने आनंद व्यक्त करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कारण समाजाचे हित जपणेही महत्त्वाचे आहे.
Diwali festival : पूर्वी फक्त दिवाळीलाच घरात गोडाधोडाचे पदार्थ केले जात असत. आता आपण हवे तेव्हा हवे ते आणतो. कपड्यांची खरेदी करतो. तेव्हा त्या अर्थाने दिवाळीचे अप्रूप राहिलेले नाही. पण काही तरी चांगले करण्यासाठी, उत्तम नियोजनासाठी मात्र प्रत्येकाने या काळाचा उपयोग करून घ्यावा. आपल्याप्रमाणेच प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरी व्हावी, हा विचार मनामनात असायला हवा. या गोष्टी पाळल्या तर वंचित, पीडित, गरजूंच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहण्याचे भाग्य आपल्याला प्राप्त होईल आणि दिवाळीचा खरा हेतू साध्य होईल. आपल्या सर्वांच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही हे अत्यंत आवश्यक आहे. इतरांना मदत केल्याने, त्यांचा उजळलेला चेहरा पाहिल्याने आपले सुखही द्विगुणीत होत असते. शेवटी कोणीही एकटे एखाद्या बेटावर जाऊन दिवाळी साजरी करू शकत नाही; यात सामूहिक भावना आहेच. ती लक्षात घेऊ या आणि उत्तम पद्धतीने दिवाळी साजरी करू या. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.