अग्रलेख...
महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्या जोड्यांचा कलगीतुरा आता अपरिचित राहिलेला नाही. त्यातही Sharad Pawar शरद पवार आणि अजित पवार ही काका-पुतण्याची तर अनेकदा गाजली. आताही ती गाजतेच आहे. शरद पवार हे बारामतीच्या पवार कुटुंबाचे प्रमुख. एकेकाळी कुटुंबातील सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे श्रेय शरद पवारांना दिले जायचे. कितीही व्यस्तता असो, सणासुदीला आणि विशेषतः दिवाळीत समस्त पवार कुटुंबीयांनी एकत्र यायचे, ही रीत गेली अनेक दशके चाललेली आहे. गेल्या पाचेक वर्षांत मात्र शरद पवारांनी मोठेपण त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी दावणीला बांधले आहे आणि पवार कुटुंबात त्यामुळे मोठी फूट पडलेली आहे. ताजे वक्तव्य अजित पवार यांचे. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करणे ही माझी चूक होती. आता आमच्याच घरातील युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभे केले. आता घरात कुणी पाडली, असा प्रश्न अजितदादा विचारते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अजितदादांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार युगेंद्र पवार हे अजितदादांचे सख्खे पुतणे. अजित पवार या विषयावर बोलताना गहिवरले होते. परंतु, त्यांच्या गहिवराचा शरद पवार यांच्यावर परिणाम होईल, याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. याचे कारण शरद पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा. पवार यांनीच अजित पवार यांना राजकारणात येण्याची संधी दिली हे खरे असले, तरी त्यांनीच नेहमी अजित पवारांचे पंख छाटणे सुरू ठेवले, हेही खरे आहे. शरद पवारांच्या कन्या, पक्षांतर्गत आणि शक्य असेल तर राजकारणातही सुप्रिया सुळे यांचा वरचष्मा राहावा आणि अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी नेहमीच दुय्यम स्थानावर राहावे, हा उद्देश असतो. त्यांच्या पक्षातून अजित पवार वेगळे झाले ते याच कारणामुळे.
Sharad Pawar शरद पवार त्यांच्या राजकीय कुशाग्रतेसाठी जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते फोडाफोडीसाठीही सुपरिचित आहेत. ताजाच इतिहास पाहायचा म्हटला तर १९९९ साल आठवा. सोनिया गांधी या विदेशी मूळ असण्याच्या मुद्यावर काँग्रेसशी काडीमोड घेऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्याआधीही काही वेळा काँग्रेसमध्ये ये-जा केली होतीच. १९९९ मध्ये एकीकडे सोनिया गांधींची काँग्रेस सोडून निवडणूक लढलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी राज्यात सोनिया काँग्रेसच्या सोबत आला. केंद्रातही संधान बांधले. सत्ता महत्त्वाची. त्यासाठी कधीही फूट पाडणे आणि कधीही कुणालाही जवळ करणे हा काकासाहेब पवारांचा स्वभाव आहे. आपला पक्ष त्यांनी स्वत:च्या दावणीला ठेवला आहे. नावाला लोकशाही वगैरे म्हणतात. पण, शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही नावालाच शिल्लक उरलेली आहे. त्यांचा पक्ष त्यांच्याच भोवती फिरतो. त्यांचा त्यावर जणू एकाधिकार आहे. शरद पवारांचे पुतणे अजित पवार गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात आहेत. त्यांना गेल्या दशकभराहून अधिक काळ मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. पण, कायम उपमुख्यमंत्रिपदीच राहावे लागते आहे. अजित पवार काकासाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निष्ठा ठेवून काम करीत राहिले. पण, काकांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षांना सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शरद पवारांनी अजितदादांच्या आशा अनेकदा पल्लवित केल्या, त्यांना सर्वोच्च पदाच्या जवळ जाऊ दिले. पण, मोका पाहून त्यांना झटका देण्याची संधी कधीही सोडली नाही. शरद पवार, त्यांची सुप्रिया सुळे, पवार कुटुंबातील युवा नेते रोहित पवार आणि आता नवे उमेदवार युगेंद्र पवार एका बाजूला आहेत आणि अजित पवार एका बाजूला आहेत. शरद पवार आपल्या राजकीय रणनीतीसाठी कुटुंबातील सदस्यांचा प्यादे म्हणून वापर करतात, हे सर्वांना कळते. त्यांना पक्षातील नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही, हे धोरणही सर्वांच्या लक्षात आले. त्यांच्या पक्षात फूट पडली. तरीही शरद पवार थांबलेले नाहीत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे फूट पाडणे सुरूच आहे. बारामती ते अहेरी अशी त्यांच्या घरफोडीच्या कारवायांची रेंज. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराणी आणि पक्षांमधील फाटाफुटीत पवारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात दिसतच असतो. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा राजकारणातील स्वार्थी व्यवहार. ते सोडतील, कुणाला जवळ करतील किंवा कुणाच्या जवळ जातील, याचा अंदाजच घेता येत नाहीत.
काहीही झाले तरी आपण सत्तेपासून दूर जाता कामा नये, एवढेच त्यांना हवे असते. त्यासाठी कुटुंबात फूट पडली तरी चालेल आणि पक्षातील मोठे नेते बाहेर पडले तरी चालेल. पवारांची विचारधारा तत्त्वांपेक्षा संधिसाधू स्वरूपाची असते. त्यांना लोक कुशल म्हणत असतीलही. त्यांना ते आवडतही असेल. मात्र, अजित पवारांचे वक्तव्य लक्षात घेता शरद पवारांनी कुटुंबात फूट पाडण्यासाठी सुरू केलेला खेळ कधी ना कधी त्यांच्याही अंगावर येणारच आहे. कारण अल्प-मुदतीच्या फायद्यासाठी दीर्घकालीन आदर्शांचा त्याग करण्याची त्यांची भूमिका चुकीचीच आहे. कधी ते काँग्रेसशी घटस्फोट करून स्वत:चा पक्ष उभा करतात आणि नंतर आघाडी करून सत्ता उपभोगतात. कधी तरी अचानक भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देतात आणि लोकांना पेचात टाकतात. कधी तरी त्यांनीच अजित पवारांना फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीसाठी पाठविले होते, अशी चर्चा होते. कधी शरद पवार महाविकास आघाडीच्या नावाने आलेल्या विचित्र त्रिपक्षीय सरकारचे शिल्पकार असतात. Sharad Pawar शरद पवारांची राजकीय कारकीर्द तशी संपत आलेली आहे. वय झालेले आहे. म्हातारा थकलेला नाही, असे ते वारंवार स्वतःबद्दल म्हणतात. पण, वय कुणालाच चुकत नसते. त्यासोबत येणार्या व्याधी आणि मर्यादा कुणालाच टाळता येत नाहीत. त्यामुळे अजित पवारांना बारामतीत डिवचण्याऐवजी त्यांचे दुखावणे शरद पवारांनी समजून घ्यायला हवे होते. ज्येष्ठ म्हणून हे त्यांचे कर्तव्य आहे. अजित पवार हे शरद पवारांची सोडतील, असे खुद्द अजित पवारांनीही स्वप्नातसुद्धा पाहिले नसेल. पण, त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. त्यांच्यासोबत अन्य नेत्यांनाही पवारांना सोडावेसे वाटले. त्यातून एकीकडे पक्ष फुटला. पक्ष फुटला तर फुटला; शरद पवारांनी कौटुंबिक ऐक्य जपायला हवे होते. अजित पवारांनी चूक कबूल केली आहे. त्यामुळे त्यांना माफ करून बारामतीत त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय शरद पवार घेऊ शकले असते. परंतु, तसे त्यांनी केले नाही.
कारण तो त्यांचा स्वभाव नाही. वरकरणी पुरोगामी, उदारमतवादी अशी त्यांची प्रतिमा असली, तरी ते फार स्वार्थी राजकारणी आहेत. त्यांच्या वाणीत वैचारिक भूमिका दिसत असेल, पण कृतीत ती दिसेलच याची खात्री नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात कृषी आणि संरक्षण मंत्री म्हणून Sharad Pawar शरद पवार यांनी चांगले काम केले. पण, त्यांच्या कामांहून त्यांचे राजकीय डावपेच अधिक वरचढ ठरले आणि त्यांची प्रतिमा बिघडली. त्यांच्यावर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. आता खरे तर त्यांनी थांबायला हवे, नव्या लोकांना संधी द्यायला हवी. कुटुंबात फूट पाडण्यासारखा प्रमाद करायला नको. पण, त्यांनी ते केले. राजकारण आज उद्या नाही. सत्ता आज मिळाली तर उद्या जाऊ शकते. आज पराभूत झाले तरी सत्ता कधीही मिळू शकते. परंतु, आपल्या इतक्या दशकांच्या राजकीय कारकीर्दीत आपली प्रतिमा फूट पाडणारा आणि स्वार्थी नेता अशी होत असेल तर त्याबद्दलची चिंता सर्वप्रथम शरद पवारांना वाटायला हवी. त्यांना आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. ते सतत आहेत. मोठ्या पदांवर राहिलेले आहेत. राजकारण, समाजकारण, क्रीडा, संस्कृती, साहित्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आहे. परंतु, कमालीच्या राजकीय स्वार्थीपणामुळे लोक त्यांच्याबद्दलचे सगळे चांगले विसरतात आणि त्यांना नावे ठेवतात. त्यामुळे आता, इथून पुढे तरी शरद पवारांनी पुन्हा प्रतिमा निर्मितीसाठी काम केले पाहिजे. शरद पवारांसारख्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या कपाळावर फूट पाडण्याच्या आरोपाचा कलंक लागत असेल तर त्यात इतर कुणाचाही दोष नाही. शरद पवार हा दोष स्वीकारणार नसले, तरी तो त्यांचाच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते- काकासाहेब, आता तरी...!