तभा वृत्तसेवा
वर्धा,
Arvi Assembly Constituency : आर्वी विधानसभा मतदार संघात 1985 पासुन काळे परिवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढत होते. 2024 लोकसभा निवडणुकीत आर्वीतून काँग्रेसचा पंजा गायब झाला. आता काळे यांच्या घरातूनही काँग्रेस संपली. मविआच्या उमेदवार मयूरा काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित खा. सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभेत तर व्यासपीठावर काँग्रेसचा एकही पदाधिकारी नसल्याने काळे-काँग्रेस वाद चव्हाट्यावर आला आहे.
आर्वी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार मयूरा काळे यांच्या प्रचारार्थ खा. सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली. आर्वीत काँग्रेसकडून उमेदवारी मागणार्या इच्छूकांची दांडीची चर्चा आता आर्वीत रंगली. मयूरा काळे यांनी उमेदवारी मागितली नसल्याचे खा. अमर काळे यांनी स्पष्ट केलेे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोपाळ मरसकोल्हे, काँग्रेसचे अनंत मोहोड, शैलेश अग्रवाल व बाळा जगताप यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा केली होती. मयूरा काळे यांना तिकीट मिळाल्यावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ते चौघेही नेते सभेला गैरहजर होते. आपल्याला निमंत्रण नसल्याने आपण सभेला गेलो नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान, खा. सुळे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यासाठी मयूरा काळे यांना विजयी करा, असे आवाहन केले. उमेदवार मयूरा काळे यांनी भाषण वाचून दाखवत आटोपते घेतल्याचीही चर्चा होऊ लागली आहे.