मानोरा,
MSEB on farmers शहर आणि तालुक्यातील नागरिकांची जीवन वाहिनी असलेल्या विजेचे उपकरणे देखभाल व दुरुस्ती अभावी लयास गेलेले असल्याने घरगुती आणि शेतीसाठी वीज वापरणार्या शेतकर्यांसोबत दुर्घटना घडल्यावरच वितरण कंपनी प्रशासनाला जाग येणार काय असे सवाल कारखेडा येथील धोकादायक रोहित्रामुळे संतप्त शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. खरीप हंगाम संपन्यात जमा असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी उपलब्ध असलेले शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरासाठी आवश्यक असलेल्या कृषी पंपांसाठी (इलेट्रिक) विजेवर अवलंबून असतात. कारखेडा वरोली रस्त्यावरील शेत शिवारात वीज वितरण कंपनी प्रशासनाकडून शेतकर्यांना कृषी पंपासाठी आवश्यक असलेल्या विज वितरणासाठी उभारलेले रोहित्र देखभाल व दुरुस्ती अभावी धोकादायक बनलेले आहे. रोहित्राचा बॉस उघडा असून त्यामध्ये असलेले फ्युज पूर्णपणे खराब झालेले आहेत.
MSEB on farmers फ्युज बदलण्याची मागणी करूनही वीज वितरण कंपनी प्रशासनाकडून याची दखल घेण्यात येत नाही. वीज वितरण करणार्या या रोहित्र केबल सुध्दा पूर्णपणे जळून खाक झालेले असून, याची जोडणी करण्यासाठी कधीही या विभागाचा कर्मचारी इकडे फिरकत नाही, त्यामुळे शेतकर्यांना स्वतः ही तांत्रिक कामे करावी लागतात. ज्यामुळे चुकून एखादा अपघात घडल्यास शेतकर्यांच्या जीवाचा बरे वाईट होण्याचा धोका नाकारता येत नाही.वीज वितरण कंपनी प्रशासनाने अपघात घडण्याची वाट न पाहता तातडीने पावले उचलण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.