संत प्रबोधन
हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाची थोर ॥
किंबहुना चराचर | आपणची जाहला ॥
Saint Tukaram : अशी विश्वात्मक दृष्टी ज्या संतांची होती, त्या संतांना समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आपलेपणा होता. जिव्हाळा होता. त्यांना हे सर्व विश्व आपले वाटत होते. विश्वबंधुत्वाची कल्पना त्यांच्या हृदयामध्ये होती. म्हणूनच संतांना समाजातील लोकांविषयी कळवळा होता. समाजातील दुःखी लोक पाहून त्यांचे अंतःकरण करुणेने भरून जात असे. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते भोळ्याभाबड्या लोकांना दुःखाचे कारण आसक्ती आहे, असे सांगत. दुःखाची निवृत्ती व परमसुखाची प्राप्ती करण्यासाठी सदाचार आवश्यक आहे, अशी शिकवण ते समाजाला देत असत.
बुडती हे जन न देखवे डोळा |
म्हणूनही कळवळा येत असे ॥
लोकांना सन्मार्ग दाखविणे हेच आपल्या जीवनाचे परम कर्तव्य आहे, असे संत सांगत. आपल्या जन्माचे ध्येय काय? या जगामध्ये येण्याचे कारण काय? याबद्दल ते सांगतात, लोककल्याण व लोकांना सन्मार्ग दाखविणे हेच जीवनाचे ध्येय आहे. या संसारातील जीव कसे अंधकाराच्या दुःखात बुडून गेले आहे. ते पाहून सहृदयी संतांचे मन हेलावून जाते. लोकांना मोलाचा संदेश देताना ते सांगतात-
उपकारासाठी बोलो हे उपाय |
येणेंविण काय आम्हां चाड ॥
बुडती हे जन न देखवे डोळा |
म्हणवुनी कळवळा येतसे ॥
तुका म्हणे माझे देखतिल डोळे |
भोग देते वेळे येईल ॥ (तु. गा. ९४२)
Saint Tukaram : समाजामध्ये जीवन जगताना परोपकार करा, तोच खरा मानवधर्म आहे, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. पाप आणि पुण्याची अगदी साधी व्याख्या त्यांनी सांगितली आहे.
पुण्य परोपकार पाप ते परपीडा | आणिक नाही जोडा दुजा यासी ॥
सत्य तोचि धर्म असत्य ते अकर्म |
आणिक हे वर्म दुजे ॥
गति तेचि मुखीं नामाचे स्मरण |
अधोगती जाण विन्मुखता ॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास |
नरक तो उदास अनर्गळा ॥
तुका म्हणे उघडे आहे हित घात |
जया जे उचित खरा तैसे ॥
सामान्य माणसांना कठीण वाटणारी पाप आणि पुण्याची संकल्पना त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने मांडली व गहन असे तत्त्वज्ञान अगदी साध्या शब्दात लोकांसमोर मांडले. परोपकाराने वागा यासारखे दुसरे पुण्य नाही. परोपकारी वृत्तीच तुमचे पुण्य वाढवेल. त्यासाठी कर्मकांड, पूजा-अर्चा करण्याची गरज नाही, असे तुकोबा म्हणतात.
संतांनी आपल्या पारमार्थिक जीवनसाधनेमध्ये परोपकारी वृत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. देहभान विसरून ते सर्वांशी परोपकारी वृत्तीने वागतात. त्यासाठी त्यांनी ‘सर्वांभूती या दिव्य अनुभवाचा आनंद प्राप्त केला. हेच त्यांच्या भक्तिसाधनेचे परमोच्च शिखर आहे. परोपकारही असा की, ज्याचा आपल्याशी अर्थार्थी काहीही संबंध नाही. अशा व्यक्तींवरही दया दाखवून उपकार करणे होय. धन्यवादाच्या साध्या दोन शब्दांचीही त्यांनी अपेक्षा न ठेवता गरजवंताची काया-वाचा-मनाने सेवा करणे होय, असा दया व परोपकार या जीवनमूल्यांचा संदेश ते कृतीतून अभंगाद्वारे देतात.
तुज व्हावा आहे देव | तरि हा सुलभ उपाव ॥
तुका म्हणे फार | थोडा तरी परउपकार ॥
Saint Tukaram : परोपकारासाठी संतांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला. परोपकारासाठी त्यांनी कधीही स्वतःच्या कुटुंब आणि स्वार्थाचा विचार केला नाही. भूतदयेच्या उज्ज्वल भावनेत त्यांनी एका अनाथ बाईला स्वतःच्या पत्नीचे एकुलते एक असणारे देऊन टाकले. स्वतःच्या मुलांकरिता मळ्यातून डोक्यावर आणलेले ऊस त्यांनी गावातील मुलांनी मागताच सर्वांना वाटून दिले. जेव्हा पत्नी जिजाबाईने याबाबत विचारणा केली, तेव्हा ते उत्तर देतात ते मोठे मार्मिक आहे. ते म्हणतात, ‘अगं! ती सर्व मुले आपलीच आहेत.’ संतांचा आपपरभाव मावळला होता. भूतदया हेच त्यांचे भांडवल होते. भूतात्मा तोच परमात्मा शास्त्रवचनावर आधारित त्यांची वर्तणूक आहे. याच परमार्थ साधनेतून त्यांनी सर्वात्मक ईश्वराची परमसेवा साधली आहे. संत एकनाथांनीसुद्धा जीवनात आवश्यक असणार्या भूतदया व परमार्थाचा समन्वय मांडला आहे.
सद्भावो जोडल्या सर्वभूती |
तेणे प्रगटे माझी चौथी भक्ती |
जीच्या पोची चारी मुक्ती |
सदा लागती स्वानंदे ॥
सर्व संतांनी सर्वाभूती भगवद्भाव ठेवून सेवेतून चौथ्या भक्तीची साधना साध्य केली होती. म्हणूनच त्यांची सामाजिक जीवनातील वाटचाल ही सामान्याकडून असामान्याकडे झाली होती. या परोपकाराच्या साधनेमुळेच ते सामाजिक जीवनात संतत्वाला पोहोचले होते. सामान्य माणसाला, संसारामध्ये गुरफटलेल्या स्वार्थी जिवाला ते कदापि शक्य नसते. त्यासाठी त्यांचा स्वार्थ आडवा येतो. त्यामुळे आज जी स्वार्थी वृत्ती समाजामध्ये बोकाळलेली आहे, संत तुकोबांची कृती व त्यानंतर त्यांनी केलेली अभंग वाङ्मयाची उक्ती समाजामध्ये परोपकार धर्म जीवनमूल्य रुजविण्यासाठी एक आदर्श जीवनमार्ग आहे. महिपतबाबांनी संत तुकारामांच्या परोपकारी वृत्तीचा अधिक खुलासा केला आहे-
तुक्याची ती निष्काम वृत्ती | प्राप्त व्हावया रुक्मिणीपति ॥
परोपकारी वेंचितसे शक्ती | कैशा रीती ते ऐका ॥
कोणी पांथस्थ वाटेकरी अकस्मात गाठ पडली जरी ॥
त्याचे ओझे घेऊनी शिरी | विसावा क्षणभरी त्यास द्यावा ॥
पर्जन्य मार्गी लागता सबळ | पांथस्थ गावात पाहती स्थळ |
तयांसि दाखवी चावडी देऊळ | नातरी तात्काळ ने घरा ॥
पंथ क्रमितांचि लवलाहे | यात्रेकर्याचे सुजले पाय ॥
मग उष्ण पाणी करोनि पाहे | देह निजांगे ॥
गायी वृषभांसी निर्बलपणी | मोकलोनि देती निर्दय धनी ॥
तयासी हाते कुरवाळोनी | चारा-पाणी घालीतसे ॥
मैदा साखर आणि घृत | एके जागा करोनी ठेवित ॥
मुंगीयांच्या धावी घालीत | ईश्वर प्रीत्यर्थ नित्यकाळी ॥
अणुरेणुपर्यंत जाणा | भूतमात्री धरितसे करुणा ॥
हिंसा घडे ते कर्म जाणा सहसाही मना नावडे ॥
उष्णकाळी झालीया उबारा | कीर्तनामाजी घालीतसे वारा ॥
अन्न न मिळता क्षुधातुरा | प्रयत्ने मेळवूनी दे त्यासी ॥
उषःकाळी जीवन वाटेवर | नसता उपाय करीतसे थोर ॥
घागर भरोनी सत्वर | मार्गावर ने तेथे ॥
पांथस्थासि व्याधी मार्गी होत | जवळी नसता सुहृद आप्त ॥
राहवोनि देउळात | औषध पथ्य करवीतसे ॥
(तुकाराम चरित्र - महिपतबाबा ब्रह्ममूर्ती संत ज्ञानदेव-तुकाराम पृ. ३८६)
Saint Tukaram : संतांचा परोपकार सेवेचा नामनिर्देश त्यांच्या अभंगातून दिसत नाही. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख वृत्तीला त्याचा उल्लेख करणे योग्यही वाटले नसावे. त्यामुळे त्यांच्या परोपकारी वृत्तीसाठी महिपतबाबांनी दिलेल्या रसाळ ओव्यांचा खुलासा प्रमाण मानतात.
जे का रंजले गांजले
आपल्या जे कोणी सुखाने रंगलेले असतील, दुःखाने गांजलेले असतील त्या सर्वांना जो ‘आपले आहेत’ असे म्हणतो, तोच खरा साधू आहे, असे ओळखावे आणि अशांच्या जवळच देव असतो, असे जाणावे. लोणी जसे आतून-बाहेरून मऊ असते. अगदी त्याचप्रमाणे संताचे चित्तदेखील मऊ असते. ज्यांना कोणीही आश्रय न देता झिडकारतात अशा अनाथांना ते आपल्या स्थान देतात. जे प्रेम ते स्वतःच्या मुलांवर करतात. तशाच प्रकारचे प्रेम ते दास दासींवर करीत असतात. संत तुकोबा म्हणतात, अशांबद्दल काय सांगावे, ते साक्षात परमेश्वरच आहेत.
जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा ॥
मृदु सबाह्य नवनित | तैसे चित्त ॥
ज्यासि आपंगिता नाही | त्यासि धरी जो हृदयी ॥
दया करणे पुत्रासी | ते चि दासा आणि दासीं ॥
तुका म्हणे सांगू किती | तो चि भगवंताची मूर्ती ॥
संत तुकारामांनी प्रस्तुत अभंगातून खर्या साधूची ओळख पारखण्याची कसोटी सांगितली आहे. परोपकारी वृत्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेली आहे. सुखाने हृदय उचंबळून जाते. दुःखाने ज्याचे हृदय हेलावून जाते. तोच इतरांच्या भावनेशी समरस होऊ शकतो. त्यालाच फक्त साधू समजावे व त्याच्याजवळच भगवंताचा वास असतो, असे समजावे.
लहान-मोठा हा भेद न मानता पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे सर्वांना सारखीच शांती देतो; अगदी त्याचप्रमाणे परोपकारी उत्तम अथवा अधम हा भाव मनात न आणता दयार्द्र दुःखितांचे दुःख निवारण करतो. पाण्याचा स्थायिभाव स्वतःचे अस्तित्व नाहीसे करून आपल्या ओलाव्याने सुकू लागलेल्या गवताचे रक्षण करणे आहे. तद्वत सन्मुख आलेल्या पीडितांचे जो रक्षण करतो. कळवळीने श्रमपरिहार करताना जो आपले सर्वस्व देऊनही काहीच दिले नाही, असे मानतो त्यास साधू समजावे.
Saint Tukaram : वाहत आलेले पाणी ज्याप्रमाणे वाटेतील खळगे भरल्याशिवाय जसे पुढे नाही, तसेच समोर आलेल्या श्रांत, गरजू जीवाला संतोषित केल्याशिवाय तो पुढे जात नाही. पायाला काटा रुतला असता जीवाला जशी व्यथा होते, तसेच परोपकारी जीवांचेही पुढीलांचे दुःख पाहून मन कळवळते. संत तुकारामांच्या भूतदया-परोपकाराचे स्वरूप असेच होते. परंतु, त्यांच्या परोपकारी वर्तनाचे मर्म तत्कालीन समाजाला कळले नाही. त्यांच्या भूतदयेचे कोडे लोकांना उमगले त्यामुळे लोकांनी त्यांना वेड्यात काढले होते. लोकांनी त्यांचे हसे केले होते. त्याकडे तुकोबांनी कधीही लक्ष दिले नव्हते. तुकारामांनी जशी द्रव्येषना सोडली होती. त्याप्रमाणेच लोकेषणाही सोडली होती. तुकोबा माणसांचे मालक झाले नाहीत. तर, ते खर्या अर्थाने सर्वांभूती वास करणार्या भगवंताचे सेवक झाले होते.
आपुलियाचा विसरभोळा | गोविंद कळा कौतुकें ॥
म्हणे हांसे जन | नाही कान ते ठायी ॥
आज मात्र Saint Tukaram संत तुकारामांनी सांगितलेल्या परोपकाराची आवश्यकता सर्व जगाला आहे. नाही तर, अपघात झाल्यानंतर विव्हळणार्या जीवाला सोडून आपल्या मार्गाने जाणारी माणसे पाहायला मिळाली नसती. अशा प्रकारची परोपकाराच्या अभावाची अनेक उदाहरणे देता येतील. काया-वाचा-मनाने अनाश्रिताला मदत करणे हा परोपकार समजावा. त्यासारखे दुसरे कोणतेही पुण्यही नाही. त्याचबरोबर निरपराधी जीवाला अनाठायी दुःख देणे हे मोठे पाप समजावे. नीतिशास्त्राच्या दृष्टीने या पाप-पुण्याला कशाचीही जोड नाही. वेदविहित सत्य धर्माचे आचरण हाच खरा स्वधर्म आणि असत्य धर्माचे आचरण हा अधर्म मानावा, असा उल्लेख पूर्वमीमांसाशास्त्रात आहे. सर्व धर्मांचे सार हेच आहे. हरिनाम चिंतन हाच इह-परलोकी सद्गतीचा आहे. हरिनामाला विन्मुखता ही अधोगती समजावी, असा मुक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे. संत सहवास (ज्ञानसंपादन) म्हणजे स्वर्गवास आहे. तर, दृष्ट प्रवृत्तींशी तादात्म्य ठेवणे हाच नरकवास समजावा. आपले हित आणि अहित कशात आहे ते समजणे तीच विवेकबुद्धी श्रेष्ठ समजावी. आता ज्याला जसे योग्य वाटेल तसे त्याने आचरण ठेवावे.
बुडती हे जन न डोळा | म्हणूनही कळवळा येत असे ॥
असा त्यांचा विचार होता. अशा या संतांचा रंजल्या-गांजल्यांचा विचार हा मानवतेचा विचार होता, असे आपल्याला त्यांच्या उक्ती व कृतीतून जाणवते.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००