चटप, गावतुरे, जीवतोडे शिवाय अन्य तिसरा उमदेवार निष्प्रभच!

Chandrapur-Assembly सर्वाधिक मतांनी मुनगंटीवार तर धडपडत भोंगळे विजयी

    दिनांक :26-Nov-2024
Total Views |
निवडणूक वार्तापत्र
 
- संजय रामगिरवार
Chandrapur-Assembly भाजपाचे सुधीर मुनंटीवार, बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार व करण देवतळे, देवराव भोंगळे यांनी अनुक्रमे बल्लारपूर, चिमूर, चंद्रपूर, वरोरा व राजुर्‍याचा गड जिंकला. तर काँगे्रसचे विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीचा गड कसाबसा राखला. त्या ठिकाणी भाजपाच्या क्रिष्णा सहारे यांनी दिलेली झुंज कायम लक्षात राहील अशीच आहे. या सार्‍यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण त्याचवेळी तिसरा उमदेवार म्हणून अ‍ॅड. वामन चटप, डॉ. अभिलाषा गावतुरे व मुकेश जीवतोडे या तिघांच्याही लढतीचे कौतुक केले पाहिजे. कारण या तिघांशिवाय कुणीही तिसरा उमेदवार आपली चुणूक दाखवू शकला नाही. वंचित, बसपा, मनसे आदींचे निराशाजनक प्रदर्शनाच्या पृष्ठभूमीवर या तीन अपक्ष लढवय्यांचे योगदान उल्लेखनीय ठरते.
 
 
 
 
Chandrapur-Assembly
 
 
 
 
Chandrapur-Assembly जिल्ह्यात काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढत होईल असे अंदाज बांधले जात होते. पण खर्‍या अर्थाने, सार्‍याच लढती या थेटच झाल्या. केवळ राजुरा विधानसभा मतदार संघ यास काहीसा अपवाद ठरला. कारण तेथील लढत वामन चटप यांच्यामुळे चुरशीची झाली. वरोड्यात भाजपाची थेट लढत अपक्ष उमेदवार असलेल्या मुकेश जीवतोडे यांच्याशी झाली. उर्वरित बल्लारपूर, चंद्रपूर, चिमूर व ब्रम्हपुरी येथे भाजपा व काँगे्रस हे दोन राष्ट्रीय पक्ष थेटच भिडले. बल्लारपुरात अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी चुणूक दाखवली आणि 20 हजाराच्यावर मते घेतली. तिसरा उमेदवार म्हणून चटप यांनी सर्वाधिक 55 हजार 90 मते मिळवली. त्या खालोखाल मुकेश जीवतोडे यांनी 49 हजार 720 मतांवर आपला दावा सिध्द केला. या तिघांशिवाय अन्य कोणत्याही मतदार संघात कुठल्याही तिसर्‍या उमेदवाराला आपला प्रभाव दाखवता आला नाही.
 
 
 
 
Chandrapur-Assembly नाही म्हणायला, वरोडा क्षेत्रात प्रहार जनशक्ती पार्टीचे अहेतेशाम अली यांनी 20 हजार 723 मते घेतली, तरीही त्यांच्यामुळे निकालावर काही परिणाम झाला असे म्हणता येत नाही. राजुरा विधानसभा मतदार संघात गोंडवाना गणतंत्र पक्षाचे गजानन जुमनाके यांनीही 28 हजार 529 मते घेतली आणि त्यामुळे निकालावर परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी, त्यांच्यापेक्षा जास्त मते 2019 च्या निवडणुकीत त्यांचेच वडील गोदरू पाटील जुमनाके यांनी त्याच ठिकाणी, त्याच पक्षाकडून घेतली होती. ती मते तब्बल 43 हजार 306 एवढी होती आणि त्यामुळे निश्चितपणे तेव्हाचा निकाल प्रभावित झाला होता. त्यामुळे यंदा त्यांचे पूत्र गजानन जुमनाके हे प्रभावी ठरले, असे अजिबात म्हणता येत नाही.
 
 
Chandrapur-Assembly जिल्ह्यातील सहाही मतदार संघात सर्वाधिक 25 हजार 985 मतांची आघाडी घेत बल्लारपुरातून सुधीर मुनंटीवार यांनी विजयाची पताका रोवली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राजकारण करणार्‍या देवराव भोंगळे यांना मात्र आपल्या गुरूवर्यांच्या विजयी पासंगालाही पुरता आले नाही. जिल्ह्यात सर्वात कमी मताधिक्याने म्हणजे, अवघ्या 3 हजार 54 मतांनी भोंगळेंना राजुर्‍याची जागा राखता आली. मुनगंटीवारांच्या खालोखाल 22 हजार 804 मतांची आघाडी घेत किशोर जोरगेवार या त्यांच्या दुसर्‍या शिष्याने चंद्रपुरात बाजी मारली. त्यानंतर 15 हजार 450 एवढ्या मताधिक्याने वरोड्यात करण देवतळे, ब्रम्हपुरीत 13 हजार 971 मतांनी विजय वडेट्टीवार, तर चिमुरात 9 हजार 853 मतांच्या आघाडीने बंटी भांगडिया विजयी झाले.