झारखंड निवडणूक निकालाचा अन्वयार्थ

    दिनांक :28-Nov-2024
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
Assembly elections : झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आटोपल्या. दोन्ही राज्यांतील निकालात काही साम्य आहे. पहिले म्हणजे दोन्ही राज्यांतील सत्ताधारी आघाड्या आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्या. महाराष्ट्रात महायुतीने नेत्रदीपक यश मिळविले, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या इंडिया आघाडीने बहुमत मिळविले. दोन्ही राज्यांतील निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही राज्यात लाडकी बहीण योजनेचा प्रभाव पडला. महाराष्ट्रात ही योजना ‘लाडकी बहीण’ नावाने, तर झारखंडमध्ये ही योजना ‘मईया सन्मान योजना’ नावाने राबविण्यात आली. झारखंडमध्ये ही योजना सुरू करताना सुरुवातीला एक हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यात आले; आल्यानंतर ही राशी २५०० रुपये करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने दिले. महाराष्ट्रात या योजनेतून महिलांना १५०० रुपये मिळाले. महायुतीची सत्ता आल्यानंतर ही राशी २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले.
 
 
pti345a
 
या दोन राज्यांतील निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस पक्षाला दोन्ही राज्यांत प्रत्येकी १६ जागा मिळाल्या. झारखंडमध्ये २०१९ काँग्रेसला १६ जागाच मिळाल्या होत्या. गमतीचा भाग म्हणजे दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री दाढीधारी होते. इंडिया आघाडीत असणार्‍या राजदने या निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. विशेष म्हणजे बिहारमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राजदला एकही जागा जिंकता आली नाही. झारखंडमध्ये काँग्रेस असो की राजद, त्यांना जे यश मिळाले, त्यात त्यांचे फारसे कर्तृत्व नाही. झामुमोचे म्हणून मतदारांनी त्यांना पसंती दिली. झारखंडमध्ये झामुमोचे हेमंत सोरेन यांचा शपथविधी २८ नोव्हेंबरला होत असताना महाराष्ट्रात मात्र महायुतीच्या मुख्यमंत्र्याची अद्याप निवड झाली नाही.
 
 
Assembly elections : निवडणुकीच्या काही महिने आधी राज्यातील भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली, त्यांना तुरुंगातही जावे लागले. अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत सोरेन यांनी या पदाची कायम राखली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे धुळीस मिळविली नाही. पाच-सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर सोरेन यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगात जाण्याच्या अगोदर सोरेन यांनी आपल्या जागी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेते चम्पई सोरेन यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. जामिनावर बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन यांनी चम्पई सोरेन यांना हटवून मुख्यमंत्रिपद स्वत:कडे यामुळे नाराज होत चम्पई सोरेन यांनी झामुमोचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता.
 
 
झामुमोचे संस्थापक शिबू सोरेन यांचे ज्येष्ठ पुत्र दुर्गा सोरेन यांचे काही वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. तोपर्यंत दुर्गा सोरेन हेच शिबू सोरेन यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते. दुर्गा सोरेन यांच्या निधनानंतर हेमंत सोरेन यांचा झामुमोच्या राजकारणात झाला. दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता सोरेन यांना झामुमोच्या राजकारणात डावलण्यात आले. त्यामुळे दुखावलेल्या सीता सोरेन यांनीही भाजपात प्रवेश केला. भाजपाजवळ बाबुलाल मरांडी आणि चम्पई सोरेन असे दोन माजी मुख्यमंत्री तसेच सोरेन घराण्यातील सीता सोरेन होते. पण हे तिघेही हेमंत सोरेन यांचा राज्यातील विजयरथ रोखू शकले नाही.
 
 
८१ सदस्यीय विधानसभेत हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने ५७, तर भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला २४ जागा मिळाल्या. झारखंड मुक्ती मोर्चाने सर्वाधिक म्हणजे ३४ जागा जिंकल्या. काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. राजदने ५ तर भाकपा मालेने २ जागा जिंकल्या. रालोआत भाजपाने सर्वाधिक म्हणजे २१ जागा जिंकल्या. लोजपा आणि ऑल झारखंड स्टुडंड युनियन या प्रत्येकी एक जागा जिंकता आली. भाजपाला राज्यात बहुमत मिळविता आले नसले, तरी भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली नाही. यावेळी भाजपाला ३३.२८ टक्के मते मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी ३३.२७ होती. २०१४ मध्ये भाजपाला ३१ टक्के मते मिळाली होती. इंडिया आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाला २३.२० टक्के मते मिळाली काँग्रेसला १५.४५ टक्के. २०१९ च्या निवडणुकीत झामुमोने १८.७२ टक्के तर काँग्रेसला १३.८८ टक्के मते मिळाली होती.
 
 
Assembly elections : भ्रष्टाचाराच्या आरोपात आपल्याला झालेल्या अटकेचा संबंध हेमंत सोरेन यांनी आदिवासींच्या अस्मितेशी जोडला. भाजपा आदिवासी विरोधी असल्याचा तसेच आदिवासीबहुल झारखंड राज्याला केंद्र सरकार निधी देत नसल्याचा आरोप केला. दुसरीकडे भाजपाने ‘रोटी, बेटी आणि माटी’ची देत आपल्यालाही आदिवासी अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित करत राज्याच्या काही भागात लोकसंख्येत असंतुलन निर्माण झाल्याचा आरोप केला. हे बांगलादेशी घुसखोर आदिवासींचा रोजगार म्हणजे रोटी हिरावतात, त्यांच्या मुलींशी लग्न करतात म्हणजे बेटी पळवतात आणि माटी म्हणजे आदिवासींच्या जमिनींवर कब्जा करतात असा प्रचार केला, पण त्यावर राज्यातील विश्वास ठेवला नाही. भाजपाला त्याचा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत आदिवासींसाठी राखीव असलेल्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला होता. यावेळी राज्यातील आदिवासींसाठी राखीव २८ पैकी २७ विधानसभा मतदारसंघात भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीत भाजपाशी अशीच स्थिती होती. पण महाराष्ट्रात भाजपाने लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त त्याचे फळ विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्याला मिळाले, पण झारखंडमध्ये भाजपाला यात यश आले नाही. महाराष्ट्रात भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना जे जमले, ते झारखंडमध्ये केंद्रीय मंत्री शिवराजसिंंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांना जमले नाही. झामुमोच्या हेमंतने भाजपाच्या हिमंतावर आपल्या राजकीय मात केली, असे निवडणूक निकालावरून दिसून आले. राहुल गांधी काँग्रेसला निवडणूक, मग ती लोकसभेची असो की विधानसभेची, जिंकून देऊ शकत नाही, हे आधी लोकसभेच्या तसेच नंतर हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये काँग्रेसला जे यश मिळाले, त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कोणतेच योगदान नाही, झामुमोचे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. 
 
- ९८८१७१७८१७