अग्रलेख...
Bangladeshi atrocities : बांगलादेशातील हिंदूंना प्रताडित करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. जगभरातील हिंदूंनी आवाज उठवला आहे. भारतात तर त्याविरुद्ध आवाज उठवून, तेथील हिंदूंना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, बांगलादेशचे विद्यमान सरकार हिंदू कसे कचाट्यात सापडतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे कसे दाखल होतील, त्यांना तुरुंगवासाची हवा कशी दाखवली जाऊ शकेल, हिंदूंना देशद्रोही कसे ठरवले जाऊ शकेल, याच प्रयत्नात आहे. खरे तर पाठीवर जिथे कुठे हिंदू आहेत तेथे ते अतिशय शांतपणे आपली नोकरी अथवा व्यवसाय, त्या-त्या देशातील कायद्यानुसार आणि त्या देशातील घटना प्रमाण मानून करीत आहेत. हिंदू समाजाच्या शांतता आणि सामाजिक सौहार्दतेचा गुण ध्यानात घेऊनच अनेक देशांत हिंदूंचे निरनिराळे सण मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला लागले असून, हिंदूंना आपल्या धर्मानुसार पूजा पद्धतीचा दिला गेला आहे.
जगाच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यास हिंदूंचे त्या त्या देशाच्या विकासात आणि आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान असल्याचे स्पष्ट होते. पण बांगलादेशातील मुस्लिम नागरिक आणि तेथील इस्लामी शासक हिंदूंना पूजा पद्धतीचे स्वातंत्र्य देण्यास कुचराई करीत आहे. एवढेच कमी की काय, म्हणून हिंदूंवरील अत्याचारांकडे डोळेझाक करण्याचे कामही करीत आहे. अशी प्रकरणे उघडकीस आली असून त्यातील नुकतेच घडलेले एक प्रकरण नमुन्यादाखल चर्चेला यायला हवे. हिंदू समाजात जनाजागृती करणारे आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले बांगलादेशमधील हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना बांगलादेशमधील न्यायालयाने जामीन नाकारून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. त्यांच्या अटकेविरोधात चितगाव आणि ढाक्यात आंदोलने उभी राहिली नसती नवल. भारतीय आंदोलकांनी रस्त्यारस्त्यांवर धरणे आणि घोषणा देत चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांच्या सुटकेची मागणी केली आहे. भारताने या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली असून, हिंदूंसह सर्व अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची हमी बांगलादेशने द्यावी, अशी मागणी केली आहे. तथापि, त्यांच्या अटकेबाबत भारतातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साधलेली चुप्पी अनाकलनीय आहे. बांगलादेशात वावगे घडतच नाही, अशी स्वतःची धारणा त्यांनी बनवून टाकली आहे.
Bangladeshi atrocities : बांगलादेश पोलिसांनी सोमवारी चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाक्यामधील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून अटक केली. सम्मिलिता सनातनी जोत या हिंदू संघटनेचे नेते असलेले दास चितगावकडे जात होते. त्यांच्यासह १८ जणांविरोधात ३० ऑक्टोबर रोजी खटला दाखल करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. २५ ऑक्टोबर रोजी हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शेख हसीना सरकार कोसळल्यापासून ५० जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यकांवर २०० हून अधिक हल्ले झाले आहेत. सध्या शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. दास यांच्या अटकेच्या मुद्यावर चिंता व्यक्त करून बांगलादेश सरकारकडून हिंदूंसह सर्व अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यानुसार बांगलादेशात हिंदूंची कशी गळचेपी होत आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. देशातील सत्तापरिवर्तनानंतर हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर बांगलादेशमधील अतिरेकी घटकांकडून हल्ले करण्यात आले आहेत. अल्पसंख्यकांची आणि व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ आणि लूटमारीच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत. तसेच, बांगलादेशमधील मंदिरांत चोरी आणि देवतांच्या विटंबनेच्या घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने या घटनांतील दोषी मोकाट फिरत आहेत आणि वैधानिक मार्गाने शांततापूर्ण मागणी करणार्या धार्मिक नेत्याविरुद्ध आरोप केले जात आहेत. विशेष बाब म्हणजे दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ शांतिपूर्ण निदर्शने अल्पसंख्य समाजाच्या लोकांवरही हल्ले होत असून, त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन बिचकत आहे. शांतिपूर्ण निदर्शकांवरच अवैध मागण्या करीत असल्याचे आरोप जडले जाऊ लागले आहेत. दास यांच्या अटकेबाबत इस्कॉनने भारत सरकारकडे मागणी करून त्यांच्या सुटकेचा मुद्दा बांगलादेशच्या सरकारपुढे उपस्थित करण्याची विनंती केली आहे. इस्कॉनची मंदिरे अनेक देशांत उभारली गेली ती वास्तुकलेचा नमुना म्हणूनही ओळखली जातात. विविध देशांतील भिन्नधर्मीय लोक इस्कॉन चळवळीशी आपले नाते जोडून, श्रीकृष्ण भक्तीतून आत्मिक सुखाचा आनंद घेत आहेत. कुठल्याच देशात इस्कॉनचा संबंध दहशतवादाशी जोडला गेल्याचे उदाहरण नाही. याउपरही बांगलादेशातील एका नेत्याने केलेल्या आरोपावरून इस्कॉनच्या एका प्रभावशाली नेत्याला अटक होणे, ही बाब दुर्दैवीच म्हटली जायला हवी.
Bangladeshi atrocities : आता पाकिस्तानी आयएसआयच्या कचाट्यात पुरता सापडला असून, त्याने देशात वेगाने इस्लामी कायदे लावण्याचा सपाटा लावला आहे. स्वातंत्र्यापूर्वी या देशात अस्तित्वात असलेल्या हिंदूंची संख्या घटून काही लाखांपर्यंत मर्यादित झाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना सत्ताच्युत झाल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. देशात विकास आणि पायाभूत सुविधांची निर्मिती होण्याऐवजी त्याच्याभोवतीची उन्मादी तत्त्वांची मगरमिठी अधिकच घट्ट होत चालली आहे. येत्या काळात पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशालाही भिकेचे डोहाळे लागले तर नवल वाटून घेऊ नये. पाकिस्तानात ज्याप्रमाणे ईशनिंदेचा दानवी कायदा अस्तित्वात आहे, त्याच धर्तीवर येथेही इस्लाम आणि मोहम्मद पैगंबराबाबत टीका-टिप्पणी करणार्याला मृत्यूची शिक्षा देण्याची तरतूद करण्याची तयारी सुरू झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानप्रमाणेच या नव्या येणार्या कायद्याच्या आडून अल्पसंख्यक हिंदूंना प्रताडित केले जात आहे. बांगला सरकारच या कायद्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे, असे नसून बांगलादेश उच्च न्यायालयाच्या एका पीठानेही याबाबत एक निर्णय देऊन, कुराण तथा मोहम्मद पैगंबराबाबत विनाकारण भडकाऊ टिप्पणी करणार्याला मृत्युदंड द्यायला हवा, असे मत नोंदविले आहे. संसदेने याबाबत विचार करावा, शिफारस खंडपीठाने केली आहे. त्यामुळे इस्लामविरोधासाठी मृत्युदंडाचा कायदा येत्या काळात तेथे अस्तित्वात येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. न्यायालयाने अशा प्रकारचे मत नोंदविणे, याकडे बांगलादेशच्या संपूर्ण इस्लामीकरणाचा घाट, या दृष्टीने बघितले जाऊ लागले आहे. युनूस यांच्या अंतरिम सरकारने यापूर्वीच इस्लामीकरण आणि शरिया कायद्याच्या अस्तित्वाचे संकेत दिलेले आहेत. यातूनच तेथील मुस्लिम आणि पाकिस्तानी आयएसआयच्या कात्रीत सापडलेल्या सरकारलाही हिंदूंच्या रक्ताची चटक लागलेली आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर देशातील जिहाद्यांनी सर्वत्र जो हैदोस घातला तो जगाने अनुभवला आहे. हिंदूंची घरे जाळून टाकणे, हिंदू कलाकारांना मारझोड करून त्यांच्या घरांची लुटालूट करणे, हिंदू मुली-बायका यांच्यावर सामूहिक अत्याचार, हिंदू परिवारांना त्यांच्या घरातून लावत त्यांच्या संपत्तीचा कब्जा घेणे, या प्रकारांकडे हताशेने बघण्यापलीकडे भारत काहीही करू शकलेला नाही. बांगलादेशातील अंतरिम सरकारने देशात सौदी अरबमधील मदीना मशिदीप्रमाणे मोठी मशीद उभारण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आता बांगलादेशात धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उच्चार करणेही धोक्याचे ठरणार आहे. बांगलादेशात अमेरिकेतील वोकिझमचा पुरस्कार करणार्यांचे युनूस सरकार सत्तेत असून, या दास यांच्या अटकेच्या निमित्ताने देशाच्या पुढच्या हिंसक प्रवासाची नांदी दिली आहे. देशातील कायदे, फौजा, पोलिस, विद्यापीठे आणि प्रशासन सरकारच्या नियंत्रणात असल्याचा देखावा निर्माण केला जात असला, तरी या यंत्रणांच्या चाव्या प्रत्यक्षात इस्लामी उन्मादींच्या हाती असल्याच्या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही. दास यांची अटक प्रातिनिधिक म्हणत, भविष्यात होणार्या कठोर हल्ल्यास जायची तयारी हिंदू समुदायाने ठेवायला पाहिजे.