माळढोकच्या पिलाचा कृत्रिम रेतन पद्धतीने जन्म

09 Nov 2024 17:06:01
- राजस्थानात घडला चमत्कार
 
जैसलमेर,
Maldok bird : भारतातील सर्वाधिक संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक म्हणजे माळढोक. एकेकाळी भारतीय माळरानावर मुक्त वावर असणाऱ्या या पक्ष्याची संख्या आता १५० इतकी कमी झाली आहे. महाराष्ट्रातील नाणज येथे माळढोक पक्षी अभयराण्य असले, तरी येथे या पक्ष्यांची संख्या दोन अंकीही नाही, अशी स्थिती आहे. आता राजस्थानात कृत्रिम रेतन पद्धतीने माळढोकच्या एका पिलाचा जन्म झालेला आहे.
 
 
Maldok
 
जैसलमेर येथे माळढोक प्रजनन केंद्र आहे, तिथे हा प्रयोग राबवण्यात आला. विभागीय वन अधिकारी आशिष व्यास यांनी ही माहिती दिली. कृत्रिम रेतन पद्धतीने माळढोकच्या पिलाचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. हा पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे. या माळढोकच्या शुक्रजंतूंची बँक बनवता येऊ शकेल आणि या पक्ष्याची संख्या वाढवता येईल.
 
 
Maldok bird : हा प्रयोग सर्वप्रथम आबुधाबी येथील संवर्धन केंद्रात राबवण्यात आला. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अधिकारी आबुधाबी येथे गेले होते. त्यानंतर हे तंत्र भारतात राबविण्यात आले. सर्वप्रथम रावदेवरा माळढोक प्रजनन केंद्रातील सुदासारी या नरपक्षाला कृत्रिम सगामनासाठी प्रशिक्षित आणण्यात आले आणि त्याचे शुक्रजंतू गोळा करण्यात आले. हे शुक्रजंतू सुदासारी माळढोक प्रजनन केंद्रात पाठविण्यात आले. तेथे टोनी या मादी पक्ष्याला या शुक्रजंतूंनी गर्भधारणा करण्यात आली. २४ सप्टेंबरला टोनीने अंडे दिले. या अंड्यातून १६ ऑक्टोबरला पिलाचा जन्म झाला. या पिलाची प्रकृती आता ठणठणीत आहे. जैसलमेर येथे या पक्ष्यांची संख्या १७३ इतकी आहे. यातील १२८ पक्षी नैसर्गिक अधिवासात आहेत, तर ४५ पक्षी प्रजनन केंद्रांत आहेत.
Powered By Sangraha 9.0