पुलगाव,
MLA Rajesh Bakane : शहरातील दोन वर्षापासून संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून नवनिर्वाचित आमदार राजेश बकाने यांनी अधिकार्यांना फैलावर घेतले. आ. बकाने यांनी अधिकार्यांचा क्लास घेत 45 दिवसात रस्त्याचे काम करण्याचे निर्देश दिले. विधानसभा निवडणुका पार पडल्या. 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदार संघात चारही आमदार भाजपा महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा जिल्हा आता काँग्रेसमुक्त झाला आहे. आमदारांचा शपथविधी अद्याप पार पडला नसताना मात्र, या नवनिर्वाचित आमदारांनी आपआपल्या मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेत कामाला लागलेले आहेत.

येथील रेल्वे स्टेशन चौक ते राज पेट्रोल पंपापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष निधीतून केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत 18 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. पण हे काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे आमदार राजेश बकाने यांनी अधिकार्यांची बैठक लावली. MLA Rajesh Bakane यावेळी सार्वजिनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, पुलगाव येथील उपविभागीय अभियंता अरुण मुत्यलेवार, मुख्याधिकारी विजय आश्रमा, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कंत्राटदार सिंबल उपस्थित होते. यावेळी आ. बकाने यांनी रेल्वे स्टेशन चौक ते राज पेट्रोल पंपपर्यंत रस्त्याचे काम येत्या 45 दिवसाच्या आत करण्याचे निर्देश दिले.