प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Sameer Deshmukh : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि 21 दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांनी जिल्ह्यात भल्याभल्यांना आसमान दाखवले. राजकारणातून काही परिवाराला त्यांची उंची दाखवण्याचे काम या दोन्ही निवडणुकांनी केली. त्यापैकी सर्वात मोठी झळ समीर सुरेश देशमुख यांना बसली. अगदी त्यांना आता कोणत्या पक्षात आहोत हे सांगायलाही जागा राहिली नाही.

लोकसभा निवडणुकीने माजी आमदार अमर काळे यांच्या गळ्यात खासदारकीची हार घातला. परंतु, पराभव होऊनही मतदारांच्या ओठावर माजी खासदार रामदास तडस यांचेच नाव येते. या जिल्ह्यात सुरेश देशमुख, अॅड. सुधीर कोठारी शरद पवार यांचे निष्ठावान अशी ओळख होती. 2019 च्या निवडणुकीत सुरेश देशमुख यांचे चिरंजिव महायुतीत शिवसेनेच्या तिकिटावर लढले आणि त्यांचे वडील महायुतीच्या उमेदवारासोबत होते. समीर देशमुख देवळीत तिसर्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. त्यानंतर त्याच्या शुभेच्छा बॅनरवर जवळपास अडीच तीन वर्षे कोणत्याही पक्षाचे चिन्ह नव्हते. मनात मात्र शरद पवार होते. शेवटच्या काही महिन्यात शरद पवार यांच्यासोबत जवळीक साधण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, वर्धेत शरद पवार यांच्या जाहीर सभेत व्यासपीठावर सुरेश देशमुख असताना समीर देशमुख यांचा राकॉँत प्रवेेश होऊ शकला नव्हता. मुंबईत कसा तरी त्यांचा राकाँत प्रवेश झाला.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी तिकिटासाठी जोर मारला. परंतु, काँग्रेसचे अमर काळे यांना शरद पवार यांनी तिकीट देणे पसंत केले. परंपरागत निष्ठावान असलेल्या समीर यांना तिकीट देणे टाळले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही त्यांनी तिकिटासाठी प्रयत्न केले. माजी आमदार सुरेश देशमुख यांनीही प्रतिष्ठापनाला लावली होती. परंतु, हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसलाच देण्यात आला. कसे तरी याच्या त्याच्या व्यासपीठावर बसत देशमुख पितापुत्राने विधानसभेतील दिवसं काढले. निकाल लागताच समीर देशमुख देवळीत पोहोचले. त्यांनी आमदार राजेश बकाने यांचे अभिनंदन केले. त्यानंतर समीर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीद्वय शिंदे व पवार यांना शुभेच्छा दिल्या. पण, पक्षाचे चिन्ह नाही आणि पदही नाही. त्यामुळे समीर देशमुख यांनी राजकीय संन्यास घेतला की नवीन पक्षाची चाचपणी सुरू अशी चर्चा सुरू असल्याचे फिरता फिरता कळले. एकदा समीर देशमुख यांनी भाजपाचा दरवाजा ठोठावला आहे, हे उल्लेखनिय!