मंत्रीपद न मिळाल्याने आ.नरेंद्र भोंडेकरांचे नाराजीनाट्य

शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा दिला राजीनामा

    दिनांक :15-Dec-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा,
Narendra Bhondekar : भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, मात्र शब्द न पाळल्याचे सांगत आ.भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करून आज शिवसेनेतील असलेल्या पदांचा राजीनामा दिला.
 
 
 
Narendra Bhondekar
 
 
 
निवडणुकीत जाहिर सभेदरम्यान तत्कलीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ.भोंडेकर निवडूण आल्यास पालकमंत्री पद सुध्दा देवू असे बोलून दाखविले होते. निवडणुकीत विजयी झालेले आमदार भोंडेकर यांना पहिल्याच मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांसह स्वतः आ.भोंडेकर यांनाही होती. मात्र आज नागपूर येथे झालेल्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात आ.नरेंद्र भोंडेकर यांच्या वाट्याला काहीच देण्यात आले नाही. परिणामी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेते पदाचा तसेच पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शपथविधी होण्यापुर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे.
 
 
विधानसभा निवडणुकीच्या पुर्वीसुध्दा नरेंद्र भोंडेकर यांनी ही निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांना शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक पद सुध्दा त्यांच्याकडे होते. यानंतर पालकमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. तर निवडणुकीत तिस-यांदा आमदार म्हणून विजयी झाल्याने मंत्रीपद वाट्याला येण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र पहिल्या मंत्रीमंडळाच्या यादीत त्यांची वर्णी न लागल्याने आ.नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करीत शिवसेनेच्या उपनेते व पूर्व समन्वयक पदाचा राजीनामा दिला.