अभय योजनेचा 2513 वीजग्राहकांनी घेतला लाभ

139.68 लाख रुपयांचा केला भरणा

    दिनांक :27-Dec-2024
Total Views |
गोंदिया,
Abhay Yojana : वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हफ्त्यात भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीज जोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या अभय योजनेमध्ये गोेंदिया परिमंडळातील 2 हजार 513 वीजग्राहकांनी 139.68 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
 
 
 
gondia
 
 
 
थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येत आहे. या योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळत असून एक रकमी थकित बिल भरणार्‍या लघुदाब ग्राहकांना 10 तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सवलत दिल्या जात आहे. या योजनेतंर्गत गोंदिया परिमंडळात गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 703 वीजग्राहकांनी 98.87 लाख रुपये व भंडारा जिल्ह्यातील 810 वीजग्राहकांनी 40.81 लाख रुपये अशा एकूण 2 हजार 513 वीजग्राहकांनी 139.68 लाख रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 पर्यंत असल्याने थकबाकी पोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी त्यांच्याकडील थकीत वीज बिलाचा भरणा करुन या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.