ईव्हीएमचे रडगाणे थांबवा; विकासाचं गाणे गा!

    दिनांक :08-Dec-2024
Total Views |
- एकनाथ शिंदेंचा मविआला बोचरा सल्ला
 
मुंबई, 
कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम चांगल्या असतात आणि निकाल गेला तेव्हा ते ईव्हीएम घोटाळ्याचे रडगाणे गातात. राज्यातील जनतेने विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे आता त्यांनी ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे, असा बोचरा सल्ला उपमुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी दिला. ते रविवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
 
Eknath Shinde
 
Eknath Shinde : शिंदे यांनी मविआच्या नेत्यांवर सडकून टीका केली. झारखंडमध्ये, कर्नाटकात मतदान लोकसभा निवडणुकीत मतदान झाले, प्रियांका वढेरा वायनाडमधून जिंकल्या, तेव्हा त्यांना ईव्हीएममध्ये दोष दिसला नाही; मात्र महाराष्ट्रात पराभव झाला आणि मविआने ईव्हीएम घोटाळा म्हणायला सुरुवात केली. दुसरे कोणी जिंकले की मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी समोर केली जाते. विरोधी पक्षाकडे दुसरा कोणताही मुद्दा राहिलेला नाही. विरोधकांना जनतेने नाकारले आहे, विरोधकांना जागा दाखवली आहे. घरी बसणार्‍यांना लोक मतदान करीत नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीला लगावला.
 
शरद पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर
शरद पवारांचे वक्तव्य ऐकले. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची तुलना केली. काँग्रेसला जास्त मते मिळूनही शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या, असे ते म्हणतात. पण, लोकसभेला महायुती आणि आघाडीच्या मतांमध्ये अवघ्या काही टक्क्यांचा फरक होता. तरी मविआला ३१ आणि महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १०० आणि शिवसेनेने ८० जागा लढवल्या होत्या. प्रत्येक मतदारसंघाचे गणित वेगळे असते. तुमचा विजय होतो, जागा जास्त मिळतात, तेव्हा ईव्हीएम चांगली. पराभव होतो तेव्हा खराब. बाजूने निकाल लागल्यावर सुप्रीम चांगले, विरोधात निकाल लागल्यावर न्यायालय पक्षपाती, हा कुठला न्याय आहे, याकडे Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.