छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य

    दिनांक :01-Feb-2024
Total Views |
संस्कृती 
 
 
- वैभव डांगे
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झालेल्या ऐतिहासिक राज्याभिषेकाने भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि स्वातंत्र्य चळवळीच्या संचालनाला नवी शक्ती मिळाली आहे. 1645 मध्ये वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बालशिवाजीने हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. राज्याभिषेकानंतर ते भूपती (छत्रपती) झाले आणि हिंदू समाजात सुरक्षिततेची आणि अभिमानाची भावना निर्माण झाली. छत्रपतींनी स्थापलेले तेच हिंदवी स्वराज्य आज जागतिक पटलावर भारताची प्रतिमा उंचावत आहे.
 
Chhatrapati Shivaji Maharaj
 
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील इतर राजांपेक्षा वेगळे होते. छत्रपती हे बुद्धिमान, पराक‘मी, शूर, दूरदर्शी आणि तत्त्वज्ञानी राजा होते. परकीय, क्रूर मोगल राज्यकर्त्यांकडून हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार शिवाजीच्या बालपणीच्या मनावर आघात करीत होते. यातूनच पुढे हिंदवी स्वराज्य अंकुरले, जे पुढे वटवृक्षासारखे पसरले. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वत:चे राज्य. देशात प्रथमच जाती-धर्माचा विचार न करता मानवी समाज अन्याय, अत्याचाराविरुद्ध एकवटला. हिंदवी स्वराज्य हे खर्‍या अर्थाने जनतेने निर्माण केलेले अर्थात रयतेचे राज्य होते.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी Chhatrapati Shivaji Maharaj प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही ज्या प्रकारे आपले ध्येय साध्य केले त्यामुळे आम्हा सर्वांना दृढनिश्चयाने आणि एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली व पराक्रमी जीवनापासून आम्हा भारतीयांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. नेहमीच व्यापक, मोठा विचार करायला हवा, ध्येय नेहमीच विशाल असायला हवे हे आम्हाला छत्रपतींकडून शिकायला मिळते. व्यापक, मोठा विचार केल्याने प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची क्षमता, परिपक्वता निर्माण होते. त्यामुळेच वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून अर्थात स्वराज्याचे तोरण बांधून शिवरायांनी हिंदू समाजाच्या मनात हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याचा विश्वास रुजवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला तेव्हा त्यांच्याकडे ना पुरेसा अनुभव होता, ना पुरेशी लष्करी शक्ती. एवढेच नव्हे तर आर्थिक पाठबळही नव्हते. पण त्यांच्याकडे प्रखर इच्छाशक्ती, जबरदस्त कि‘याशक्ती होती. त्यांच्याकडे समाजाची अशी ताकद होती, जी सह्याद्रीच्या दुर्गम पायवाटेतूनही एक नवीन वाट निर्माण करण्यास मदत करीत होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी हिंदवी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करायचाच असे ध्येय त्यांनी स्वत:समोर ठेवले आणि अखेर ते साध्य केलेच. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे त्यांची त्यांची इच्छाशक्ती, संकल्पशक्ती अतिशय प्रबळ होती. जबरदस्त आत्मविश्वास आणि प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य, अवघड कार्येही पूर्णत्वास जाऊ शकतात हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून शिकतो.
 
 
राज्य विस्ताराऐवजी स्वातंत्र्याचे ध्येय
छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj हे कुशल संघटक होते. आपला सुज्ञपणा, समंजसपणा, शहाणपण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी बलाढ्य मोगलांविरुद्ध शूर, निष्ठावान, कर्तव्यतत्पर व प्रामाणिक लोकांची अशी सेना उभारली की ज्यांना राज्यविस्तारापेक्षा स्वराज्याचा ध्यास होता. शिवरायांच्या लष्करातील प्रत्येक सैनिक कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपुण, सिद्धहस्त होता. शिवाजी महाराज प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेनुसार व कुवतीनुसार कार्य सोपवत असत. हंबीरराव मोहिते यांच्यासारखे प्रखर पराक‘मी सेनापती, बहिर्जी नाईक सारखे साहसी, बुद्धिमान गुप्तहेर, सरदार कान्होजी आंगं‘ेसारखे आरमार प्रमुख इत्यादी व त्यांच्यासारखेच अन्य दिग्गज त्यांना सहकारी म्हणून लाभले होते. छत्रपतींच्या पदरी असे अनेक लोहार होते की ज्यांनी बनविलेल्या घातक शस्त्रांपासून शत्रूकडील कुणी वाचणे जवळपास अशक्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांची संघटन शैली आजही तेवढीच प्रासंगिक आणि समर्पक आहे. आजच्या म्हणजे आधुनिक काळानुसार, वर्तमान व्यवस्थापन शैलीनुसार सांगायचे झाल्यास ‘योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य व्यक्तीसाठी योग्य कार्य’ हे खूप महत्त्वाचे आहे आणि आजच्या आधुनिक व्यवस्थापनाचे हे सूत्र छत्रपतींनी तब्बल 350 वर्षांपूर्वी अंमलात आणले. यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
 
 
हिंदवी स्वराज्याचा केला विस्तार
छत्रपती झाल्यानंतरही Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराजांनी आपल्या परिश्रमात, कष्टात कसूर केली नाही. भारताच्या दृष्टीने हा अतिशय प्रतिकूल व काळा कालखंड होता. त्यावेळी केवळ मोगलच नव्हे तर युरोपियन वसाहतवादी अर्थात ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच देखील साम‘ाज्य विस्ताराच्या धोरणाने भारतातील अधिकाधिक प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न करीत होते. मोगल सम‘ाट औरंगजेबाप्रमाणेच गोवळकोंड्याचा कुतुबशाह, विजापूरचा आदिलशहा आपल्या प्रचंड सैन्यासह हिंदवी स्वराज्यावर आक‘मण करून आपले साम‘ाज्य वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत होता. या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही छत्रपतींनी अतिशय कठोर परिश्रम, पराक‘म आणि मुत्सद्देगिरीने तह आणि युद्धाचा मार्ग स्वीकारून हिंदवी साम‘ाज्याचा विस्तार केला आणि मोगलांच्या ताब्यातून 370 किल्ले जिंकून घेण्याबरोबरच अनेक नवीन व बळकट किल्लेही बांधले.
 
 
कार्यात शिस्त आणि संयम
केवळ युद्ध करून हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होते. त्यांच्या कार्यपद्धतीत कमालीची शिस्त होती. केव्हा आक‘मक धोरण स्वीकारायचे आणि केव्हा संयम बाळगायचा याची छत्रपतींना पूर्ण जाण होती. त्यांची ही अद्भुत कार्यशैली हिंदवी स्वराज्य बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरली. शिवाजी महाराजांची शिस्त इतकी कडक होती की न्याय देताना ते नाते गोते पाहात नव्हते. संभाजीमामा मोहिते, सखोजी गायकवाड यांच्यासारख्या नातेवाईकांनाही त्यांनी शिक्षा सुनावण्यास मागेपुढे पाहिले नाही. नेताजी पालकरांना सरसेनापती पदावरून हटवण्याबरोबरच अन्य सहकार्‍यांनाही त्यांच्या चुकीची शिक्षा देण्यास ते कचरले नाहीत. कुणाविषयी ममत्वाची, आसक्तीची भावना न बाळगल्यस, अर्थात आपपरभाव न बाळगल्यासच स्वराज्य टिकून राहिल, असे छत्रपती शिवराय नेहमीच म्हणायचे. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापनाबरोबरच सामाजिक समरसता, न्यायव्यवस्था, कृषी व व्यापार धोरण, धार्मिक सलोखा, कठोर करप्रणालीचे सुलभीकरण व स्थानिक भाषेला महत्त्व दिले आणि शत्रूंशी लढण्यासाठी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरणाचे कार्य प्रामु‘याने केले. विशाल, उदात्त ध्येयासाठी कठोर शिस्त आवश्यक असते, अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली.
 
 
स्वतःसाठीही तडजोड नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी Chhatrapati Shivaji Maharaj स्वतःसाठी कधीही तडजोड केली नाही. हिंदवी स्वराज्याच्या ध्येयापासून विचलित होईल असे कोणतेही पाऊल त्यांनी उचलले नाही. त्यांना हवे असते तर विजापूरच्या सुलतानाशी तडजोड करून मोठे पद मिळवता आले असते. मोगल सम्राट औरंगजेबाशी तडजोड करून ऐशोआरामाचे जीवन ते जगू शकले असते. पण त्यांच्या स्वप्नातही हा विचार कधी आला नाही. भारतीय जनतेला स्वराज्य मिळवून देणे, हिंदू पदपातशाही स्थापन करणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. म्हणूनच छत्रपतींचा कुठलाही सैनिक कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही. कुणालाच लोभ, मोहाने ग्रासले नाही. कारण छत्रपतींचा उदात्त आदर्श त्यांच्यासमोर होता. शिवरायांचे ध्येयप्रेरित जीवन ते पाहात होते, अनुभवत होते. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे ध्येय हेच सर्वांचे ध्येय झाले होते.
 
 
प्रत्येक मोहिमेत स्वत: आघाडीवर
छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj हे कुशल राजकारणी तसेच शूर योद्धा होते. त्यामुळे सहकार्‍यांनी आग‘ह, विनंती करूनही त्यांनी प्रत्येक मोहिमेत आघाडीवर राहण्याचा धोका पत्करला. सर्वच प्रमुख मोहिमेत त्यांनी जीव धोक्यात घालून सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे कटाक्ष टाकला असता लक्षात येते की ते नेहमीच दूरगामी, दूरदृष्टीने विचार करीत असत. मोगल बादशहा औरंगजेबाला भेटायला आगर्‍याला जाणे, शाहिस्तेखानाला लाल महालातून हुसकावून लावणे, अफझलखानाचे कुटील मनसुबे हाणून पाडण्यासाठी आखलेली प्रतापगड किल्ल्याची मोहीम. शिवाजी महाराजांची ही कार्यशैली आपल्याला प्रेरणा देते. सुज्ञपणाने, थंड डोक्याने, अतिशय विचारपूर्वक उचललेली जोखीमपूर्ण पावले यशाकडे घेऊन जातात, हे छत्रपतींनी या मोहिमांच्या माध्यमातून आम्हाला दाखवून दिले आहे.
 
 
वाईट प्रथांना विरोध
छत्रपती शिवाजी महाराजांची Chhatrapati Shivaji Maharaj कार्यपद्धती सर्वांपेक्षा अतिशय वेगळी होती. हिंदवी स्वराज्यासाठी ज्या सुधारणा आणि बदल आवश्यक होते, त्यात त्यांनी काळानुरूप बदल केले. ते वाईट प्रथांच्या विरोधात होते, म्हणूनच आपले वडील शहाजी राजे यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी आई जिजाबाई यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. शिवाजी महाराजांनी काळाची गरज ओळखून स्वराज्याचे प्रथम आरमार उभारले. काळाच्या गरजेनुसार त्यांनी प्रत्येक कार्यात बदल किंवा निर्मिती केली.
 
 
महिलांचा आदर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या Chhatrapati Shivaji Maharaj काळात महिलांना योग्य सन्मान दिला जात होता. प्रत्येक स्त्री मातेसमान, भगिनीसमान ही त्यांची शिकवण होती. घरगुती कामाव्यतिरिक्त महिलांना प्रथमच युद्धाचे प्रशिक्षणही देण्यात आले. तत्कालीन परंपरेनुसार लुटलेली संपत्ती आणि स्त्रिया राजाकडे सुपूर्द केल्या जात होत्या. परंतु शिवाजी महाराजांनी ही परंपरा बदलून महिलांना सन्मान देऊन, त्यांचा आदरसत्कार करून एक चांगला व चारित्र्यवान राजा असल्याचा आदर्श घालून दिला.
 
 
जनतेचे राज्य
मनात आणले असते तर Chhatrapati Shivaji Maharaj शिवराय देखील इतर चैनी, विलासी राज्यकर्त्यांप्रमाणेच राज्यकारभार करू शकले असते. पण हे स्वराज्य आहे व हे आपल्या सर्वांचे आहे, सर्वसामान्य प्रजेचे हे स्वराज्य आहे हे जनतेला कळावे हा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेसाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. घोडदळ, पायदळ तसेच सागरी संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी सुसज्ज आरमारही उभारले व शस्त्रसामग्रीत प्रचंड वाढ केली. त्यांनी शिस्तबद्ध प्रशासकीय व्यवस्थेसह कार्यक्षम आणि प्रगतीशील नागरी समाजाचा पाया घातला. मोगलांनी पाडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायप्रकि‘या यांचे पुनरुज्जीवन केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला ‘हिंदवी स्वराज्य’ असे नाव दिले. आजच्या राजकीय परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था जाणून घेतल्यास पारदर्शी व मूल्याधारित प्रशासनाच्या माध्यमातून न्याय्य व समाजाभिमुख व्यवस्था प्रस्थापित करता येते, हे छत्रपतींनी दाखवून दिले.
 
 
‘रयत म्हणजे जनतेचा राजा’ ही पदवी
’रयत म्हणजे जनतेचा राजा’ ही पदवी धारण करणारे Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी हे पहिले राजे होते. ‘हे राज्य जनतेने जनतेसाठी उभारले आहे, असे ते नेहमी म्हणायचे. जनतेचा पैसा सार्वजनिक कामांवर खर्च करण्याची व्यवस्था त्यांनी राबवली. त्यामुळे राजकोष ऐवजी त्यांनी विश्वस्त मंडळ सुरू केले. राज्यकारभारात गुंतलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्यांनी हीच भावना निर्माण केली. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या प्रेरणेने मराठा साम‘ाज्याचा विस्तार महाराष्ट्राच्याही पलीकडे थेट ‘अटक ते कटक’पर्यंत झाला. छत्रपतींनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहे.
 
 
(पांचजन्यवरून साभार)