स्वामी विवेकानंद, शुकदास महाराजांच्या नामघोषाने दुमदुमली विवेकानंद नगरी ,व्हिडिओ

01 Feb 2024 16:44:24
हिवरा आश्रम, 
Swami Vivekananda युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज यांच्या नामघोषाने विवेकानंद नगरी बुधवारी ता. ३१ रोजी दुमदुमून गेली. निमित्त होते विवेकानंद जन्मोत्सवा निमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रचे. टाळ मृदंगाच्या नादावर दंग झालेले वारकरी, लेझीम पथकाचे आकर्षण....भारूडाने प्रेक्षकांच्या मनाचा घेतलेला ठाव... यावेळी विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थक्षेत्रावर भाविकांच्या उपस्थित चंद्रश्वर संस्थान चांडस चे महंत तपगीरी महाराज, हभप रामेश्वर महाराज पळसखेड सपकाळ, युवा उद्योजक तथा विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त प्रशांत हजारी यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांच्या रथारूढ मूर्तींच्या पूजनाने या शोभायात्रेला सुरुवात झाली.
 

विवेकानंद  
 
 
या शोभा यात्रेत 95 दिंड्या , व्यायाम 25 शाळा , 20 बॅण्ड पथके, लेझिम पथकांच्या जल्लोषात शोभायात्रा हरिहरतीर्थावरून सुरु होऊन जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत हनुमान मंदिराजवळ विसावली. जमलेल्या हजारोंच्या गर्दीत हभप प्रकाश महाराज जवंजाळ व मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडून शोभायात्रेची सांगता झाली. मल्लखांब, शारीरिक कवायती, महिला भजनी मंडळांनी धरलेला हरिनामाचा फेर, टाळ-मृदंगाचा गजर यामुळे विवेकानंद नगरी दुमदुमली होती. यानिमित्त महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत भावभक्तीला अक्षरशः उधाण आले होते.विवेकानंद जन्मोत्सवाची पहाट वेदमंत्राच्या पावन स्वरांनी उजाडली. तर जन्मोत्सवास शोभायात्रेने थाटात प्रारंभ झाला. ही शोभायात्रा दुपारी दोन वाजता सुरू झाली. विवेकानंद आश्रमाच्या हरिहरतीर्थावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी संत शुकदास महाराजश्रींसह स्वामी विवेकानंदांच्या रथारूढ मूर्तीचे पूजन शंखनिनादात केले गेले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, आत्मानंद थोरहाते, विष्णुपंत कुलवंत यांच्यासह आश्रमाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,राज्यभरातून आलेले लाखो भाविक भक्त उपस्थित होते.Swami Vivekananda स्वामी विवेकानंद व प.पू. शुकदास महाराज यांचा जयघोष, टाळ-मृदंग, लेझिम, बॅण्डच्या निनादात ही शोभायात्रा हिवरा आश्रम नगरीकडे प्रस्थान झाली. तब्बल तीन तास नामघोष अन् टाळ -मृदंगाचा कल्लोळ सुरु होता. हा नेत्रदीपक सोहळा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात पोहोचला. तेथे हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या शुभहस्ते तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीदंडी फोडून या सोहळ्याची सांगता झाली.
आज संपन्न होणारे कार्यक्रम
सकाळी ७ ते ८ वा प्रार्थना, अनुभूती गायन, ८ ते ९.३० प्रवचन हभप येवले शास्त्री, ९.३० ते ११ प्रवचन हभप श्रीरंग महाराज वाहेगावकर, सकाळी ११ ते २ हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे भगवान श्रीकृष्ण कथामृत, दुपारी हभप श्रीरंग वाहेगावकर, दुपारी ४ ते ७ हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे श्रीकृष्ण कथामृत, सायंकाळी ७ ते ९ हभप गजाननदादा पवार शास्त्री पवार महाराज यांचे किर्तन, रात्री ९ वाजता हभप बाळकृष्णदादा वसंतगडकर यांचे किर्तन हे कार्यक्रम संपन्न होणारे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0