उमरखेड,
उमरखेड विधानसभेचे कार्यक्षेत्र पाहता अनेक सामान्य नागरिकांना तालुका स्तरावरील कार्यालयात येण्यासाठी 70 किमी अंतरावरून एसटीने प्रवास करावा लागतो. त्यातल्या त्यात सामान्य नागरिकांना एकाच वेळी तहसील, पंचायत समिती व कृषी कार्यालय अथवा इतर कार्यालयात जाऊन आपली कामे आटोपून त्यांना तत्परतेने परत बसने गावी परतावे लागत होते. अशातच त्यांचा दिवस हा संपूर्ण कामांमध्येच जत होता. आता यापुढे प्रशासकीय इमारत झाल्यानंतर तासाभरातच सर्वच कार्यालयातील कामे आटोपून त्यांना परत गावी जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही प्रशासकीय इमारत नागरिकांना जलद सेवा देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार Namdev Sasane नामदेव ससाने यांनी केले.
स्थानिक तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुहास गाडे, तहसीलदार वैभव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील, बळवंत नाईक, उपविभागीय अभियंता प्रमोद दुधे उपस्थित होते. आ. नामदेव ससाने पुढे म्हणाले, तहसील कार्यालय ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील अडीअडचणी माहीत होत्या. उमरखेडला माझ्या बंदी भागातील नागरिकांना 70 ते 80 किमी येऊन अक्षरशः दिवस गमवावा लागत होता. त्यांचा पूर्ण एक दिवस प्रत्यक्ष कामांमध्ये जात होता.
जनतेची सगळी कामे एकाच इमारतीत व्हावी हा मानस आमदार होण्याआधीपासूनच होता. त्यामुळे पंधरा कोटींची प्रशासकीय इमारत इथे मिळण्यासाठी मी प्रयत्न केले. आज शासकीय कार्यालय इमारती भाड्याने शहरात सर्वदूर आहेत. त्यामुळे एक तर सरकारी निधीचा दुरुपयोग होत होता. दुसरे म्हणजे नागरिकांना त्रासही सहन करावा लागत होता, असे ते म्हणाले. आता या इमारतीचे भूमिपूजन झाले असून येत्या वर्षभरात इमारत उमरखेड विधानसभेतील लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे. इथे जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांची स्थापना होईल. त्यामुळे नागरिकांचा हा मूळ प्रश्न सुटणार आहे असेही Namdev Sasane आ. ससाने यांनी सांगितले.
उमरखेड नगर पालिकेच्या माध्यमातून अभ्यासिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, उमरखेड गावंडे महाविद्यालय रस्ता, पुसद उमरखेड 200 कोटींचा रस्ता, उमरखेड ढाणकी रस्त्यासोबतच ग्रामीण भागातील 200 कोटींचे रस्ते, उमरखेड ढाणकी रस्ता ह्यांसोबतच ग्रामीण भागातील रस्ते याचे जाळे पूर्ण होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील रस्ते उत्तम दर्जाचे होणार आहे. जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा कार्यक्रम या येत्या तीन महिन्यांत पार पडणार आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य, रस्ते तसेच सामान्य प्रश्न निश्चितच येत्या काळात मार्गी लागतील असा विश्वास Namdev Sasane आ. नामदेव ससाने यांनी व्यक्त केला.
यावेळी नितीन भुतडा म्हणाले, उमरखेडमध्ये पोलिस ठाणे व विश्रामगृहासोबतच शहर विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. या निधीतून शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत्या तीन महिन्यांत सुरू होणार असून शहरात आज 141 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सुरुवात झाली आहे. संचालन भाजपा शहर अध्यक्ष प्रकाश दुधेवार यांनी केले, तर आभार श्रीधर देवसरकर यांनी मानले.