राममंदिर प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत आरोप-प्रत्यारोप

    दिनांक :10-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Ram Mandir Prastav लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत आज रामनामावरून सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपाचे सत्यपालसिंह यांनी नियम 193 नुसार राम मंदिराचे निर्माण आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा या प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात केली. राम सर्वत्र आहे, सर्वांचा आहे, राम घाटाघाटावर आहे, राम रोमरोममध्ये आहे, राम सांप्रदायिक नाही तर सत्य, सनातन आणि शाश्वत आहे, असे सत्यपालसिंह म्हणाले. मात्र, काँग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारले. 2007 मध्ये रामसेतूच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काँग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारले होते. असे करून काँग‘ेसने फक्त रामाचे अस्तित्व नाकारले नव्हते, तर रामाशी जुळलेली आपली सभ्यता, संस्कृती आणि वारसाही नाकारला होता, असा जोरदार हल्ला सत्यपालसिंह यांनी केला.
 
 
Ram mandir
 
आम्ही हिंदुत्वाचे पहारेदार : श्रीकांत शिंदे
Ram Mandir Prastav : राममंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार नाही तर, पहारेदार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. ठाकरे गटाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग‘ेस शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे गौरव गोगोई, भाजपाचे प्रतापचंद्र सांरगी, हंसराज हंस, एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी यांच्यासह अनेक सदस्यांची भाषणे झाली. भगवान राम सर्वांचे आहे, सर्वांच्यासोबत आहे, प्रत्येक क्षण ते आमच्यासोबत आहे, याकडे लक्ष वेधत काँग‘ेसचे गौरव गोगाई यांनी, महात्मा गांधींची हत्या करणार्‍या नाथुराम गोडसेंचे उदात्तीकरण बंद करण्याचे आवाहन केले. भाजपा सदस्य ‘जय श्रीराम’ची घोषणा देतात, तेव्हा त्यांच्या मनातील संताप आणि द्वेषाचे दर्शन होते, असे ते म्हणाले. मोदी सरकार एका धर्माचे, समुदायाचे आहे की देशाचे अशी विचारणा करीत असदुद्दिन ओवैसी म्हणाले की, भगवान रामाबद्दल आमच्याही मनात आदराची भावना आहे, मात्र महात्मा गांधी यांची हत्या करणारे नाथुराम गोडसे यांच्याबद्दल द्वेषाची भावना आहे.