वाशीम,
Janata Raja drama : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित ‘जाणता राजा’ महानाट्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या महानाट्य प्रयोगाला वाशिमकरांनी उदंड प्रतिसाद देत मोठ्यासंख्येने उपस्थिती दर्शवली.
या उद्घाटनावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हाधिकारी कैलास देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
या महानाट्य प्रयोगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले. अलाऊद्दीन खिलजीचे आक्रमण व त्यांचा जुलुम, शिवाजी महाराजांचा जन्म, बाल शिवाजी, जुलुमी सिंहासनाविरुद्ध शिवाजी महाराजांचा बंड, तुळजाईचा गोंधळगीत, स्वराज्याची शपथ, युद्ध ते शिवराज्याभिषेकापर्यंत क्षणांचे कलावंतांकडून सादरीकरण करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या महानाट्य प्रयोगाला शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक, शिवप्रेमी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, परिसरातील नागरिक परिवारासह उपस्थित होते.