मंदिर-मशीद वाद लवकर संपुष्टात यावा

    दिनांक :11-Feb-2024
Total Views |
- गजानन निमदेव
 
अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले आहे. आता काशी आणि मथुरा येथील मंदिरांचा वाद मिटला पाहिजे. हिंदूंना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या मार्गावर गतिमान वाटचाल करतो आहे. त्यात मंदिर-मशिदीचा वाद अडथळा म्हणून येता कामा नये. मुघलांनी भारतावर आक्रमण करून Mandir-Masjid Vad हिंदूंची हजारो मंदिरे तोडली आणि त्या जागी मशिदी बांधल्या, याचे असंख्य पुरावे उपलब्ध असताना मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत पुरावे असलेल्या सर्व जागा आनंदाने हिंदूंच्या सुपूर्द केल्यास वादाचा प्रश्नच उरणार नाही.
 
 
masjid
 
राम मंदिर तर झाले. पुढे काय, असा प्रश्न मोदींनी विचारला होता. त्याचे उत्तरही त्यांनीच दिले. पुढील एक हजार वर्षे देशाला कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असा सर्वंकष विकासाचा पाया रचला पाहिजे, असे मोदी म्हणाले होते. स्वत: त्यांनी त्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभही केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत जो आत्मविश्वास व्यक्त केला, तो वाखाणण्याजोगा आणि 140 कोटी भारतीयांना आश्वस्त करणारा आहे. तिकडे उत्तरप्रदेशच्या विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पांडवांचे उदाहरण दिले. पांडवांनी पाच स्थानं मागितली होती, आम्ही तर अयोध्या, काशी आणि मथुरा अशी तीनच मागतो आहोत, असे योगी म्हणाले. मुस्लिम बांधवांनी याचा विचार विवेकाने करायला हवा. सामंजस्यपूर्ण सहनिवास हवा असेल आणि दीर्घकाळ शांतता हवी असेल तर मुस्लिमांनी ओवैसीसारख्या चिथावणीखोर नेत्यांपासून सावध राहात स्वत:च्या विवेकाचा वापर करून निर्णय करणे काळाची गरज आहे.
 
 
उत्तरप्रदेशात 25 कोटी लोक राहतात. या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगी प्रयत्नशील आहेत. मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनीही प्रदेशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर केले आहे. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण हे मागास समजल्या जाणार्‍या उत्तरप्रदेशसाठी वरदान ठरले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. उद्या, काशी आणि मथुरेतही असेच भव्य मंदिर निर्माण झाले तर उत्तरप्रदेशचा संपूर्ण कायापालट होईल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे.
 
 
Mandir-Masjid Vad  : काशी आणि मथुरेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दोन्ही ठिकाणी जिथे मशिदी आहेत, तिथे आधी मंदिरच होते, याचे पुरावे मिळाले आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी या दोन्ही मंदिरांची जी स्थिती होती, तीच आजही कायम असल्याचे 1991 च्या पूजास्थळ अधिनियमाने स्पष्ट केले असले, तरी हिंदू संघटनांनी अनेक याचिका दाखल करून या अधिनियमाला कोर्टात आव्हान दिले आहे. हा अधिनियम म्हणजे न्याय मागण्याच्या नैसर्गिक अधिकारावरील अतिक्रमणच होय. सर्वोच्च न्यायालयात या याचिकांवर अद्याप सुनावणी झालेली नसली तरी काशी आणि मथुरेतील या दोन्ही ठिकाणी मंदिरे तोडूनच मशिदी बांधल्या गेल्या आहेत का, याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेवर न्यायालयाने कोणताही प्रतिबंध लावलेला नाही, ही बाब महत्त्वाची मानली पाहिजे. त्यामुळेच ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्त्व खात्याने सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर केला आहे आणि मथुरेत मात्र सर्वेक्षणाला प्रारंभ व्हायचा आहे. कोर्टाच्या अनुमतीने तोही लवकरच होईल, अशी आशा आहे.
 
 
अयोध्येत जिथे वादग्रस्त ढांचा होता, तिथे आधी राम मंदिर होते, ते पाडून मशीद बांधण्यात आली, यासाठी पुरावे शोधावे लागले. शेवटी न्यायालयाने सर्व तथ्ये जाणून घेत अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र, काशी आणि मथुरा येथे हिंदू मंदिरे पाडूनच मशिदी बांधण्यात आल्या आहेत, याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध असतानाही न्यायालयीन लढाई लढावी लागते, हे दुर्दैवच होय. मशिदीच्या बाजूने लढणार्‍यांनाही हे तथ्य माहिती आहे. पण, तरीही ते औदार्य दाखवायला तयार नाहीत. संसदेने नागरिकत्व दुरुस्ती कायदा केला असताना त्याला विरोध करणारे आता पूजास्थळ अधिनियमाचा आधार घेत हिंदूंना संविधानाचे दाखले देत आहेत, हे केवळ ढोंग आहे. हे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करतानाही संकोच बाळगत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करणेही व्यर्थच!
 
 
Mandir-Masjid Vad  : काशी आणि मथुुरेचा वाद कधी मिटेल, हे आज काहीही सांगता येत नसले, तरी न्यायालयात सर्व पुरावे सादर केल्यानंतर एक दिवस निकाल हा हिंदूंच्याच बाजूने लागेल, हे निश्चित! कारण, मंदिरे पाडूनच मशिदी बांधल्या होत्या, याचे सर्व पुरावे आढळून येत आहेत. जसजसे सर्वेक्षण केले जाईल, ते पूर्ण होईल, तसतसा काशी, मथुरेचा वाद संपुष्टात आणण्यास हिंदूंना मदत होईल, यात शंका नाही. अयोध्येत जन्मस्थळी राम मंदिरच होते हे पुराव्यांनिशी सिद्ध झाल्यानंतर मुस्लिम पक्षाच्या हाती काही पर्याय उरला नव्हता. त्यावेळी मशिदीची बाजू घेणार्‍यांनी जी चूक केली ती काशी आणि मथुरेच्या बाबतीत करू नये अशी अपेक्षा असताना मुस्लिम बांधव परिस्थिती समजून न घेता न्यायालयीन लढाई लढत आहेत. या लढ्यामुळे वेळ जरूर लागेल. पण, सर्व पुरावे, तथ्ये लक्षात घेता निकाल हिंदू पक्षाच्याच बाजूने लागेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला नको? न्यायालयाबाहेर या प्रकरणी संवादातून तोडगा काढला जाऊ शकतो. मुस्लिम पक्षाने सत्य स्वीकारले तर हे सहज शक्य आहे. औरंगजेबाच्या शासन काळात असंख्य हिंदू मंदिरे तोडली गेली. त्यांची संख्या शेकडोत, हजारोत असल्याचा दावा केला जातो, जो खरा आहे. असे असले तरी हिंदूूंनी सर्व मशिदींवर दावा केलेला नाही. अयोध्या, काशी आणि मथुरा या तीनच स्थळांवर आपला हक्क पुराव्यांच्या आधारे सांगितला आहे. आपल्याला गुण्यागोविंदाने राहायचे असेल तर मंदिर-मशीद वादातून लवकर बाहेर पडायला पाहिजे. हिंदूंनी तीनच ठिकाणांवर दावा केला आहे, अन्य हजारो मंदिरे पाडली गेली त्यावर दावा सांगितलेला नाही, हे लक्षात घेत मुस्लिमांनी सत्य स्वीकारत औदार्य दाखवायला हरकत नाही.
 
 
ज्यांनी इस्लामचा अभ्यास केला आहे, ज्यांनी कुराण वाचले आहे, त्यांना इस्लामचा सिद्धांत माहिती आहे. जिथे वादविवाद, भांडण झाले आहे, जबरदस्ती मंदिर पाडून मशीद बांधली आहे, तिथे अदा केलेला नमाज इस्लामच्या दृष्टीने स्वीकारार्ह नाही, असे मानले जाते. मुस्लिमांच्या दृष्टीने या इस्लामिक सिद्धांताला महत्त्व असेल तर काशी व मथुरा येथील मंदिरे पाडून तिथे नमाज अदा करणे औचित्यपूर्ण आहे काय, याचा विचार झाला पाहिजे. त्या काळात औरंगजेबाने जे केले, त्यासाठी आजचे मुस्लिम जबाबदार कसे, असा एक तर्क त्यांच्या बाजूने मांडला जातो. हा तर्क एकवेळ मान्य केला तरी, ज्या औरंगजेबाने असंख्य हिंदू मंदिरे तोडली, हिंदूंची संपत्ती लुटली, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केलेत, त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना लाज कशी वाटत नाही, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोण देणार? कुणीच देणार नाही. कारण, मंदिरांना विरोध करणार्‍यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचे आहे, त्यांना हिंदूंच्या आस्थेशी काहीही देणेघेणे नाही. काशी येथील ज्ञानवापीच्या परिसरात हिंदू मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे आढळले, त्याचे काय? तिथल्या भिंतींवर देवीदेवतांची चित्रे आहेत, हिंदूू धर्माची प्रतीके आहेत, संस्कृतमधील श्लोक आहेत, ते काय सांगतात? सगळे काही सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ असतानाही मशिदीची बाजू घेणारे आडमुठी भूमिका घेऊन लढत आहेत, हे योग्य नव्हे!
 
 
Mandir-Masjid Vad : आपले हित नेमके कशात आहे, हे मुस्लिम बांधवांनी ओळखले पाहिजे. चिथावणी देणार्‍यांपासून सावध राहात संयम बाळगत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आजच्या मुस्लिमांनी मंदिरे पाडली नसली, तरी मंदिरे पाडूनच जबरदस्तीने मशिदी बांधल्या गेल्या, हे मान्य करत हिंदूंना सहकार्य केले पाहिजे. नसेल असे करायचे तर न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याचा मोठेपणा दाखवायला पाहिजे. जे पुरावे समोर येत आहेत, ते स्वीकारले पाहिजे. पुरातत्त्व विभागाकडून जे सर्वेक्षण केले जाते, त्याचे जे निष्कर्ष पुढे येत आहेत, त्यावर विश्वास ठेवत झालेली चूक मान्य करत न्यायालयाबाहेर मुस्लिम बांधवांनी तोडगा काढण्यास सहकार्य केले आणि काशी-मथुरेतील मंदिरांची जागा मंदिरांसाठी दिली तर कायमस्वरूपी वाद संपुष्टात येईल, हे निश्चित!