सुंदर तें ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनियां॥

    दिनांक :11-Feb-2024
Total Views |
तुका आकाशाएवढा
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007
दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाचे नामस्मरण करीत दिंडीने पायी जाण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे व ती तशीच पुढे राहील. या दिंडीमध्ये सर्व जाती-धर्माचे तसेच केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्र-कर्नाटकमधील वारकरीसुद्धा दिंडी काढून पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. माणसा-माणसातला एकोपा टिकविण्याच्या द़ृष्टीने वारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. संतांशी तसेच लाखो भाविकांशी पंढरीच्या पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेतूनच Saint Tukaram Maharaj संत तुकारामांच्या अभंगातून पांडुरंगाचे दर्शन वेळोवेळी होताना दिसते. अशी ही तुकारामांशी अतूट श्रद्धा कधीही भंग न होणारी म्हणजेच अभंग स्वरूपात आहे. त्यांच्या अभंगातून त्यांनी समाज प्रबोधन केलं आहे. सदैव विचारांशी कास धरणार्‍या या संताचे अवघे जीवन पांडुरंगमय झालेले आहे. संत तुकारामांनी अभंगातून लाखो भाविकांना श्रद्धा असावी, पण ती अंधश्रद्धा नसावी, ही जाणीव करून दिली. एवढेच नव्हे, तर विकाराला दूर सारण्याचे सहज तत्त्व पटवून दिले. भगवंताच्या सान्निध्यात असेल तर अशामध्ये चांगले परिवर्तन होऊन परमेश्वराचे त्याला नक्की दर्शन होईल, अशी शिकवण संतांनी दिली. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात की,
 

vitthal 
 
बंधनापासूनि उकलली गांठी। देता आली मिठी सावकाशे।
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें। कामक्रोध केले घर रिते॥
खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं ज्या संतांनी मानवी जीवनाला विचार आणि उच्चार दिला, अशा संतांचे स्मरण करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यांच्या करण्याला धर्मश्रद्धेशी आणि पुण्यप्राप्तीशी जोड आहे. समाज प्रबोधनाकरिता वारकरी संप्रदायाने कीर्तन, प्रवचन, पारायणे, सप्ताह, वार्‍या यांचा वापर अखंडितपणे चालूच ठेवला. म्हणूनच संस्काराच्या, संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमध्ये संत परंपरेचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो. इथले लाखो भाविक भक्त ज्ञानोबा-तुकारामांच्या विचारांवर चालणारे असून ज्ञानेश्वरी व गाथा हे त्यांचे धर्मशास्त्र आहे. Saint Tukaram Maharaj संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे ज्ञानबा-तुकारामाच्या संदर्भात असे मत मांडतात की, ‘‘महाराष्ट्राचा एकोपा टिकविणार्‍या या पालखी परंपरेचा व भजन परंपरेचा आधुनिक पद्धतीने व विशेषत: समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास व्हायला हवा, असे न्या. रानडे यांना वाटले. ज्ञानेश्वर-तुकारामांच्या पालख्यांमध्ये सामील झालेल्या फडांच्या व दिंड्यांच्या प्रमुखांना न्यायमूर्ती स्वत: भेटले. त्यांच्याकडून माहिती मिळविली. या माहितीत विशेषकरून त्यांशी नावे, जाती आणि व्यवसाय यांचा समावेश होता. त्यातून दिसणारी समावेशकता व व्यापकता महाराष्ट्राला पुरून उरणारी होती.’’ यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की, या वारकरी संप्रदायास सामाजिकद़ृष्ट्या किती महत्त्वाचे स्थान आहे. असा हा पालखी सोहळा आजतागायत अखंड चालू आहे. तशी पंढरीशी वारी ही श्री संत तुकाराम महाराजांच्या घराण्यात पिढ्यान्पिढ्या चालू होती. म्हणूनच संत तुकाराम महाराज सांगतात की,
 
 
पंढरीशी वारी आहे माझे घरी। चालवीली पंढरीशी वारी॥
त्याशी सर्वथा अंतर न करी। तरीच संसारी सुफळपणा॥
ज्ञानदेवांचे Saint Tukaram Maharaj संत तुकारामाविषयीचे मत असे सांगितले जाते की, 42 दिवस धरणे धरून बसलेल्या ब्राह्मणाला अखेर ज्ञानदेवांनी स्वप्नात द़ृष्टान्त देऊन ज्ञानासाठी देहूला तुकोबांकडे जायला सांगितले. याचा अर्थ असा होतो की, तुकोबाशी पात्रता व अधिकार ज्ञानदेवांना मान्य असून त्यावर त्यांनी जणू शिक्कामोर्तब केले. तुकोबा जे सांगतील ते माझेच असेल, माझ्या परंपरेचा ते अधिकृत प्रवक्तेच आहेत, असा संदेश ज्ञानदेवांनी दिला. असे असताना संत तुकारामांनी ज्ञानदेवाची स्तुती करून त्यांचा महिमा वर्णन करून स्वत:कडे कमीपणा घेतात; तो असा की,
 
 
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें।
मज पामरासी काय थोरपण पायींशी वाहण पायीं बरी॥
यावरून Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज किती संवेदनशील होते, हे लक्षात येते. आयुष्यभर त्यांनी जनसेवा केली व आपलं सर्वस्व पांडुरंगच असल्याची कबुली दिली आणि विकारावर विजय मिळविण्यासाठी पांडुरंगाशी भक्ती किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी आयुष्यभर समजावून सांगितलं. जीवन जगत असताना जीवनाचा परमोच्च आनंद घेता आला पाहिजे. तेव्हाच खर्‍या अर्थाने जीवन सार्थक झाल्याचे मनाला वाटते. असे आनंददायी जीवन जगत असताना मग पुढील काळात आपल्या हातून सत्कर्म घडत राहून कुटुंब, समाज, राष्ट्र, देश उन्नतीवर जाताना दिसतो. याकरिता मन हे नेहमी प्रसन्न राहावयास पाहिजे. म्हणूनच यशस्वी जीवनात मन प्रसन्न ठेवणे किती महत्त्वाचे आहे, ही बाब आपल्या लक्षात आलीच असेल. चांगल्या कामाकरिता मनच जबाबदार असते तसेच वाईट कामाकरिताही तेवढेच जबाबदार धरले जात असते. वास्तविक माणूस नेहमी सुखाच्या शोधात असतो हे जरी खरे असले, तरी सुख हे दु:खानंतरच येत असते. जसे टाकीचे घाव सहन केल्यानंतरच देवपण लाभत असते ही आजवरशी अनुभूती. सुख कशामध्ये आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र एकदम देता येणार नाही. कारण सुखाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. सुख कशात मानावयाचे हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार आहे. एखाद्या गोष्टीत एकाला सुख तर दुसर्‍याला दु:ख असू शकते. म्हणूनच आपल्या मनात असणारे विकार, दोष दूर सारण्याशी ताकद आपल्यात तयार झाली तेव्हा निर्विकल्प होणे हीच सुखासाठी आपली पहिली पायरी ठरत असते. मग आपण बरोबर सुखाजवळ जाऊन त्याचा मनमुरादपणे आनंद घेऊ शकतो आणि खरं सुख काय आहे ते कळते. असे नामस्मरण जेव्हा आपण भक्तिपूर्वक निष्ठेने करतो तेव्हा आपणास ईश्वराच्या रूपाचे दर्शन होते. असे दर्शन झाल्यानंतर आपल्या आनंदाला व सुखाला सीमाच राहत नाही. तेव्हा मात्र या सर्वांग सुंदर असलेल्या विठ्ठल दर्शनाने सुखाशी आलेली अनुभूती ही वेगळीच असून मग मिळालेल्या आनंदाचे मोजमापच ठरत नाही. असं सुख प्राप्तीसाठी कुठल्याही काळाशी, वेळेशी गरज नाही. अशा या विठ्ठल दर्शनाने तृप्त झाल्यानंतर पांडुरंग परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करताना खरोखर ते रूप कसे आहे, याबाबत आपल्या भक्तांना अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतात की,
 
 
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटावरी ठेवूनियां।
तुळसी हार गळां कासे पीतांबर।
आवडे निरंतर हेंचि ध्यान।
मकरकुंडले तळपती श्रवणी।
कंठी कौस्तुभमणि विराजित।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।
पाहीन श्रीमुख आवडीनें॥ अ. क्र. 14
ध्यानावस्थेत निर्गुण निराकार प्रसन्न भावमुद्रा असलेले पांडुरंग परमात्मा हे विटेवर उभे असून त्यांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहे. डोक्यावर रत्नजडीत नक्षिदार सोन्याचा टोप घातलेला असून डोक्याच्या मध्यभागी चंदनाचा टिळा लावलेला असा हा जगाचा पालनकर्ता, उद्धारकर्ता परमात्मा विठ्ठलाच्या रूपामध्ये दिसल्यामुळे Saint Tukaram Maharaj महाराजांना असे वाटते की, हे केवळ सातत्याने केलेल्या नामस्मरणाचे फळ असून निष्ठापूर्वक भक्ती केल्यामुळेच त्या भगवान परमात्म्याने दर्शन दिलेले आहे. यावरून नामस्मरणाचा महिमा किती महान असून त्यामुळे मिळालेल्या सुखाची प्रचीती महाराजांना आलेली आहे. जसे संसारात आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळविण्याकरिता आपण जर का अथक परिश्रम करून ती वस्तू मिळावी याकरिता आयुष्यभर त्याच्या मागे लागतो. मग ती एक दिवस आपणास मिळाली तर मग जेवढा आनंद आपणास होतो त्याची गणना करता येत नाही एवढा मोठा आनंद झालेला असतो. त्याचप्रमाणे विठ्ठल दर्शनाकरिता महाराजांनी केलेल्या निष्ठापूर्वक ईश्वर भक्तीमुळे जो काही आज विठ्ठल दर्शनाने आनंद महाराजांच्या मनाला मिळालेला आहे त्या अशा रूपाचे वर्णन करताना त्यांना सुखाची अनुभूती आलेली आहे. याही पुढे जात महाराज सांगतात की, परमात्म्याचे हे रूप पाहत असताना भगवान परमात्मा विठ्ठलाच्या रूपात विटेवर कशा अवस्थेत उभे आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असून कमरेला पीतांबर परिधान केलेला आहे. डोळे दीपवणारे असे सुंदर, विलोभनीय, मनाला भुरळ पाडणारे रूप असून त्या रूपाकडे वारंवार पाहावसं वाटणे साहजिकच आहे. असे हे मनमोहक रूप असून निरंतरपणे ते मनाला आवडणारे आहे. हे सर्व केवळ श्रद्धापूर्वक केलेल्या नामस्मरणामुळे प्राप्त झाले आहे. कोणत्याही चांगल्या कार्यात सातत्य आणि वेळेला किती महत्त्व असते ही बाब लक्षात आली.
 
 
 
पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाल्यामुळे विठ्ठलाचे रूप त्यांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवले. ते भगवान परमात्म्याचे विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करताना Saint Tukaram Maharaj महाराज म्हणतात की, त्या भगवान परमात्म्याच्या कानात कोरीव सुंदर नक्षिदार अशी कुंडले असून गळ्यात कौस्तुभ मणी चकाकत आहे. त्याच्या चकाकण्यामुळे आपले सर्व लक्ष तो वेधून घेत आहे. असं हे भगवंताचं रूप पाहत असताना हृदयात साठवून घेताना मनाला सुख प्राप्त होत आहे. अशा या सुखाच्या प्राप्तीकरिताच त्या भगवंताचे अखंडपणे नामस्मरण आजपर्यंत करीत आलो आहे. अशाच सुखाची वाट मी पाहात आलो आहे. कारण या सुखापेक्षा दुसरं कोणतंच सुख मला अपेक्षित नाही. भावपूर्वक भक्ती ही केवळ त्या पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनाकरिताच. या जन्मात त्या भगवान परमेश्वर विठ्ठलाची मनोभावे सेवा व अखंड नामस्मरणामुळे झालेले दर्शनामुळे मला सर्व सुखप्राप्तीशी अनुभूती आली आहे. माझ्याकरिता हेच सुखाचे आगर आहे. म्हणूनच मला त्या भगवंताचे श्रीमुख आवडीने पाहण्यातच खरा आनंद आहे. त्याच्या दर्शनाने मला परिपूर्ण असे सुख आज प्राप्त झाले आहे. अखंड नामस्मरण, श्रद्धापूर्वक भक्तीच्या जोरावर झालेले ईश्वर दर्शन होऊन भगवान परमात्मा विठ्ठलाच्या रूपात कसा दिसतो आहे, याचे सविस्तर वर्णन महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरे सुख कोणते तर ते माझ्या मते मला झालेले विठ्ठलाचे दर्शन हेच खरे सुख आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत मन:पूर्वक गोडवे गाणार असून पांडुरंगाचेच दर्शन मी सदासर्वकाळ आवडीने घेणार आहे.