राष्ट्रीय चेतनेचा अखंड जागर

    दिनांक :11-Feb-2024
Total Views |
- डॉ. मनमोहन वैद्य
सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ
राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक असलेल्या SriRam Mandir श्रीराम जन्मस्थानी श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण अनमोल आहे. या प्राणप्रतिष्ठेमुळे प्रत्येक भारतीय प्रसन्न आणि आनंदी आहे. जगातील तमाम हिंदू आणि भारतप्रेमी लोकांमध्ये एक अनोखा उत्साह, उत्सव आणि एक दीर्घकालीन संकल्पपूर्तीच्या आनंदाची अनुभूती प्रत्ययास येत आहे. हे अशक्य वाटणारे पण अत्यावश्यक कार्य कसे शक्य झाले, याचे लोकांना आश्चर्य वाटते आहे आणि लोक संघाकडे पाहात आहेत.
 
 
raam
 
एकदा एका व्यक्तीने मला विचारले की, स्वातंत्र्यानंतर भारतासाठी संघाचे काय योगदान आहे? मी म्हणालो की, संघाने ठरवले आहे की, आपण फक्त वैयक्तिक विकास, सामाजिक संघटन आणि राष्ट्रीय चेतना जागृत करू. राष्ट्रीय दृष्टिकोनातून जागृत असलेली अशी माणसे समाजाच्या पाठिंब्याने जे आवश्यक, करण्यासारखे आणि अपेक्षित असेल ते सर्व करतील. संघ बाकी काही करणार नाही. त्यामुळे संघाने काय केले याचे उत्तर आहे - समाज जागरण आणि संघटना याशिवाय दुसरे काहीही केले नाही. पण जर संघ नसता तर भारतात काय काय घडले नसते, याची मोठी यादी होऊ शकते.
 
 
 
SriRam Mandir : हिंदुत्व विचारांचे प्रणेते आणि हिंदुत्वाला सातासमुद्रापार अमेरिकेत प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी 1963 मध्ये सुरू होणार होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी दोन वर्षे भारतभ्रमण केले आणि शेवटी 25 डिसेंबर 1892 रोजी ते कन्याकुमारीत समुद्रात असलेल्या श्रीपादशिलेपर्यंत (रॉक) पोहत गेले. तेथे तीन दिवस-रात्री ध्यान केल्यावर त्यांना आपल्या जीवनाचा खरा उद्देश आणि दिशा गवसली. पुढे ते अमेरिकेला गेले. त्यामुळे 1962 मध्ये तत्कालीन तामिळनाडू सरकारने स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्या श्रीपादशिलेवर स्वामीजींचे स्मारक म्हणून त्यांचा भव्य पुतळा बसवण्याचा विचार केला. पण, ख्रिश्चनांनी त्या शिलेवर ताबा मिळवून एका ख्रिस्ती संत झेवियरच्या स्मारकाची योजना जाहीर केली. या वादातून होणारी कोंडी टाळण्यासाठी तामिळनाडू सरकारने स्वामी विवेकानंदांचे स्मारक बांधण्याची योजना सोडून दिली. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजींनी संघाचे तत्कालीन सरकार्यवाह एकनाथजी रानडे यांच्यावर हे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविली. संघाच्या स्वयंसेवकांनी त्या शिलेवरील ख्रिश्चनांचे नियंत्रण हटवून तेथे स्वामी विवेकानंदांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याची योजना आखली. या स्मारकासाठी सर्वसामान्यांकडून 1, 2 किंवा 5 रुपये केवळ प्रतीक म्हणून घेण्याचा संकल्प घेतला. यानंतर संपूर्ण भारतातील 30,00,000 लोकांकडून 80,00,000 रुपये गोळा करण्यात आले. इतकेच नव्हे, तर त्या काळातील सर्व राज्य सरकारांकडून (1963 मध्ये बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसशासित सरकारे होती) प्रतीकात्मक आर्थिक मदत देण्याचे वचन घेण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केरळ आणि जम्मू-काश्मीर वगळता सर्वच राज्य सरकारांनीही आर्थिक मदत केली. यानिमित्त प्रांत, भाषा, उपासनेच्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाचा जागर सर्व राज्यांतील गावागावांत झाला. आज सुदूर दक्षिणेत समुद्रात असलेले स्वामी विवेकानंद शिला स्मारक संपूर्ण भारतातील लोकांच्या श्रद्धेचे व आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे हिंदू समाजानेच केले ही गोष्ट निर्विवाद आहे. पण रा. स्व. संघ होता म्हणूनच हे शक्य झाले हे देखील तेवढेच सत्य आहे.
 
 
 
SriRam Mandir : हिंदू समाजात मोक्षप्राप्तीसाठी विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपासना-साधनेची प्राचीन परंपरा आहे. त्यात उपासनेचे नवनवे मार्ग जोडले जात आहेत आणि जोडले जातील, हे हिंदू विचारांचे, तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. अशा साधू, संत, मठाधिपती इत्यादी सर्वांना एकत्र बसवून हिंदू समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना यावर चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठाची गरज भासली. त्यासाठी तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजींच्या प्रयत्नांनी 1964 मध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. याच्या पहिल्या बैठकीत जैन, शीख, बौद्ध यांच्यासह हिंदू समाजातील सर्व प्रमुख आखाडे, उपासना, परंपरांचे प्रमुख संत उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे पहिले धर्म संमेलन 1966 मध्ये तीर्थराज प्रयाग येथे झाले; ज्यामध्ये शेकडो वर्षांनंतर प्रथमच चारही शांकरपीठांचे शंकराचार्य आणि सर्व प्रमुख मठाधिपती आणि धर्माचार्य उपस्थित होते. हिंदू समाजाच्या दुर्बलतेमुळे जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्या अनेक हिंदूंना त्यांच्या मूळ धर्मात, परंपरेत परत यायचे होते. पण धर्मांतरानंतर ते पतित (म्लेंच्छ) झाले असे मानण्याची रूढी पडली. हिंदू समाज त्यांचे रक्षण करण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे त्यांना निरुपायाने धर्मांतर करण्यास भाग पडले. आता त्यांना परत स्वधर्मात घेण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असा प्रस्ताव या धर्म संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.
 
 
हिंदू कधीच पतित होऊ शकत नाही.
‘न हिंदू पतितो भवेत’ हे सूत्र एक घोषणा बनली. त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेची दुसरी धर्माचार्य परिषद 1969 साली कर्नाटकातील उडुपी येथे झाली. ‘सर्व हिंदू एकाच परमेश्वराची लेकरे आहेत, सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे’ असे मानणार्‍या हिंदू समाजात दुर्दैवाने जातिभेद, उच्च-नीच, अस्पृश्यता असे दोष निर्माण झाले. या परिषदेत अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या, अनिष्ट रूढींना धर्माचा कुठलाही आधार नसल्याचा ठराव सर्व धर्मगुरूंनी एकमताने संमत केला. हे कार्य संघाने केले नाही. मात्र, संघामुळे ते शक्य झाले हे देखील तेवढेच खरे आहे.
 सर्व हिंदू सहोदर आहेत, भाऊ-भाऊ आहेत.
‘हिन्दव: सोदरा सर्वे। न हिंदू पतितो भवेत॥’
 
 
हे नवे सूत्र बनले.
1981 मध्ये तामिळनाडूतील मीनाक्षीपुरम्मध्ये अनुसूचित जातीच्या लोकांचे सामूहिक धर्मांतर करण्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण भारतातील जनमानस ढवळून निघाले, लोक हादरलेच. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अशा प्रकारचे धर्मांतर थांबवण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आणि धर्मांतरामुळे बाधित होणार्‍या अशिक्षित, शोषित, निरपराध मागासलेल्या समाजाला सामाजिक न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासह त्यांच्यात जागृती आणण्यासाठी तसेच त्यांना शिक्षित करून आणि त्यांच्यात सामाजिक चेतना जागृत करण्याच्या दृष्टीने विविध सेवा प्रकल्पांची आखणी करण्यात आली. यासाठी ‘संस्कृती संरक्षण निधी’ गोळा करण्यासाठी संपूर्ण देशभरातील 5500 गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याच वेळी आधीच्या घोषणेमध्ये आणखी एक सूत्र जोडले गेले -
‘हिन्दव: सोदरा सर्वे। न हिंदू पतितो भवेत॥
हिंदू रक्षा मम दीक्षा। मम मंत्र समानता॥’
 
 
SriRam Mandir : सुदूर तामिळनाडूतील एका लहानशा गावात झालेल्या या सामूहिक धर्मांतराविषयी भारतातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकांकडून एकसारखीच प्रतिक्रिया व्यक्त झाली आणि संपूर्ण देशानेही अशीच भावना व्यक्त केली आणि अनुभवली. यातून प्रेरणा घेऊन संपूर्ण देशात एकता आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेने भारत मातेची प्रतिमा आणि गंगाजलाचे कलश घेऊन संपूर्ण भारताला जोडणार्‍या तीन प्रमुख यात्रा काढण्याची योजना आखली. एकात्मता यज्ञ यात्रा नावाने काठमांडू ते रामेश्वरम् (पशुपती रथ), हरिद्वार ते कन्याकुमारी (महादेव रथ) आणि गंगासागर ते सोमनाथ (कपिल रथ) या तीन मुख्य यात्रांबरोबरच 300 हून अधिक उपयात्रा होत्या, ज्यांनी 1000 दिवसांत भारतातील जास्तीत जास्त ठिकाणे आपसात जोडली. लोक आपापल्या ठिकाणाहून पवित्र जलाचा कलश घेऊन या यात्रेत सहभागी झाले होते. एकूण 38,526 ठिकाणांहून 77,440 कलश पूजनासाठी आले होते. यामध्ये भारतातील एकूण 5,64,342 ठिकाणांपैकी (वस्तीसह) 1,84,592 ठिकाणांहून 7,28,05,520 लोक सहभागी झाले होते; ज्यात 49 टक्के महिला होत्या. जात, प्रांत, भाषा, उपासना इत्यादींच्या पलीकडे जाऊन संपूर्ण हिंदू समाजात एकात्मतेची भावना जागृत होत असल्याचा अनुभव लोकांनी घेतला.
 
 
 
याच दरम्यान उत्तरप्रदेशातील मेरठजवळील मुझफ्फरनगर येथे झालेल्या एका धर्मसभेत तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारचे मंत्री दाऊदयाल खन्ना यांनी अयोध्येतील श्रीरामललाच्या मंदिराला कुलूप असल्याचे आणि पुजारी वगळता एकाही रामभक्ताला दर्शनासाठी आत जाण्याची परवानगी दिली जात नसल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. मोगल आक्रमक बाबरने केवळ आपला धाक, दहशत निर्माण करण्यासाठी श्रीरामललाचे मंदिर पाडून त्याच ठिकाणी मशीद बांधण्याचा अपराध केला होता. तथापि, जबरदस्तीने ताब्यात घेतलेली भूमी किंवा वास्तूत पढलेला नमाज/प्रार्थना अल्लाला मान्य नाही, अल्ला ते स्वीकारत नाही असे इस्लामी विचारवंतांचे, विद्वानांचे म्हणणे आहे. तरीही हे गैर-इस्लामिक कृत्य केवळ हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठीच करण्यात आले. यानंतर तेथे पुन्हा मंदिराच्या उभारणीसाठी सातत्याने संघर्ष सुरूच होता. ब्रिटिश राजवटीत 1938 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने या वादग्रस्त जागेच्या 100 मीटर परिसरात मुस्लिम समुदायाला येण्यास बंदी घालण्यात आली. 1949 मध्ये रामलला तेथे प्रकटले. तेव्हापासून मंदिराला कुलूप ठोकण्यात आले आणि रामललाची नियमित पूजा-अर्चना सुरूच होती. केवळ पुजार्‍याला कुलूप उघडून पूजेसाठी मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी होती.
 
 
SriRam Mandir : त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने रामललाच्या मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते. फेब्रुवारी 1986 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिराचे कुलूप उघडण्यात आले आणि रामभक्तांना मंदिरात दर्शनासाठी जाणे शक्य झाले. या विजयामुळे हिंदू समाजाचे मनोबल वाढले आणि आक्रमणाचे प्रतीक असलेल्या वादग्रस्त वास्तूच्या जागी श्रीरामललाचे भव्य मंदिर बांधण्याची योजना आखण्यात आली. यासाठी जनजागृती करण्यासाठी देशभरात असंख्य ठिकाणी श्रीरामशिला पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि समारंभपूर्वक या रामशिला अयोध्येत येऊ लागल्या. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाप्रमाणेच अयोध्येत श्रीरामललाचे भव्य मंदिर उभारणे हा इस्लाम किंवा मशिदीला विरोध नसून भारताचा अभिमान पुनर्संचयित अर्थात पुनर्स्थापित करण्याचे कार्य आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात अभूतपूर्व जनजागृती झाली. गावागावांतून ‘श्रीराम’ लिहिलेल्या शिला गोळा करून, श्रीरामशिला पूजन करून त्या शिला श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला पाठवण्याची योजना आखण्यात आली. त्यामुळे संपूर्ण भारतात सर्वत्र व्यापक जनसंपर्क व जनजागृती झाली. 2,75,000 गावांमध्ये 6 कोटी लोकांनी श्रीरामशिला पूजन केले. सारा देश राममय झाल्याचे दिसत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक शक्तीपेक्षा किंवा नेटवर्कपेक्षा हे कितीतरी पटीने अधिक होते. त्यामुळे संघाने हे केले असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. हे सर्व भारताच्या जनतेने, रामभक्तांनी केले. यात संघ त्यांच्यासोबत होता.
 
 
संघ नसता तर हा व्यापक, सुरळीत जनसंपर्क आणि जनजागृती कदाचित झाली नसती. जेव्हा एखादी इमारत उभारण्यात येते तेव्हा तिचा संपूर्ण भार (लोड) उचलण्यासाठी मजबूत (Column) खांबांचा आधार असतो. हे पिलर्स उभे करण्यासाठी लोखंडी रॉडचा ‘पिंजरा’ (स्केलेटन) मदत करतो. या पिंजर्‍याची इमारतीचे वजन उचलण्याची क्षमता नाही. पण त्या आरसीसीच्या खांबांची क्षमता या लोखंडी पिंजर्‍यातून येते, जी बाहेरून दिसत नाही. संघाला संपूर्ण समाज संघटित करून समाजात अशी रचना करायची आहे की, समाजहिताच्या प्रत्येक कार्याला हा ‘पिंजरा’ बळ देईल. जागृत समाजच कार्य करेल, हे निश्चित.
 
 
या सर्व जनजागृतीची परिणती 6 डिसेंबर 1992 च्या कारसेवेत झाली. न्यायालयात संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरही न्याय मिळण्यास आणि निर्णय होण्यास विनाकारण विलंब पाहून कारसेवेसाठी आलेले 2,50,000 हून अधिक कारसेवक अनियंत्रित झाले. अवघ्या 5 तासांत एवढी बळकट वास्तू कोसळणे अकल्पनीय आणि अशक्य गोष्ट होती. पण हा सारा जमाव नियंत्रणाबाहेर गेल्यावरही त्यांचा स्वतःवर ताबा होता.There was an order in the disorder. त्यामुळेच या प्रचंड गोंधळात रामललाची मूर्ती सुरक्षितपणे तेथून हटवणे आणि तात्पुरते, अस्थायी शेड उभारून तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करणे शक्य झाले. यासोबतच 55 हजार लोकसंख्या असलेल्या अयोध्येत 10 टक्के मुस्लिम समाज राहतो. तेथे सुमारे 15 मशिदी आहेत. या मशिदींपैकी एकाही मशिदीवर या लाखो कारसेवकांकडून दगडफेक झाली नाही. तसेच कोणत्याही मुस्लिमासोबत गैरवर्तन झाले नाही. वामपंथीयांचा (अगदी कमी संख्या असूनही) त्यांच्या आंदोलनात हिंसाचार होणे, आजूबाजूच्या निष्पाप लोकांची घरे, दुकाने, वाहने इत्यादींची तोडफोड करणे, ती जाळणे हा लोकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण अयोध्येत संपूर्ण भारतातून जवळजवळ 2,50,000 कारसेवक आले होते. मात्र, या अनियंत्रित परिस्थितीतही त्यांनी पूर्ण संयम राखला ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. कारण ही जनजागृती मोहीम मशिदीच्या विरोधात किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हती. एक गोष्ट मात्र निश्चित या स्तंभांचा ‘पिंजरा’ संघाचा होता आणि यामुळेच त्या गर्दीत शक्ती आणि संयम दोन्ही होते.
 
 
जीवनातील सर्व क्षेत्र जसे विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शास्त्रज्ञ, कलावंत, अधिवक्ता इत्यादींची भारताच्या ‘स्व’ च्या (स्वत्व, अस्मिता) प्रकाशात पुनर्बांधणी आणि विकास व्हावा, असा विचार करणारे आणि त्याप्रमाणे कार्य करणारे लोक निर्माण करण्याचे हे मूलभूत कार्य, व्यक्ती घडविण्याचे कार्य संघ करेल. याशिवाय संघ दुसरे काही करणार नाही. अशा राष्ट्रीय विचारांनी जागृत झालेल्या व्यक्ती समाजाच्या मदतीने आणि सहकार्याने नवीन व्यवस्था निर्माण करतील ही कल्पना आहे.
 
 
SriRam Mandir : राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघ वचनबद्ध असून स्वयंसेवक कटिबद्ध आहेत. त्यामुळे 12,000 शाळा आणि 84,000 एकल शाळांच्या माध्यमातून भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणाचे यशस्वी प्रयोग समाजात सुरू आहेत. आपल्या सामूहिक प्रयत्नातून सरकारवर अवलंबून न राहता 2,000 गावांमध्ये विकासासाठी आणि 8,000 नागरी वस्त्यांमध्ये वस्ती विकासासाठी पुढाकार घेत आहे. सामाजिक विषमतेची प्रथा संपवून समरस, सुसंवादी आणि एकात्म समाज निर्माण करण्याचे प्रयत्न संपूर्ण भारतभर सुरू आहेत. नोकरी मागण्याऐवजी स्वावलंबी होण्यासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने प्रेरणा, प्रशिक्षण आणि पाठबळ देण्यासारख्या अनेक गोष्टी समाज सक्रियपणे करत आहे. अशा समाजाची उभारणी करताना या सर्व कार्यात स्वयंसेवक त्यांच्यासोबत सक्रिय असतात.
 
 
भारताच्या ‘स्व’ चा आधार भारताचे अध्यात्म आहे, ज्याचे एक प्रतीक म्हणजे भगवान श्रीराम. कोरोनाचा भयंकर, प्राणघातक, संसर्गजन्य आजार जगातील अनेक देशांमध्ये होता. एकट्या भारतात या आजाराच्या वेळी सरकारी यंत्रणांसह संघाचे 5.5 लाख स्वयंसेवक आणि समाजाचा एक मोठा वर्ग लोकांच्या मदतीसाठी सक्रिय होता. ही भारताच्या सर्वसामान्य लोकांची आध्यात्मिक अभिव्यक्ती होती, जी या संसर्गजन्य संकटाच्या काळात प्रकट झाली. भारताच्या ‘स्व’ चा ‘स्वत्वा’चा दुसरा आधार म्हणजे समाजाच्या (राष्ट्राच्या) बहुतांश व्यवस्था शासनाधारित न राहता समाजाधारित राहणे. याचा अनुभव या कोरोना कालखंडात आला.
एका संघ गीतात म्हटले आहे -
केवल सत्ता से मत करना परिवर्तन की आस।
जाग्रत जनता के केंद्रोंसे होगा अमर समाज॥
 
 
संघ जनजागृतीसाठी अशी केंद्रे (शाखा) चालवतो. असे जागृत स्वयंसेवक समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत एक संरचना (पिंजरा) निर्माण करतील. बाकीचे काम समाज करेल, त्याला बळ आणि दिशा देण्याचे काम अशी केंद्रे करतील. आरसीसीच्या खांबांमधील भार सहन करण्याची क्षमता वाढवणारा पिंजरा तर निर्जीव लोखंडाने बनलेला आहे, परंतु जागृत समाजाच्या अशा कार्यात आणि चळवळीत, हा अदृश्य पण जोडलेला पिंजरा जिवंत माणसांनी बनलेला आहे, जो आयुष्यभर खंबीर, अविचल आणि गाडलेला राहतो. त्यासाठी आवश्यक असे आत्मविलोपी, निष्ठावान, समर्पित आणि वचनबद्ध कार्यकर्ते संघ तयार करीत आहे. Rome was not built in a day असे म्हणतात. त्याचप्रमाणे हा राष्ट्रीय चेतनेचा जागर एका दिवसात नाही तर अविरत प्रयत्न आणि समाजाच्या सतत वाढत जाणार्‍या पाठिंब्यामुळेच शक्य झाला आहे.
 
 
16 मे 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले. ब्रिटनमधून प्रकाशित होणार्‍या दैनिक ‘द गार्डियन’ (18 मे 2014) च्या संपादकीयाची सुरुवात अशी आहे - “Today,18 may, 2014, may well go down in history as the day when Britain finally left India.” ‘द गार्डियन’ पुढे लिहितो - “It should be obvious that underlying changes in Indian society have brought us Mr. Modi and not the other way around.”
 
SriRam Mandir : हे राष्ट्रीय जागरणाचे, राष्ट्रचैतन्य जागृतीचे कार्य सुरू झाले आहे आणि सुरूच राहील. श्रीरामावरील भक्तीमुळे हे सोपे झाले. हे करावे लागेल, हे केलेच पाहिजे. कर्तव्यपथावर अखंड चालत राहावे लागेल, चालत राहावे लागेल. चरैवेती, चरैवेती...
डॉ. मनमोहन वैद्य
सह सरकार्यवाह
रा. स्व. संघ