नकारात्मकतेचा काँग्रेसला फटका

    दिनांक :12-Feb-2024
Total Views |
वेध
- चंद्रकांत लोहाणा
काँग्रेसचे युवराज Rahul Gandhi राहुल गांधी यांना झाले तरी काय? किती वेळा विचारायचा हा प्रश्न? ऊठसूट भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या घालण्यातच त्यांचे आयुष्य खर्ची पडणार का, अशी भीती आता वाटायला लागली आहे. कायम नकारात्मक भूमिका घेणारा मनुष्य आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही आणि तो ज्या संस्था, संघटनेत, राजकीय पक्षात काम करतो, त्या पक्षालाही यशस्वी होऊ देत नाही. राहुल गांधी यांच्या नकारात्मक भूमिकेचा फटका काँग्रेस पक्षाला आधीही बसला आहे, आजही बसतो आहे आणि भविष्यातही बसतच राहणार, हे निश्चित! सध्या त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. काँग्रेसची सत्ता असताना जाती-जातीत भांडणे लावण्याचे पाप केले, मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल दहशत निर्माण करून विभाजनाची बीजे पेरली आणि आता सत्ता गेली म्हणून न्याय द्यायला निघालेत. भारतीय राजकारणात काही बदल होवोत न होवोत, मनोरंजन निश्चितपणे होते आहे. आपण काय बोलतो, जे बोलतो त्याला लोक हसतात, आपली टिंगलटवाळी करतात, याचे भान राहुल गांधी यांना राहात नाही. देशावर दीर्घकाळ सत्ता गाजवणार्‍या नेहरू-गांधी घराण्यातील एखादा नेता हा देशातल्या जनतेच्या मनोरंजनाचा केंद्रबिंदू ठरावा, यापेक्षा मोठे त्या घराण्याचे आणि काँग्रेस पक्षाचे दुर्दैव असू शकते? निवडणुका तोंडावर आल्या असताना त्यांनी मोदींच्या जन्मावेळी ते ओबीसी नव्हते, असे सांगण्याची काही आवश्यकता होती का?
 
 
Rahul Gandhi

 
नव्या वर्षात सगळीकडे सकारात्मक ऊर्जेचा संचार झालेला पाहायला मिळत असताना, लोक चांगले होईल अशी आशा करत असताना राजकारणातील एक गट नकारात्मक भूमिका सोडायला तयार नाही. अंबानी आणि अदानी यांना लाभ व्हावा म्हणूनच सरकारकडून वेळोवेळी कायदे केले जातात, असा अपप्रचार करत Rahul Gandhi राहुल गांधी सातत्याने काही औद्योगिक घराण्यांवर टीका करत आहेत. त्यांच्याविरुद्ध जनमानस संतप्त कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. भारतीय राजकारणाचा हा दुर्दैवी कालखंड आहे. कृषिविषयक कायदे रात्रीतून तयार झालेले नव्हते. त्यासाठी तीन दशकांपासून विचारविनिमय चालू होता. काँग्रेसलाही असे कायदे करायचे होते. काँग्रेसचे तत्कालीन वकील नेते कपिल सिब्बल यांची आणि अन्य अनेक काँग्रेसी नेत्यांची संसदेतील गतकाळातील भाषणे आपण ऐकलीत तर काँग्रेस कृषी कायद्यांविरोधात नव्हती, हे आपल्या लक्षात येईल. पण, हे कायदे मोदींनी केले आहेत, त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पराभवाचे तोंड पाहावे लागेल ही भीती राहुल गांधी यांना सतावते होती. त्यातूनच ते सातत्याने विरोधी भूमिका घेत स्वत:चे आणि पक्षाचे नुकसान करीत आहेत, हे त्यांच्या लक्षातच येत नाहीये.
 
 
 
Rahul Gandhi राहुल गांधी जेवढे मोदी सरकारविरुद्ध बोलतील, जेवढी टीका करतील, तेवढी मोदींची लोकप्रियता वाढेल आणि त्याचा लाभ येणार्‍या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपालाच होईल, हे राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातले लोक सांगत का नाहीत, याचेही आश्चर्य वाटत नाही. कारण, जे लोक त्यांना चांगले सल्ले देतात, ते त्यांच्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये जातात, अशी वदंता आहे. त्यामुळे कुणी बोलण्याची हिंमत करत नाही. निवडणुका जिंकणार्‍या पक्षात उत्साह असतो, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य असते. त्याचप्रमाणे निवडणुका हारलेल्या पक्षात हताशा असते, निराशा असते, कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची झालेले असते. निवडणुकीच्या राजकारणात हे चालणारच, हे खरे असले तरी पराभवातून धडा घेत झालेल्या चुका दुरुस्त करणारा पक्ष पुढल्या निवडणुुकीत लक्षणीय यश मिळवून जातो, हेही आपण पाहिले आहे. निवडणुकांमध्ये वेगवेगळे नारे दिले जातात. घोषणा केल्या जातात. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला होता.
 
 
आणिबाणीनंतर ‘इंदिरा हटाव देश बचाव’ असा नारा जयप्रकाश नारायण यांनी दिला होता. त्याचा फायदा काँग्रेसला पराभूत करण्यात झाला होता. मधल्या काळात ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असाही नारा लागला. त्याचा फायदा भाजपाला झालाच. पण, 2004 साली इंडिया शायनिंगचा नारा भाजपाने दिला आणि निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे राजकारणात प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा लाभच होईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, तुम्ही सकारात्मक भूमिका घेतली, विकासाचा कार्यक्रम घेऊन जनतेत गेलात तर यश हे हमखास मिळतेच! पंतप्रधानांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ हा नारा राहुल गांधी यांनी दिला होता. हा नारा काँग्रेसवर उलटला आणि त्याने मोदींच्या विजयाची पायाभरणीच करून टाकली. राहुल गांधी यांच्या या नार्‍याला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही ‘मैं भी चौकीदार’ असा नारा दिला आणि राहुल गांधी यांच्या आरोपातली हवाच काढून टाकली. आता या निवडणुकीच्या वर्षात नवा संकल्प घेऊन, सकारात्मक ऊर्जा घेऊन ते जनतेपुढे आले असते तर अधिक बरे झाले असते.
 
- 9881717856