विहिरगावात रानटी हत्तींचा उच्छाद, धान व कारली पीकाचे नुकसान

    दिनांक :12-Feb-2024
Total Views |
गडचिरोली, 
rampage of wild elephants : ओडिसा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींचा उपद्रव थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज कुठल्या ना कुठल्या भागात जंगली हत्तींकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. देसाईगंज तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींनी उच्छाद मांडला आहे. देसाईगंज वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या विहिरगाव उपक्षेत्रातील शेतशिवारात शनिवारी रात्री हत्तींनी प्रवेश करून धान व कारली पीक अक्षरश: पायदळी तुडवले. त्यामुळे शेतकर्‍यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. नुकसानीचे दृश्य पाहून शेतकरी रडकुंडीस आला आहे.
 
 
22
 
 
प्राप्त माहितीनुसार, मागील एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून रानटी हत्तींचा कळप आरमोरी व देसाईगंज वनपरिक्षेत्रातील गाव परिसरात भ्रंमती करीत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरु आहे. शेतकर्‍यांनी या हंगामात तूर, मुग, उडीद, हरभरा, मकासह उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. मात्र रानटी हत्तींकडून महिनाभरापासून या पिकांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, देसाईगंज वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या विहिरगाव शेत शिवारात शनिवारी रात्री हत्तींचा कळपाने प्रवेश करून डझनभर शेतकर्‍यांचे भातपिक पायदळी तुडवले. याशिवाय कारली पिकाचीही नासाडी केली. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
शनिवारी रात्री हत्तींच्या कळपाने देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव परिसरात पोहोचून शेतपिकांचे नुकसान केले. मागील आठवडाभरापासून हत्तींचा कळप विहिरगाव परिसरातच भ्रमंती करीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक रात्र जागून काढत आहेत. त्यांच्यासोबत वनविभागाचे कर्मचारीही असले तरी हत्ती कधीही गावात प्रवेश करून नुकसान करतील, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे हत्तींना हुसकावून लावण्याची मागणी होत आहे.
 
वन कर्मचार्‍यांनी केला नुकसानीचा पंचनामा
 
देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथे शनिवारी मध्यरात्री जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला. भात आणि कारली पिकाचे नुकसान केले. रविवारी सकाळी शेतात आल्यानंतर समोरचे दृश्य पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
 
हत्तींचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी
 
मागील दोन ते अडीच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. हत्तींकडून पिकांचे नुकसान केले जात असल्याने तिन्ही तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही हत्तींचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने वनविभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. नुकसानीची तुटपूंजी भरपाई मिळत असल्याने शेती करावी की नाही, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.