वोकीझम ठेचायलाच हवा...

15 Feb 2024 06:00:00
इतस्तत:
- डॉ. विवेक राजे
Vocism : भोसला सैनिकी विद्यालयात बंदुकीच्या गोळ्या वापरून झाल्यानंतर जे गनमेटल उरतं, त्या धातूचा वापर करून कोदंडधारी रामाची मूर्ती शाळेच्या आवारातील मंदिरात स्थापित आहे. सुमारे 40-45 वर्षांपूर्वी जेव्हा सैनिकी परंपरा जोपासणार्‍या या शाळेत योद्धा राम किंवा कोदंडधारी रामाची मूर्ती घडवली गेली तेव्हाची ही घटना, तेव्हाचे या शाळेचे कमांडंट मेजर पी. बी. कुलकर्णी यांनी अनेकदा सांगितली आहे. योद्धा रामाची मूर्ती घडवावी म्हणून मेजर कुलकर्णी कल्याण येथील मूर्तिकार भाऊ साठे यांच्याकडे गेले तेव्हा त्यांचे सगळे म्हणणे ऐकून, अग्रिम रक्कम घेऊनसुद्धा मूर्तिकार भाऊ साठे मूर्ती घडवत नव्हते. दिलेल्या तारखा उलटून जात होत्या; मूर्ती मात्र घडवली जात नव्हती. शेवटी वर्षभर प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर एक दिवस, मेजर कुलकर्णींना मूर्तिकार साठे यांनी फोन करून ‘मूर्ती तयार आहे, तेव्हा या आणि बघा तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती घडलेली आहे की नाही’, असे सांगितले. मेजर कुलकर्णी स्वतः मूर्ती घेण्यासाठी साठेंकडे गेले. तिथे अगदी आपल्या मनातील योद्धा रामाची रेखीव मूर्ती पाहून त्यांना आनंद झाला. नंतर गप्पा मारताना मेजर कुलकर्णींनी सहजपणे मूर्तिकार साठे यांच्याकडे मूर्ती घडवण्यात झालेल्या उशिराचे कारण विचारले. साठे म्हणाले, ‘‘मेजर साहेब! अहो माझ्या मनात जरी ही अतीव सुंदर मूर्ती आपल्या पहिल्या भेटीतच आकाराला आलेली असली, तरी मला तेव्हा प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवता येणार नव्हती. त्यात एक अडचण येत होती. ती म्हणजे तेव्हा मी स्वतः सिगारेट फुंकत असे आणि ज्या बोटांमध्ये मी सिगारेट धरत असे त्या बोटांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती मी कशी घडवणार? त्यामुळे भोसलाकरिता मूर्ती घडवून देतो अशी स्वीकृती दिल्यानंतर, पहिले सहा महिने सिगारेट सोडण्यात गेले, त्यानंतरच्या सहा महिन्यात मी मनाने शुद्ध झालो आणि त्यानंतरच्या एक महिन्याच्या कालावधीत ही मूर्ती आकाराला आली.’’
 
 
University of Pune
 
ही एक घटना तर...
शुक्रवारी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात श्रीराम आणि सीता यांच्या हातात सिगारेट आणि तोंडात शिव्या असे एक नाटक तेथील खुल्या रंगमंचावर सादर केले गेले. या तथाकथित परीक्षात्मक पण पुरोगामी नाटकात ‘अभाविप’च्या तरुणांनी आक्रमक हस्तक्षेप करून ते नाटक बंद पाडले. थोडी हातापायी केली. थोडी दंडेली केली, ही दुसरी घटना... या दुसर्‍या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे. त्यातून आणि पोलिस चौकशीतून यथावकाश अनेक गोष्टी समोर येतीलच.
आता यावर या देशातील पुरोगामी मीडियाने लगेच गळे काढून रडायला सुरुवात केली.
 
 
Vocism : ‘हे एक प्रहसन होतं.’ ‘नट आणि नाटकातील पात्र यातील फरक समजावून सांगण्याचा तो एक प्रयोग होता.’ ‘प्रयोग पूर्ण झाल्यानंतर जर यावर अगदी गरमागरम चर्चा झाली असती तरी बरं झालं असतं, पण अशी दंडेली योग्य नाही’ अशी विधाने करीत स्वतःला निःपक्षपाती दाखवत या लोकांनी झालेल्या तथाकथित सादरीकरणाला सहायक असे वातावरण निर्माण करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. हा या साम्यवादी वोकीझमच्या पाठीराख्यांचा हातखंडा प्रयोग आहे. हिंदू समाजाच्या आदर्शांवर अश्लाघ्य टीकाटिप्पणी करायची. हिंदू धर्मातील आदर्श कसे चुकीचे आहेत, हे जमेल त्या मार्गाने मांडत राहण्याचे हे उद्योग आहेत आणि अंगलट आले की, यांच्या इको सिस्टिमने या सगळ्या अपप्रचाराची अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलाविष्कार अशा नावाखाली केलेल्या गुन्ह्याची धार कमी करण्याचा प्रयत्न करायचा, ही यांची कार्यपद्धती आहे. नाना फडणवीस या कर्तृत्ववान अशा ऐतिहासिक माणसाचे चारित्र्यहनन करणार्‍या ‘घाशीराम कोतवाल’सारख्या नाटकांचे हे समर्थन करतात. त्याच वेळी ‘मी नाथुराम बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याचे प्रयत्न करीत असतात. नगरमधील एका महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणण्यात आली, (जी फक्त मातृभूमीप्रति समर्पण भाव व्यक्त करते) तर ही पुरोगामी इको सिस्टिम देशभर घसा खरवडून बोंब मारते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्याचे प्रक्षेपण करताना मशीद पाडून मंदिर उभारणी केली आहे हेच सांगितले जाते; आधी तिथे मंदिरच होते हे सत्य लपवले जाते, हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
अकोल्यातील एका महाविद्यालयात शिवाजी महाराजांवर पोवाडा म्हटला आणि अफझल खानाचा वध दाखवला त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, म्हणून सादरीकरण करणार्‍या विद्यार्थ्यांना माफी मागावी लागली अशी एक बातमी मध्यंतरी आली होती.
कोणी कितीही प्रागतिक विचारांचे असले, तरी आमचे चिरकालिक आदर्श उद्ध्वस्त करणार्‍या अशा तथाकथित प्रयोगांचे समर्थन करता येत नाही. जेएनयू, जाधोपूर आणि अगदी पुणे विद्यापीठदेखील या साम्यवादी वोकीझमच्या पाठीराख्यांचे अड्डे झालेले आहेत. आमच्या आदर्शांची, श्रद्धास्थानांची, ऐतिहासिक नायकांची, हिंदू सांस्कृतिक परंपराची फक्त मोडतोड करण्यात ही विचारसरणी धन्यता मानत आली आहे. त्याचवेळेस हेही लक्षात घेतले पाहिजे की, साम्यवादी विचारसरणी जागतिक पातळीवर आजतागायत कोणत्याही चिरकालिक मूलतत्त्वांची, आदर्शांची, परंपराची रुजवण करू शकलेली नाही. आर्थिक साम्यवाद सर्व सामान्य लोकांनी चुकीचा ठरवला आहे, तेव्हा आता सांस्कृतिक साम्यवाद म्हणून हिंदूच्या सर्व परंपरा, सांस्कृतिक आदर्श यांची हेटाळणी करायची. यातूनच सामाजिक द्वेष पसरवायचा, ही या मागील व्यूहरचना आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने सर्व पंथीय हिंदू एक झालेले दिसत आहेत. त्यामुळे या हिंदू समाजाला गटातटांमध्ये विभागलेच पाहिजे, या विचाराने साम्यवादी किंवा भारतातील वोकीझमचे पाठीराखे अस्वस्थ झाले आहेत, निराश झाले आहेत.
 
 
Vocism : मुळात हे सगळं घडायला ललित कला केंद्रातील प्रशासन आणि प्राध्यापक जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याच संस्कृतीबद्दल तिरस्कार निर्माण करणे. आपल्याच देशातील व्यवस्था कुचकामी आहे, असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण करणे. समाजातील काही घटकांवर सतत अन्यायच होतो आहे अशी भावना निर्माण करणे. एका संख्येने कमी असलेल्या समाज घटकाने दुसर्‍या प्रचंड मोठ्या समाज घटकाचे पिढ्यान्पिढ्या शोषण केले, असे सतत सांगून एकमेकांविषयी अविश्वास निर्माण करणे. समाजाच्या एका गटाच्या मनात शोषिताची तर दुसर्‍या गटाच्या मनात आपले पूर्वज शोषक होते म्हणून अपराधीपणाची सल निर्माण करायची. असे हे एकमेव काम साम्यवादी वा वोक विचारसरणीचे लोक हरप्रयत्ने विद्यापीठांमध्ये, शैक्षणिक संस्थामध्ये करीत आहेत. यातूनच मग समाजाला आदर्श असलेले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, विकृत स्वरूपात समाजापुढे तरुणाईच्या माध्यमातून सादर करण्यात येऊन वर साळसूदपणे ‘नाटक तसे नव्हते हो’ असे म्हटले जाते. वोकीझमचा हा राक्षस विद्यापीठांमधून, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आमच्या घरांच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. समाजाच्या श्रद्धा उद्ध्वस्त करून सगळा समाजच अस्थिर आणि हिंसक करण्याचे हे कारस्थान आहे. अस्थिर तरुणाईला वाटेल त्या मार्गाला लावायचे, हिंसक करायचे आणि एकदा का हिंसा भडकली की, मरू घातलेल्या विकृत साम्यवादी आकांक्षाची पोळी त्यावर भाजून घ्यायची, ही यांनी अनेकदा अनेक ठिकाणी वापरलेली कार्यपद्धती होय. या सगळ्या अव्यवस्थावादाचा तुम्ही कितीही तर्कशुद्ध प्रतिवाद केलात तरी ही साम्यवादी इको सिस्टिम मागे हटत नाही. आम्हाला ललित कला मंचाच्या आवरणाखाली हिंदू आदर्शांची मानखंडना करणार्‍या, विद्यापीठांमधून साम्यवादी वोकीझमचा पुरस्कार करणार्‍या फडतूस कलाकारांचा आणि त्यांना समर्थन देणार्‍या प्राध्यापकांचा नव्हे, तर मूर्तिकार भाऊ साठेंसारख्या व्यक्तिमत्त्वांचे आदर्श ठेवायचे आहेत. या आपल्या आदर्शांची जपणूक करण्यासाठी जर तरुणाई पुढाकार घेत असेल, त्या आदर्शांच्या जपणुकीचे महत्त्व समजून घेत एखाद्या विद्यापीठासारख्या ठिकाणी जाणीवपूर्वक कृतिशील होत असेल तर या तरुणाईच्या हातात या देशाचा, हिंदू संस्कृतीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे निश्चितपणे समजावे. तूर्तास अभाविपच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन... 
 
-9881242224
Powered By Sangraha 9.0