मथुरा लभान समुदायातील पहिली विद्यार्थिनी आशा बस्सी सुप्रतिष्ठित अशोका विद्यापीठात शिकणार

17 Feb 2024 18:56:30
यवतमाळ, 
जगात प्रतिष्ठित दिल्ली येथील अशोका विद्यापीठात मथुरा लभान समुदायातील Asha Bassi आशा बस्सी हिने कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन यंग इंडिया फेलोशिपसाठी 100 टक्के शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळवला आहे. उमरखेड तालुक्यातील जेवली येथील मूळ रहिवासी आशा सध्या यवतमाळला सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू अंतिम वर्षाला शिकत आहे. शिक्षणाची फारशी परंपरा नसणार्‍या आणि कमी वयात विवाह होणार्‍या मथुरा लभान या समुदायात लहानाची मोठी होत असताना आशालाही कुटुंबियांनी लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु आपली शैक्षणिक जिद्द दाखवत तिने कुटुंबालाही सकारात्मक विचार करायला भाग पाडले.
 
 
y17Feb-Aasha-Bassi
 
तिचा शैक्षणिक प्रवास तिच्या मामाच्या विशेष सहकार्याने पुढे जाऊ शकला. अशोका विद्यापीठाने तिचा पूर्ण शैक्षणिक खर्च (10 लाख 68 हजार रुपये) उचलला असून कुटुंब, समाज, गावखेडे या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून Asha Bassi आशा अफाट जिद्दीने बाहेर पडू शकली. तिचे उदाहरण तिच्या समाजातीलच नव्हे तर शैक्षणिक प्रवाहात येऊ इच्छिणार्‍या परंतु अडचणींचे डोंगर असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांपुढे आदर्शवत आहे.
 
 
Asha Bassi आशा आपल्या यशाचे श्रेय पालक, मामा, मामी, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक आणि एकलव्य फाउंडेशनला देते. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच मी हे यश मिळवू शकले. माझ्यासोबत शिकणार्‍या माझ्या सर्व वर्गमैत्रिणींची लग्ने होऊन त्या एक-दोन अपत्यांच्या आईसुद्धा झाल्या आहेत. मला त्यांच्यासारखे व्हायचे नव्हते म्हणूनच मी जिद्दीने वेगळी वाट निवडली, असे आशा म्हणते. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0