सोलेकसा/गोंदिया,
Car Accident : जैन मुनी शिरोमणी विद्यासागर महाराज यांचे छतीसगड राज्यातील डोंगरगड प्रज्ञा गिरी तीर्थक्षेत्र येथे निधन झाले. त्यांच्या अंतीम यात्रेत जाणार्या भाविकांचे वाहन अनियंत्रित होऊन कालव्यात पडले. यात तिन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना आज 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सालेकसा तालुक्यातील पानगाव शिवारात घडली. जितेंद्र विमलकुमार जैन (52), प्रशांत नरेंद्रकुमार जैन (44), आशिष अशोककुमार जैन (42) सर्व रा. सतना मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहेत.

जैन धर्मियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे 16 फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजेचा सुमारास वृद्धपकाळाने छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 1 वाजता निघणार होती. त्यांच्या अंत्य दर्शनाला मध्यप्रदेश राज्यातील सतना येथील त्यांचे अनुयायी सालेकसा मार्गे डोंगरगडकडे वाहन क्रमांक एमपी 19 सीबी 6532 ने जात असताना सालेकसा तालुक्यातील पानगाव शिवारात वाहन अनियंत्रित होत पुजारीटोला धारणाच्या कालव्यात पडले. यात वाहनातील जितेंद्र जैन, प्रशांत जैन व आशिष जैन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वर्धमान सिद्धार्थ जैन, अंशुल संतोष कुमार जैन, प्रशांत प्रशांत जैन हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिसांना माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने मृतकांना वाहनाबाहेर काढून पंचनामा करून तिन्ही प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. अधिक तपास सालेकसा पोलिस करीत आहेत.