गोंदिया,
Gondia Medical College : येथील बहुप्रतिक्षीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ईमारत बांधकाम भूमिपूजनाला प्रदीर्घ कालावधीनंतर मुहुर्त सापडला आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षि मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीदिनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ईमारत बांधकामाचा पायाभरणी कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री व पालक मंत्री धर्मराव आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी केंद्रीय मंत्री तथा राज्य सभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहतील.
गोंदिया जिल्ह्याह सीमावर्ती राज्यातील जनतेला उत्तम आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली. जागे अभावी वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार येथील केटीएस जिल्हा रुग्णालय व बाई गंगाबाई रुग्णालयात सुरु करण्यात आला. शहराजवळील कुडवा गाव परिरात महाविद्यालय व निवासासाठी 16 एकर जागा अधिग्रहित करण्यात आली. गत नऊ वर्षाच्या कार्यकाळात निधी व अन्य तांत्रिक कारणांमुळे इमारतीच्या बांधकामाला विलंब झाला. यावेळी खा. पटेल यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व पुढार्यांनी इमारतीच्या बांधकामाला तत्काळ सुरुवात करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले.
शासनाने ईमारतीसाठी 600 कोटीचा निधी मंजूर केला आहे. 500 खाटांचे सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय साकारले जाणार आहे. यात विविध आरोग्य विषयक विभाग कार्यरत राहतील. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला केंद्र सरकारकडून निधी व अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, महाराष्ट्रचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रफुल्ल पटेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव आत्राम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. वेळेत ईमारत बांधकाम व्हावे व जनतेला उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.