तभा वृत्तसेवा
अमरावती,
water supply scheme : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची 105 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना विस्तार अचलपूर, चांदुर बाजार, भातकुली तालुक्यात आहे. येथील ग्राहकांकडे एकूण 569 लक्ष एवढी थकबाकी असल्याने ही योजना आता अडचणीत आली आहे.
सदरची थकबाकी वसूल करण्याचे काम चालू असतानाच चोरट्या पद्धतीने पाण्याचा वापर करणार्या ग्राहकांविरोधात देखील फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पाण्याची चोरी करणे हा फौजदारी गुन्हा असून यात शिक्षेचो आणि दंडाची तरतूद आहे. ज्या दिवसांपासून अशी जोडणी केली आहे, त्या दिवसांपासून आजपर्यंत पाण्याचे बिल आणि दंड आकारणी केल्या जाणार असल्याचे उपविभागीय अभियंता यांनी सांगितले. ज्या ग्राहकांची थकबाकी जमा होणार नाही आणि ते मीटरही काढू देणार नाही, अशा ग्राहकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तसेच नळ जोडणी तोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. 105 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने थकीत बिल वसुलीची जोरदार मोहीम 2 फेब्रुवारीपासून हाती घेतली आहे.
थकबाकीमुळे योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे अडचणीत आली आहेत. एकट्या शिरजगाव बंड ग्रामपंचायतकडे 94 लक्ष रूपये थकबाकी आहे. येथील पाणी पुरवठा खंडीत करण्याबाबत येत्या 8 दिवसात कार्यवाही करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू तसेच उपविभागीय अभियंता अजय लोखंडे यांनी सांगितले आहे. पाणी पुरवठा योजना देखभाल आणि दुरूस्तीचे काम ग्राहकांच्या पाणीपट्टीतून करावे लागते. पाणीपट्टीची थकीत वसुली होणे गरजेचे आहे. सर्व ग्राहकांनी पाणीपट्टीच्या थकीत रक्कमेचा तातडीने भरणा करावा व मजीप्राला सहकार्य करावे, अन्यथा त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही व नळजोडणी खंडीत करण्याची तसेच पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. येत्या 8 दिवसात वसुली न वाढल्यास गावाचा किंवा काही भागांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा तसेच पाणी पुरवठा एक दिवस आड ऐवजी दोन किंवा तीन दिवस आड करण्याचे पर्याय वापरणार असल्याचे मजीप्रामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.