आता चिमुकल्यांच्या झोपेचं नाही होणार खोबरं!

    दिनांक :09-Feb-2024
Total Views |
वेध
विजय कुळकर्णी
School time changes : पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याचा शासन निर्णय गुरुवारी लागू करण्यात आला. आता त्याची राज्यातील शाळांना अंमलबजावणी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे चिमुकल्यांची व त्यांच्या पालकांची सकाळी होणारी धावपळ थांबणार आहे. या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. पूर्वीच्या काळी महिला सहसा नोकरी, व्यवसाय क्वचितच करीत होत्या. ग्रामीण भागातील महिला शेतात कामाला जायच्या. आजही ग्रामीण भागातील बहुतेक माता पालक घरच्या किंवा मजुरीसाठी शेतात कामाला जातात. मात्र, शहरी भागात अनेक परिवारात संसाराचा गाडा ओढण्यासाठी डबल इंजीन लागलेले दिसते. आजच्या काळाची ती गरज झाली आहे. कंपनी, आरोग्य विभाग किंवा काही खाजगी नोकर्‍यांमध्ये महिलांना रात्रपाळी करावी लागते. पुरुषांनादेखील कर्तव्याच्या ठिकाणी शिफ्ट पद्धतीने काम करावे लागते. त्यामुळे विशेषत: शहरी भागातील जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. पूर्वी रात्री सर्वजण लवकर झोपी जात. त्यामुळे पहाटे लवकर उठण्याची सवय होती. बदललेल्या जीवनशैलीमुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय झाली आहे. दिवसभर कामावर असल्याने घरगुती विषयांवर नवरा-बायको रात्री चर्चा करतात. त्यामुळे झोपायला उशीर होतो. उशिरा झोपल्याने दुसर्‍या दिवशी उशिरा जाग होते. मग, पिंट्याची, छकुलीची सकाळी शाळा असल्याने धावपळ सुरू होते.
 
 
school time
 
चिमुकल्यांना उठवले जाते. त्यांची झोप न झाल्याने ते जबरदस्ती उठतात. डोळे चोळत चोळतच त्यांना बाथरूममध्ये नेऊन पटापट आंघोळ घातली जाते. शाळेचा गणवेश नेसविला जातो. या लगबगीत शाळेची बस सुटू नये किंवा रिक्षावाला दारासमोर आल्यास त्यांच्या टिफिनमध्ये फास्टफूड कोंबले जाते. मग, ती मुलं शाळेत मधल्या सुटीत ते जंकफूड खातात. दुपारी घरी आल्यावर कोणाचे पोट दुखते, कोणाचे डोके दुखते, तर कोणाला डोळ्यांचा त्रास होतो. अनेक मुलं वारंवार ताप येऊन आजारी पडतात. या सर्व समस्या का उद्भवतात? याचा आपण कोणीच विचार करीत नव्हतो. मुलांना शाळेत जायला नको म्हणून ते कारण सांगतात, असाच बहुतेक पालकांचा समज होता. पण, यामागचे शास्त्रीय कारण वेगळे आहे. मुलं रात्री उशिरा झोपतात त्यामुळे सकाळची शाळा असल्याने त्यांना लवकर उठावे लागत होते. परिणामी त्यांची झोप पूर्ण होत नव्हती. त्यामुळे त्यांची सतत चिडचिड होत होती. झोप न झाल्याने त्यांची मानसिकता ठीक राहत नव्हती. पचनक्रियेवरदेखील त्याचा विपरीत परिणाम होत होता. आईने डब्यात दिलेले पिझ्झा, बर्गर हे फास्टफूड खाल्ल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली. फास्टफूडमध्ये पोषक तत्त्वे नसतात. त्यामुळे विशेषत: लहान मुलांमध्ये आजार बळावतात.
 
 
School time changes :आमच्या एका मित्राच्या मुलीचे पोट दर शनिवारीच दुखायचे. तिचे पोट अतिदुखत असल्याने एकदा तिच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण, तरीही तिची व्याधी कमी झाली नाही. तेव्हा, डॉक्टरांनी तिला काय काय खायला देता यावर लक्ष ठेवा, असा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी तिला खायला दिलेल्या अन्न पदार्थ लक्षात ठेवले. तेव्हा, दर शनिवारी तिला बिस्कीटचा पुडा डब्यात देतो, असे त्यांच्या निदर्शनास आले. बिस्कीट खाल्ले की शाळेतून घरी आल्यावर तिचे पोट दुखते, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी तिला बिस्कीट खायला देणे बंद केले आणि तिचा आजार पळाला. शनिवारी तिची सकाळची शाळा असल्याने घाई होत असल्याने तिला बिस्कीटं खावे लागत होती. कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठाने फास्टफूड खाल्ल्याने लठ्ठपणा, कर्करोगासारखे आजार उद्भवतात, असे संशोधन केले आहे. ताटात वाढलेल्या जेवणावरून भावी पिढीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ठरविले जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय मुलांना थंडीच्या दिवसात सकाळी उठणे नको असते. पावसाळ्यातही पावसात भिजल्याने आजारी पडण्याचा धोका असतो. या सर्व बाबींचा विचार करून तसेच याबाबत आभासी पटलावर सर्वसामान्य जनतेकडून अभिप्राय मागून राज्यपालांनी 5 डिसेंबर 2023 रोजी आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात याबाबतची घोषणा केली होती. त्यानुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळांची वेळ बदलण्यावर अभ्यास करण्यात आला. यात राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, पालक, प्रशासकीय अधिकार्‍यांचे अभिप्राय नोंदविण्यात आले. या सर्वंकष अभ्यासानंतर पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरविण्याचा निर्णय शासनाने कायम केला. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सर्व शाळांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता नियोजन करावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे चिमुकल्यांच्या झोपेचे खोबरं होणार नाही, एवढ मात्र नक्की! 
 
- 8806006149