तभा वृत्तसेवा
अमरावती,
Department of Soil and Water Conservation : मृदा व जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) पदाची 670 जागांची भरती परीक्षा रद्द करण्यात यावी, राज्य सरकार मार्फत भरती प्रक्रिया होत असताना जो गैरप्रकार झाला आहे त्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी युवक काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
21 फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड, नांदगाव पेठ येथील ए.आर.एन असोसिएट या परीक्षा केंद्रावर मृदा व जलसंधारण विभागाचा जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) पदाच्या परीक्षेकरिता पेपर झाला. या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आलेला आहे. केंद्रावर यश कावरे नामक परीक्षार्थीकडे ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचे प्रवेशपत्र प्रतिबंधित असतानासुद्धा ते सापडले आहे. तसेच त्यावर उत्तरे आढळून आली आहे. परीक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या प्रशांत आवंदकर नामक शासकीय अधिकार्याने उत्तर पुरविल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. सदर प्रकरण खूप गंभीर असून जर अशा प्रकारे उत्तरेच पुरवली जात असतील तर गरीब, होतकरू, रात्रंदिवस प्रामाणिक अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसोबत हा अन्याय आहे. या घटनेवरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. टीसीएस कंपनीचे अधिकारी व जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांवर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र ज्याअर्थी थेट शासनाचे अधिकारी यामध्ये सामील असतील तर ही भयंकर बाब आहे. अशावेळी तेथे विभागाकडून त्या केंद्राची मुख्य जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंता जाधव यांची सुद्धा चौकशी केल्यास मोठे प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी सतत संशयाच्या भोवर्यात असलेले सदर सेंटर देण्यात येऊ नये याकरिता परीक्षार्थींनी मृदा व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव यांना इमेलद्वारे मागणी केली होती. मात्र, सचिवांनी हे सेंटर न बदलता उलटपक्षी पारदर्शकतेची हमी दिली होती. त्यामुळे संपूर्ण विभाग या पेपरफुटीमध्ये सहभागी असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणाची ईडी मार्फतसुद्धा चौकशी करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ, प्रदेश उपाध्यक्ष सागर कलाने, युकाँ उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे आदी उपस्थित होते.
सर्व आरोपींना न्यायालयाकडून जामीन
दरम्यान, बुधवारी रात्री तब्बल सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी सातही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला. सोबतच जे चार आरोपी पोलीस कोठडीत होते त्यांनाही गुरुवारी जामीन मिळाला आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणात फिर्यादी हाच आरोपी झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.