पुसद नपच्या मालमत्ता करवाढ प्रकरणी स्थगितीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    दिनांक :01-Mar-2024
Total Views |
पुसद, 
Pusad Nagar Parishad : पुसद नगर परिषदेत 2023-24 ते 2026-27 या कालावधीसाठी फेरमूल्यांकन कर आकारणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अवाढव्य कर आकारणी सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच एकूण 22 हजार मालमत्तांपैकी तब्बल 17 हजार मालमत्ता संदर्भात नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहे. याबाबत खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार यांनी सहकार्‍यांसोबत जनआंदोलन उभे केले होते. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत स्थगितीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे शुक्रवार, 1 मार्च रोजी उमाकांत पापिनवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
 
 
y1March-Pusad-N-P
 
मालमत्ता करात प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेतील मालमत्ता धारकांच्या अपिलांवर नगर पालिका अधिनियमांनुसार निर्णय घेणारी समिती अस्तित्वात नाही. पुसदला सध्या प्रशासक कारभार सांभाळत असून जुन्या कराच्या 5 ते 10 पट कर आकारणीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे खा. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पुसद नगर परिषदमध्ये फेरमूल्यांकन प्रकि‘येला स्थगिती देण्याची मागणी केली होती. दुसरीकडे अ‍ॅड. पापीनवार यांच्या नेतृत्वात मालमत्ता धारकांनी शिवसेनेच्या मदतीने आक्षेप नोंदविण्यास सुरवात केली. यात मोठ्या प्रमाणात, म्हणजे 16 हजार 670 आक्षेप अर्ज दाखल झाले.
 
 
शिवसेनेच्या या आंदोलनाला अखेर यश आले. 2018-19 ची करमागणी 5 कोटी 07 लाख 62 हजार 724 होती. तर 2023-24 ची प्रस्तावित कर मागणी 11 कोटी 99 लाख 59 हजार 38 अशी आहे, हे उल्लेखनीय. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनात, आक्षेपांनुसार ही करवाढ कमी करून 9 कोटी 76 लाख 85 हजार 758 इतकी झाली आहे. 2 कोटी 25 लाख रुपयांनी करवाढ कमी झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी ही जुलमी करवाढ Pusad Nagar Parishad पुसदकरांना मान्य नाही. त्यामुळे शिवसेना ही लढाई सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. उमाकांत पापीनवार यांनी स्पष्ट केले.
 
 
या आंदोलनात शिवसेनेचे राजन मुखरे, दीपक काळे, संजय बयास, दीपक उखळकर, अनिल चव्हाण, सोपीनाथ माने, संतोष आंबोरे, संदीप लाभसेटवार, लक्ष्मण आगाशे, अरुण पेन्शनवार, शिवाजी मस्के, संतोष राठोड, संजय जोगदंड, लखन राठोड, मिथिलेश काळे, अजित पवार, मिलिंद बांडे, अनिल बेले, अरुण जाधव, बबन पाईकराव, अमोल सोनटक्के, गजू मडके, विष्णू तगडपल्लेवार, विश्वास मुजमुले, माधव वानखेडे, अनिल तोंडरे, प्रकाश सहतोंडे, गणेश खटकाले, श्याम ठाकूर, अमोल पेंढारे, तेजस कानेड, अनिल काटकर, विजय ससाणे, अजय संघई, भारत मोदीराज, सचिन महामुने सक्रिय आहेत.