- पक्षीतज्ञ प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांचा इशारा
यवतमाळ,
लहानपणी शालेय जीवनात घरची मंडळी परिकथेतील Rajhans pakshi राजहंस पक्ष्यांंची गोष्ट सांगत. तेव्हापासूनच प्रत्येकाला या देखण्या रुबाबदार पक्षाविषयी कुतूहल आहे. हा पक्षी संपूर्ण विदर्भातील पाणवठ्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून या ठिकाणी काही महिने मुक्काम करत असतो. पण गेल्या काही वर्षांपासून या पाणवठ्यांची होत असलेली दुर्दशा, तेथील होणारे गैरप्रकार लक्षात घेता भविष्यात हे राजहंस विदर्भाकडेच पाठ फिरवण्याची भीती येथील पक्षीतज्ञ, प्राणिशास्त्र अभ्यासक प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांनी व्यक्त केली आहे.
मूळ मध्य आशियातील प्रजाती असलेला हा Rajhans pakshi पक्षी ‘बार-हेडेड गीज’ असून ज्याला मराठीत राजहंस संबोधतात. हा भारत, पाकिस्तान, नेपाळ, कझाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, जपान आणि इतर जवळपासच्या प्रदेशांमध्ये आढळतो. या राजहंसांचे ऑक्टोबर महिन्यात भारतात आगमन होते. मार्चच्या मध्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागतात. ते पाणवठ्यांजवळच राहतात. त्यामध्ये गोड्या पाण्याचे तलाव, नद्या आणि नाले यांचा समावेश आहे. ते खडकाळ प्रदेश, शेतजमिनी आणि दलदलीतदेखील आढळतात. भारतात त्यांची भौगोलिक श्रेणी ईशान्येपासून देशाच्या दक्षिण भागापर्यंत पसरलेली आहे.
दिसायला अतिशय रुबाबदार व देखण्या अशा या पक्ष्याच्या डोके आणि मानेवर तांबूस काळे पट्टे असून, पांढरा आणि राखाडी पिसारा असतो. नारिंगी-पिवळ्या रंगाची लहान चोच व पाय त्याला वेगळी ओळख देतात. त्याच्या आहारात प्रामु‘याने गवतच असते. ते अनेकदा नद्या आणि तलावांजवळ जलीय वनस्पती, कंद, धान्य आणि मुळेदेखील खातात. गेल्या पंधरा वर्षांपासून जानेवारी ते मार्च मध्यापर्यंत 200 वर राजहंसांची नोंद यवतमाळ जवळील बोरगाव धरणावर मी घेत आहे, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले, परंतु 2016 पासून हे चित्र बदलणे सुरू झाले आहे. याचे मुख्य कारण आहे धरणात होणारा गाळपेरा, अंदाधुंद मातीउपसा, प्रमाणापेक्षा जास्त होणारे उत्खनन.
गेल्या 2021 पासून परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात होते, त्या जागी गवत उगवण्यास सुरुवात होते आणि राजहंसांची संख्या हळूहळू वाढते. मार्चपर्यंत मोठा भूभाग दूरदूरपर्यंत हिरव्या गालिच्यांनी आच्छादलेला दिसत असे व राजहंसांसोबतच कलहंस, चक्रवाक व अनेक बदक प्रजाती यावर चरत असत, असेही ते म्हणाले. याच काळात पंधरापेक्षा जास्त प्रजाती याच मैदानांमध्ये उघड्यावर अंडे घालत असत. गावातील सर्व गुरेढोरे उन्हाळ्यात याच मैदानावर चरत असत. परंतु आज चित्र पूर्णतः बदलले आहे. चराईच्या मैदानांची जागा गाळपेर्याने, मातीचा उपसा व उत्खननाने घेतली आहे आणि हीच स्थिती संपूर्ण विदर्भात बहुतांश पाणवठ्यांवर असल्याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या ज्या विविध विभागांच्या अधिकारात ही क्षेत्रे येतात त्यांनी ही बाब अतिशय गंभीरपणे घेऊन या बाबींना आळा घालण्याची गरज आहे. आठदहा लोकांच्या फायद्यासाठी हजारो पशुपक्ष्यांचे चराईक्षेत्र, प्रजनन स्थळे, आश्रयस्थाने संपत आहेत. येणार्या काळात हे सर्व विलुप्त होतील आणि सोबतच राजहंस व शंभरच्या वर पाणपक्षी बोरगाव धरणासार‘या सर्वच पाणवठ्यांकडे पाठ फिरवतील, अशी भीती पक्षीतज्ञ डॉ. प्रवीण जोशी यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण विदर्भातील पक्षीप्रेमींनी आपल्या परिसरातील पक्षी पाणवठ्यांना या नजरेतून आवर्जून भेटी देऊन या देखण्या Rajhans pakshi राजहंसांसोबतच अन्य पाणपक्ष्यांना संरक्षण द्यावे, असेही त्यांनी सुचविले आहे.