काय सांगता, ही शाळा जिल्हा परिषदेची

पालक, शिक्षकांच्या मेहनतीने शाळेचा कायापालट

    दिनांक :02-Mar-2024
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
School Transformation : जिल्हा परिषद शाळा म्हटली की आज बहुतांश शाळांचे विदारक चित्र समोर येते. मात्र याला अपवाद ठरली आहे इंजोरीची शाळा. शाळेचे मुख्याध्यापक विठोबा रोकडे, त्यांच्या सोबतीला सहायक शिक्षक लाखेश्‍वर लंजे व मार्गदर्शक जिप सदस्य लायकराम भेंडारकर, माजी सरपंच रवींद्र खोटेले यांनी लोकसहभागातून शाळेचा शैक्षणिक व भौतिकदृष्ट्या कायापालट केला. त्यामुळेच लहाशना गावातील या शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात जिल्ह्यात तृतीय स्थान मिळाले.
 
 
sdfa
 
 
 
शाळेत विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट, शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणार्‍या वृक्षांची रोपण केलेले असून शालेय इमारतीची आकर्षक रंगरंगोटी केली आहे. सोबतच शालेय परिसरात प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी सुद्धा केली आहे. विद्यार्थी मंत्रिमंडळ, बाल संसद शाळेत लोकशाही पद्धतीने स्थापन करण्यात आली असून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासंदर्भात उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावून द्रवरुपात जैविक खत निर्मितीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सोबतच परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड सुद्धा करण्यात आलेली आहे.
 
शाळेत शालेय बचत बँक तयार करण्यात आलेली आहे यात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. महावाचन चळवळी अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी यासाठी शाळेत दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत इंग्रजी व मराठी वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक गुणांना चालना देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा व इतर कला स्पर्धा यांचे आयोजन शाळेत करण्यात येते. यासह मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली असून प्रत्येक बाबीवर वेगवेगळे उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आलेले आहे. इंजोरी हे गाव छोटेसे असून लोकसंख्या 465 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या फक्त 22 आहे. असे असतानाही शाळेचा शैक्षणिक व भौतिक प्रगती साधण्यासोबतच ताालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे.
 
 याचे मिळते सहकार्य
 
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्‍वर मेश्राम, उपाध्यक्षा सोनी तवाडे, पोलिस पाटील डाकराम मेंढे, सदस्य दिपकंर उके, राजकुमार मेंढे, वनीता मेश्राम, कल्पना भेंडारकर, कल्पना खोटेले , दिपीका रहेले, किरण मेंढे, हिरकणी मेश्राम, रुपाली मेंढे, गायत्री मेंढे, दिलीप हुकरे, माजी विद्यार्थिनी रेखा बारसागडे, लिला मेश्राम, जिजा मेश्राम तसेच शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभलेला आहे.