राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दमदाटी

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
- हर्षवर्धन पाटलांचा आरोप
 
पुणे, 
Harshvardhan Patil : महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळला पाहिजे. मात्र, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आपल्याला जाहीर भाषणात धमक्या, दमदाटी करतात. हे चुकीचे आहे. या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली, असे इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवले. सुरुवातीला सहज वाटणार्‍या अजित पवारांना बारामती लोकसभेची निवडणूक काहीशी जड जाणार असल्याची चिन्ह आहेत. शिंदे गटाच्या विजय शिवतारेंच्या बंडानंतर आता भाजपामधील नेतेही त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यात हर्षवर्धन पाटील यांनी काही स्पष्ट भूमिका घेतली नाही. मात्र, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मात्र विधानसभेला मदत केली, तरच लोकसभेचे काम करू, असा इशारा या आधीच दिला आहे.
 
 
Harshvardhan Patil
 
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. बारामतीवर चर्चा झाली. त्यामध्ये आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते सांगितले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार. जे काही स्थानिक स्तरावर निर्माण झालेले प्रश्न आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढणे आवश्यक आहे. पुढच्या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांसह चर्चा करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे हर्षवर्धन पाटलांनी सांगितले. त्यावर आपण यावर योग्य तो तोडगा काढू, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याचे त्यानी म्हटले.