डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिजेरियन झालेल्या विवाहितेचा गेला जीव
दिनांक :20-Mar-2024
Total Views |
- मृतदेह रुग्णालयातच ठेवून कारवाईची केली मागणी
पुसद,
Savargaon Gore Government Hospitals सावरगाव गोरे येथे राहणार्या विवाहित महिलेला सरकारी दवाखान्यांमध्ये प्रसूतीकरिता दाखल केले. सिजरिंग करून गोंडस लक्ष्मीला जन्म देऊन प्रसूती झालेल्या विवाहित महिलेचा अधिकच रक्तस्त्राव सुरू झाल्याने तडफडू लागली. त्यानंतर त्यांना खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, 19 मार्च रोजी पहाटे 3 च्या दरम्यान घडली.
मृतकाच्या नातेवाईकांनी तब्बल 12 तास उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दरवाजासमोर ठेवून संबंधित महिला डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यासाठी नातेवाईक ठिय्या मांडून बसले होते. सावरगाव गोरे येथील भाग्यश्री प्रदीप धाईस्कर (वय 21) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्या मृतक महिलेची आई शालू राऊत यांच्या म्हणण्यानुसार भाग्यश्रीला 18 मार्च रोजी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सरकारी दवाखान्यामध्ये प्रसूती करण्यासाठी दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरने तपासले असता सिजर करण्याचा सल्ला दिला. भाग्यश्रीचे सिजर होऊन एका गोंडस मुलीला जन्म दिला.
Savargaon Gore Government Hospitals : प्रसूतीच्या एक ते दीड तासानंतर भाग्यश्रीला वेदना जाणवून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांच्या नातेवाईकांनी सरकारी दवाखान्यात उपस्थित परिचारिकेला व डॉक्टरला आवाज देऊन बोलावण्याचा प्रयत्न केला असता कोणीही आले नाही. नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर एक तासांनंतर परिचारिका आल्या. त्यांनी तपासणी केल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सिजर करणार्या डॉक्टरला रात्री दवाखान्यात बोलावून घेतले. त्यांनी महिलेची तपासणी केली असता त्यांना प्रकृती चिंताजनक आढळून आली. उपस्थित डॉक्टरांनी रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. घाबरलेल्या नातेवाईकांनी उपस्थित डॉक्टरांचा सल्ला ऐकून त्यांना तत्काळ खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता भरती केले. मात्र उपचारादरम्यान भाग्यश्रीचा पहाटे 3 ते 3.30 च्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक‘ार दाखल करण्यात आली होती.