कोणत्याही परिस्थितीत बारामतीतून लढणार

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
- विजय शिवतारेंची ठाम भूमिका
 
पुणे, 
कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे नेते Vijay Shivatare विजय शिवतारे यांनी घेतली आहे. त्यांचा बंडखोरीचा पवित्रा बारामतीत महायुतीसाठी अडचणीची ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा याआधी प्रयत्न केला. पण, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. विजय कसा मिळेल याचे गणितच त्यांनी सादर केले.
 
 
Vijay Shivatare
 
Vijay Shivatare : विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या दौर्‍याला सुरुवात केली आहे. त्यांनी बुधवारी भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांची तसेच आ. संग्राम थोपटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मी बंड केलेले नाही. 6 लाख 86 हजार मतदार पवारांचे समर्थन करतात, तर 5 लाख 50 हजार मतदार पवारांचा विरोध करतात. पवार घरण्याचे समर्थन करणारे मतदार हे नणंद आणि भावजईला मतदान करतील. पण, पवार घराण्याच्या विरोधात असणारे मतदार कोणाला मतदान करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पवार कुटुंबाच्या विरोधात असणारे सर्व लोक माझ्याकडे आले होते. हे लोक मला सांगत होते की, आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनाही मत द्यायचे नाही. त्यामुळे हे माझे बंड नसून, मी माझे कर्तव्य पार पाडतो आहे. पवार परिवाराला कंटाळेल्या लोकांना योग्य संधी देण्यासाठी मी ही जागा लढवत आहे, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.
 
 
अजित पवार जिंकू शकणार नाहीत, हे सत्य
मुख्यमंत्री मला सांगत आहेत की आपण युती धर्म पाळला पाहिजे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे नेते अमित शाह यांना शब्द दिला आहे. एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे युतीचा खासदार निवडून आला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांचे मत आहे. प्रत्येक जागेवर युतीचा विजय झाला पाहिजे, असेच माझेही मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी समर्थन करतो. मात्र, बारामतीची परिस्थिती वेगळी आहे. बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे, असा दावा शिवतारे यांनी केला. पवार विरोधकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असेल तर मी ती संधी का सोडावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.