निव्वळ हताशा!

    दिनांक :23-Mar-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
 
Mahavikas Aghadi : कधी लहानपणी हे लहान असतात, कधी नरेंद्र मोदी अफझल खान असतात तर कधी औरंगजेब असतात. निवडणूक आयोगानं विकसित भारत संपर्क अभियानाचे संदेश तत्काळ बंद करण्याचे आदेश मोदी सरकारला दिले तर आयोग चांगलं असतं आणि त्याच आयोगानं आपल्या कायद्यातील तरतुदीपासून पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला तर आयोग पक्षपाती असतो. निवडणुका ईव्हीएमवर घेतल्या आणि हे जिंकले तर आयोग आणि ईव्हीएम दोन्ही चांगले त्याचवेळी निवडणूक हरली तर दोन्ही बेकार्र... अजित पवारांना घड्याळ चिन्हाबाबत सुनावलं आणि शरद पवारांचा फोटो लावू नयेचा आदेश दिला तर आनंदाच्या उकळ्या फुटतात. दुसरीकडे यांच्या नेत्यांना जामीन नाकारला, 11 आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयात फटकारले तर न्यायालयं मोदींच्या हातचं बाहुलं असतं. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएममुळे जिंकतात आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने घाबरून विरोधकांना तुरुंगात टाकण्याची सुडाची कारवाई करतात, जेव्हा मोदीजी ईव्हीएम हॅक करून ठेवल्याच्या गमजा मारल्या जात असतात; त्याचवेळी जनता यांना तडीपार करण्याच्या गप्पा लढविल्या जातात. महाराष्ट्राच्या निवडणुका 5 टप्प्यांत घेतल्या तर भाजपाला फायदा होतो आणि इतरांचं नुकसान होत असल्यासारखे लॉजिक ऐकून ऐकून आता कान पिकली आहेत जनतेची. या सगळ्या लॉजिकमधून विरोधकांची निव्वळ हताशा तेवढी दिसून येत आहे.
 
 
Rahul-uddhav
 
निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. तरी, यांना अद्याप Mahavikas Aghadi महाविकास आघाडी ठरवता आलेली नाही. वंचित महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही हे सांगता येत नाही. वंचितला धरायचं की सोडायचं, हे सांगणं अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं आहे. कोणत्या जागा कोण लढवणार याचं गणित ठरता ठरत नाही. काही मतदार क्षेत्रात तर उमेदवार निवडणूक लढायला तयार नाहीत. नागपुरातून नितीन गडकरी यांच्याविरोधात लढायला कोणताही छोटा, मोठा, दिग्गज नेता किंवा अन्य कुणीही लढायला तयार नाही. ज्या व्यक्तीचे नागपुरातून उमेदवारीसाठी पुढे केले जात आहे, त्याला बळीचा बकरा बनविले असल्याची भावना काँग्रेस पक्षाचे लोकंच आता व्यक्त करू लागले आहेत. बरं, असेच काहीसे चित्र देशभरात आहे. दुसरीकडे ‘नरेंद्र मोदी मेरे से डरते है...’ असे म्हणणारे यांच्या ‘भाराविस’ आघाडीचे नेते राहुल गांधी, नरेंद्र मोदींच्या एका साधारण शिपाई असलेल्या स्मृती इरानींना घाबरून उत्तरप्रदेशातून थेट केरळात पळून गेले. परिवाराचे पारंपरिक क्षेत्र असलेलं पूर्वजांनी जमीन कसून ठेवलेल्या मैदानातून पळ काढणारे 303 खासदार पाठीशी असलेले, देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान असलेले, विश्वविख्यात असलेल्या व्यक्तीला आव्हान देणं, ‘मेरे से डरते है’ म्हणणं हास्यास्पदच म्हणावं लागेल. बरं, इकडे राहुल गांधी ‘मोदी मेरे से डरते है’ म्हणतात तर दुसरीकडे देशात एकमेव नेता अरविंद केजरीवाल आहे, ज्याला मोदी भितात म्हणून आम आदमी पक्षाचे नेते केजरीवालांच्या अटकेनंतर दावा करताना दिसत आहेत. त्यामुळे एकप्रकारे मोदी राहुल गांधींना घाबरत नाहीत असाच निष्कर्ष आम आदमीच्या नेत्यांच्या वक्तव्याचा निघतो. बरं, या दिग्गजांच्या हास्यास्पद दाव्यांनंतर महाराष्ट्राचे तथाकथित दिग्गज ठाकरे शिवाय मोदींना मतं मिळत नसल्याची टिमकी वाजवताना दिसत आहेत. उत्तरप्रदेशात महाविकास आघाडी म्हणा किंवा मग भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशी आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स) नेताच अमेठी, रायबरेलीतून पळ काढतानाचे चित्र देशाला दिसत आहे. जेथे नेताच घाबरला आहे, जेथे नेत्यानेच मैदान सोडले आहे, जेथे नेतेच मैदान सोडून पळ काढत आहेत, आपल्या वरिष्ठांनीच निवडणूक सोडून दिल्याचे चित्र देशभरातील पक्षांच्या कार्यकर्त्यांना, देशातील जनतेला दिसत असताना, निव्वळ तोंडाच्या वाफांवर जनता विश्वास ठेवेल, अशी अपेक्षाच मुळात बाळबोध आहे. हतबल आणि हताश अशी परिस्थिती यांची झालेली आहे.
 
 
 
Mahavikas Aghadi : जेव्हा मुंबईत विरोधी पक्षांची सभा झाली होती. त्या सभेत कित्येक नेता बोलले पण एकही विकासाच्या मुद्यावर बोलल्याचे दिसले नाही. मोदी सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर साधी टीकासुद्धा केली नाही. विकासाचा मुद्दाच काढला नाही. बरं, आपण काय करणार याचा रोडमॅपही दिला नाही. केवळ काय बोलले तर संविधान आणि लोकशाही. संविधान आणि लोकशाही वाचविण्याच्या वल्गना. बरं, संविधान बचाव लोकशाही बचाव कोण करत आहे तर पक्षाच्या संविधानामध्ये लोकशाहीविरोधी बदल केले म्हणून पक्ष गमावणारे, संविधान धाब्यावर बसवून आणिबाणी लावली तेव्हा समर्थन करणारे ठाकरे, ज्या आणिबाणीत संविधानाने दिलेले नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले होते, लक्षावधी महिला व पुरुषांची जबरीने नसबंदी केली गेली, संविधानाच्या मूळ गाभ्यात बदल करण्यात आले, तेव्हा शरद पवार काय करत होते? पवार, ठाकरेंची काय भूमिका होती? हे अवघ्या देशाला माहिती आहे. काँग्रेसला तर संविधान आणि लोकशाहीवर बोलण्याचा अधिकारच नाही. अशा या नतद्रष्ट्यांच्या तोंडी संविधान, लोकशाही बचावची भाषा मुळात शोभतच नाही आणि हे संविधानाच्या गप्पा करणारे संवैधानिक संस्थांबद्दल काय बोलतात? केजरीवालसारखी व्यक्ती- संवैधानिक पदावरील व्यक्ती संविधानाची शपथ घेतलेली व्यक्ती ईडीसारख्या संवैधानिक संस्थेचा आदर करीत नाही. महाराष्ट्राच्याच नव्हे तर दिल्ली, बंगालसारख्या राज्यांच्या राज्यपाल या संवैधानिक पदाविषयीची यांची भाषा, आता तर, नुकतेच देशाच्या पंतप्रधान या संवैधानिक पदावरील व्यक्तीला औरंगजेब म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. आणि हे लोक संविधान वाचविणार? आता संवैधानिक पदाविषयी बोलणार्‍यांना केवळ देशद्रोह आहे, असे सांगून चालणार नाही. अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करून अशा संविधानाची पायमल्ली करणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजे. तेव्हाच संविधानाची, कायद्याची ताकद यांना कळेल.
- 9270333886