पाणी वापरा, पण जरा जपून!

    दिनांक :23-Mar-2024
Total Views |
वेध
- विजय कुळकर्णी
World Water Day : आज जागतिक जल दिन साजरा केला जात आहे. पाण्याचा वापर अतिशय जपून करा. कारण पाण्याला जीवन असे म्हटले आहे. मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने खूप प्रगती केली. माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला. पण, दोन गोष्टी मनुष्याला अजूनही कृत्रिमरीत्या तयार करता आलेल्या नाहीत किंवा त्याचा पर्यायही देता आला नाही. त्या म्हणजे पाणी आणि रक्त. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्याचा वापर आपण अत्यंत जपून केला पाहिजे. निसर्गाने दिलेल्या गोष्टी पृथ्वीवरून कधी तरी संपणार आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर पैशासारखा केला पाहिजे, असे म्हटले जाते. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावरून पाण्याची किंमत आपण जाणली पाहिजे. पाण्याचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी युनोने 22 मार्च 1993 रोजी जागतिक जल दिनाची सुरुवात केली. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाच करणे शक्य नाही.
 
 
World Water Day
 
अन्न न मिळाल्यास मानव काही काळ जिवंत राहू शकेल. पण, पाणी न मिळाल्यास अल्पावधीतच त्याचे जीवन संपेल. हे सर्व लक्षात आणून देण्यासाठीच जल दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि निसर्गात घडलेल्या अनेक स्थित्यंतरांमुळे अनेक जुने जलस्रोत आटले आहेत किंवा बदलले आहेत. अधिक कृषी उत्पादनाच्या अपेक्षेमुळे कृषी सिंचन वाढले आहे. World Water Day नागरी वस्त्या वाढल्यामुळे बोअरिंगचे प्रमाण वाढले आहे. तर, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. आपण वर्षानुवर्षे भूगर्भातील पाण्याचा उपसा करीत आहोत. मात्र, जलपुनर्भरणाकडे आपले कमालीचे दुर्लक्ष आहे. पाऊस कमी प्रमाणात झाल्याने शहरांना पाणी पुरवठा करणार्‍या नद्यांवरील पाणी पुरवठा योजनेतील पाणी कमी होत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून नागरी वस्त्यांना एक दिवस, दोन दिवस तर अनेक ठिकाणी 8 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. आज भारतातील अनेक महानगरात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यातील लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता. चेन्नईमध्येदेखील अशीच परिस्थिती ओढवली होती. या शहरात झीरो डे जाहीर करावा लागला होता. 200 किमीवरून रेल्वेने पाणी आणावे लागत होते.
 
 
World Water Day : या संकटाला इष्टापत्ती मानून उद्योगांसाठी लागणारे पाणी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पुरविणारे चेन्नई हे देशातील पहिले शहर ठरले. झारखंडमधील कुमारिता गावातील चुंबरू तामसोय यांना दुष्काळामुळे स्थलांतर करावे लागले होते. गावात वापस आल्यावर त्यांनी बागकाम सुरू केले. मात्र, त्यांच्यासमोर पाण्याची समस्या निर्माण झाली. त्यांना कोणी पाणी दिले नाही. त्यांनी त्यावर मात करण्याचा निश्चय करून दररोज दोन-तीन तास खोदकाम सुरू केले. सर्व लोक त्यांना वेडा समजू लागले. त्यांनी एकट्याने 20 फूट खोल व 100 बाय 100 चा तलाव खोदला. या कामाला त्यांना 40 वर्षे लागली. आता या वेड्याला वॉटरमनची उपाधी लोकांनी दिली आहे. आज भारताचाच विचार केल्यास 35 कोटी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. युनिसेफच्या एका अहवालानुसार 2025 पर्यंत जगातील 50 टक्के लोकसंख्या पाणी टंचाईच्या प्रदेशात राहणार असल्याचे म्हटले आहे. हे जलसंकट टाळण्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच तयारी केली पाहिजे. त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. विहिरी, विंधनविहिरींचे जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. आपल्या घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी आपल्याकडील विंधन विहीर, विहिरीत सोडले पाहिजे. त्यामुळे भूगर्भातील जलस्तर कायम राहील.
 
 
 
World Water Day आपण दाढी किंवा तोंड धुताना अनेकदा नळ सुरूच ठेवतो. असे करणार्‍या आपल्या देशातील लोकांची संख्या 33 टक्के असल्याचे एनजीटीमधील याचिकेत म्हटले आहे. घरातील नळातून मिनिटाला 6 लिटर पाणी येते. पाच मिनिट नळ सुरू राहिल्यास 30 लिटर पाणी वाया जाते. ते आपण वाचवू शकतो. एक आरओ प्युरिफायर एक लिटर पाणी शुद्ध करताना तीन लिटर पाणी अयोग्य म्हणून काढते. म्हणजे आपल्या घरात दररोज 15 लिटर शुद्ध पाणी येत असेल तर 45 लिटर पाणी अयोग्य म्हणून बाहेर टाकले जाते. त्या पाण्याचा वापर कपडे धुणे, बगीचाला पाणी देण्यासाठी केला जाऊ शकतो. आपल्याकडील बोअरिंगला खारे पाणी असेल तर, त्याचा वापर शौचालयात केला पाहिजे. कार, दुचाकी, सायकल धुण्यासाठीदेखील त्या पाण्याचा वापर केला पाहिजे. बगीचातील झाडे व लॉनला सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पाणी द्यावे. तसे केल्याने पाणी थेट जमिनीत जिरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. तेव्हा, पाण्याचा वापर अतिशय जपून करा. वरील छोट्या छोट्या बाबींची आपण सवय लावून घेतल्यास त्यापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. प्रत्येकाने ही सवय लावून घेण्याचा संकल्प केल्यास मानवी जीवन जलसंपन्न करण्यात आपलाही खारीचा वाटा असल्याचे समाधान आपल्यालाही निश्चितच लाभू शकते! 
 
- 8806006149